महाराष्ट्र सामाजिक

मिशन कवचकुंडल अंतर्गत किनवट तालुक्यात 14 ठिकाणी कोविड-19 लसीकरणाचे 75 तासांचे विशेष सत्र

किनवट प्रतिनिधी राज माहुरकर 

मिशन कवचकुंडल अंतर्गत किनवट तालुक्यात 14 ठिकाणी कोविड-19 लसीकरणाचे 75 तासांचे विशेष सत्र

किनवट : लसीकरणाचं उदिष्ट साध्य करण्यासाठी दि. 21 ते 24 दरम्यान “मिशन कवचकुंडल” अंतर्गत किनवट तालुक्यात 14 ठिकाणी कोविड-19 लसीकरणाचे 75 तासांचे विशेष सत्र राबविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मंगळवार (दि.19) रोजी चलचित्रवाणी द्वारे घेतलेल्या बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार तथा मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव यांनी गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांच्या सहकार्याने सर्व स्थानिक अधिकार्यांची बैठक घेतली. त्यानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे, बालविकास प्रकल्प अधिकारी आश्विनी ठकरोड व गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांच्या समन्वयातून या सत्राचा सूक्ष्म कृती आराखडा तयार केला आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरणाचं उदिष्ट साध्य करण्यासाठी दि. 21 ते 24 दरम्यान “मिशन कवचकुंडल” अंतर्गत किनवट तालुक्यात 14 ठिकाणी कोविड-19 लसीकरणाचे 75 तासांचे विशेष सत्र 3 शिफ्टमध्ये राबविण्याचे नियोजन केले आहे.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अप्पारावपेठ, बोधडी (बु), दहेली तांडा, इस्लापूर, जलधारा, कोठारी (सि), राजगड, शिवणी, उमरी (बा), उप जिल्हा रुग्णालय, गोकुदा, ग्रामीण रुग्णालय, मांडवी आणि शहरातील समतानगर, रामनगर व नागरी दवाखाना येथे दि. 21 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 08.00 वाजता पासून ते दि. 24 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत सलग 75 तासांचे विशेष लसीकरण सत्र राबविण्यात येत आहे.
सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी / कर्मचारी यांच्यासह स्थानिक महाविद्यायीन विद्यार्थी , स्काउट गाईड , राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, ग्रामसेवक , तलाठी , शिक्षक यांनी सक्रीय सहकार्य करावे, असे आवाहन तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी केले आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने व डॉ. संतोष गुंटापेल्लीवार यांनी तालुक्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांची बैठक घेऊन 75 तासाच्या विशेष लसीकरण मोहिमेस सर्व शिक्षकांनी स्वतः झोकून देऊन योगदान द्यावे, असे आवाहन केले.

Copyright ©