यवतमाळ सामाजिक

सुसंस्कार विद्यामंदिर येथे जागतिक टपाल दिन साजरा

सुसंस्कार विद्यामंदिर येथे जागतिक टपाल दिन साजरा

यवतमाळ: सिंघानिया नगर स्थित सुसंस्कार विद्या मंदिर येथे जागतिक टपाल दिन साजरा करण्यात आला.
इंटरनेटच्या काळात आजही लोकं टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावरचा विश्वास कायम आहे. एका शहरातून दुसरीकडे टपाल पाठविण्याचं सर्वात सोपं आणि स्वस्त साधन आहे ते म्हणजे पोस्ट सेवा. फक्त देशातच नाही तर जगातील कोणत्याही देशात टपाल पाठविण्यासाठी या सेवेचा लाभ घेता येतो. 25 ते 30 वर्षापूर्वी टपाल हेच आपल्या संवादाचे प्रमुख माध्यम होते. पत्रास कारण की… या वाक्याने सुरुवात व्हायची अन् संपूर्ण कुटुंबाची खुशाली कळावयची. नातेवाईकांच्या खुशालीची वाट पाहायची. पोस्टमन काका आल्यास त्यांच्यामागे धावत धावत काका आमच्या आत्याचं पत्र आलं का ? असा प्रश्न विचारायचं, 15 पैशांच्या त्या पत्रातून खूप आनंद मिळायचा. मात्र, काळाच्या ओघात ही पत्रे आता हितास जमा झाली आहेत.
टपाल दिवस हा ह्या खात्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय डाकविभाग शाखा यवतमाळ चे विपणन कार्यकारी अधिकारी चंद्रमणी लोखंडे तसेच शाळेचे सचिव के. संजय व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषा कोचे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या स्वागताने झाली. त्यानंतर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले चंद्रमणी लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या अंतर्गत चंद्रमणी लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले आधुनिक काळात डाकमुद्राविद्येचे (फिलॅटेली) तंत्र खूपच प्रगत झाले आहे. त्यात तिकीट संग्रहा बरोबरच तिकिटे व तिकीट उप्तादन, निरनिराळ्या देशांतील टपालांचा अद्ययावत इतिहास वगैरे बाबींचा अभ्यासही अंतर्भूत असतो. ‘फिलॅटेली’ ही संज्ञा १८६३ मध्ये एम्.जी. हर्पीन या फ्रेंच गृहस्थाने प्रथम वापरात आणली. ती सैल अर्थाने तिकीटसंग्रहासाठी वापरली जाते. ६ में १८४० रोजी ग्रेट ब्रिटनमध्ये पहिली तिकीटविक्री सुरू झाली; तेव्हापासूनच साधारणपणे तिकीटसंग्रहालाही चालना मिळाली असे म्हणता येईल. सर्वांत आद्य तिकीट एक पेनीचे होते व ते ‘पेनी ब्लॅक’ म्हणून ओळखले जात असे. त्यावर व्हिक्टोरिया राणीचा मुखवटा होता. सुरुवातीच्या काळात तिकीटसंग्रहाचे खासे असे काही तंत्र नव्हते. एका रंगाची, चित्राची व मूल्याची तिकिटे सारखीच समजत असत. जलचिन्हे व छिद्रे यांचाही विचार केला जात नसे. साधारणतः १८५५ पासून तिकीटसंग्रहास नीटनेटके स्वरून प्राप्त झाले. टपालाच्या तिकिटांचा संग्रह करणे हा एक छंद आहे व तुम्ही तो जोपासावा असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना टपालाच्या तिकिटांबद्दल माहिती दिली तसेच टपाल तिकीट संग्रह खाते कसे उघडावे, त्यासाठी कोणत्या अटी आहेत त्या सर्व गोष्टींची योग्य माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.
याप्रसंगी शाळेचे सचिव के. संजय सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उषा कोचे मॅम यांनी टपाल तिकिटांचा संग्रह करा व टपाल तिकीट संग्रह खाते उघडा या शब्दात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक विनोद जाधव सर यांनी केले याप्रसंगी सर्व शिक्षकवृंदाची उपस्थिती लाभली.

Copyright ©