यवतमाळ सामाजिक

मनोकामना पूर्ण करणारी आसेगाव देवी आई जगदंबा

मनोकामना पूर्ण करणारी आसेगाव देवी आई जगदंबा

आसेगाव ( देवी ) : नवरात्रोत्सवात आसेगाव देवी ( ता . बाभूळगाव ) भक्ताच्या गर्दीने फुलून जाते.
आसेगाव देवी येथील हे मंदिर जागृत असून प्राचीन आहे.नवरात्रामध्ये आई जगदंबा मातेच्या दर्शनासाठी अलोट गर्दी होत आहे.भक्तांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या जगदंबेविषयी एक आख्यायिका सांगितली जाते . संस्थान च्या वतीने याविषयीची माहिती देतांना सांगितले की . इ.स. १६७० मध्ये आसेगाव ( देवी ) येथे मराजी नावाचे एक सद्गृहस्थ होवून गेले . दिवसभर रानात गायी राखून आणल्यानंतर गोठाणाची साफसफाई ते करत होते . जणू त्यांनी गावाला स्वच्छतेचा मंत्र दिला होता . गायीचे धन गावात जास्तीत जास्त वाढावे , आपले गाव समृद्ध व्हावे यासाठी ते रात्रंदिवस झटत होते . त्यांची गोमातेची सेवा पाहून एकेदिवशी प्रत्यक्ष जगदंबेने प्रसन्न होवून त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले . याच गावातील भगवान मुंगसाजी देवाचे पट्टशिष्य संत घोगलेवाबांनी त्यांच्या काव्यसंग्रहामध्ये संत मराजी महाराजांविषयी लिहिले आहे . एकेदिवशी मराजी सायंकाळी गायी घराकडे वळवित होते . त्याचवेळी प्रत्यक्ष जगदंबा त्यांच्यासमोर उभी राहिली . तू मला सोबत घरी घेवून चल तिथेच तुझ्याकडून जनकल्याणकारी कार्य घडावे म्हणून स्थिरावेल . परंतु तू समोर चालत असताना मागे वळून पाहू नकोस . चालत चालत गाव जवळ आले . मराजांनी मागे वळून पाहिले तो काय प्रकार गावाशेजारी जगदंबा गुप्त झाली . त्याच ठिकाणी मराजी महाराजांनी आईची स्थापना केली . त्याकाळी मातीचा परकोट बांधून मंदिराची निर्मिती करण्यात आली.आईच्या दर्शनासाठी महाराष्ट्र,गुजरात व इतर राज्यातून दरवर्षी भाविक दर्शनासाठी येत असतात.आता नवीन तरुणांकडे जबाबदारी आली असून लवकरच आईच्या मंदिराचा जीर्णोद्धार चालू करणार आहे.सोबतच पर्यटन स्थळासाठी जो काही निधी उपलब्ध होईल त्यामधून भक्तनिवास,पार्किंग व्यवस्था, संरक्षण भिंत आदी विकासाचे कामे करण्यात येईल असे संस्थान च्या वतीने सांगण्यात आले आहे.
(जागृत असलेले मंदिराला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाला आहे.तत्कालीन पालकमंत्री तथा कार्यसम्राट आमदार संजय राठोड यांच्या सहकार्याने आसेगाव देवी येथील जागृत असलेले महाराष्ट्र जननी जगदंबा माता संस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाला आहे .)

Copyright ©