यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही ; दोन कोरोनामुक्त

जिल्हा प्रतिनिधी

गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही ; दोन कोरोनामुक्त

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2167 बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 4 ऑक्टोबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात पाच व बाहेर जिल्ह्यात दोन अशी एकूण सात आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 102 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 102 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72886 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71092 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 45 हजार 971 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 73 हजार 85 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.77 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.0 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2167 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 7 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2167 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 7 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 780 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करा

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी लागू केल्या मार्गदर्शक सूचना

 

सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी पुर्वपरवानगी घेणे आवश्यक

देवीची मुर्ती सार्वजनिक मंडळासाठी चार फुट उंचीची मर्यादा

गरबा, दांडीया व इतर सांस्कृतीक कार्यक्रम आयोजनास मनाई

दर्शनाची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करण्याची व्यवस्था करावी

मंडळातील सर्व सदस्यांनी कोवीड लसीचे दोन्ही डोज घेणे बंधनकारक

रावण दहन कार्यक्रमात प्रेक्षकांना बोलावू नये, ऑनलाईन व्यवस्था करावी

‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत सुधारित सूचनांचे पालन करणे आवश्यक

 

यवतमाळ दि. 4 ऑक्टोबर : राज्यात कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा नवरात्रौत्सव, दुर्गापुजा व दसरा साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले असून नवरात्रौत्सवाकरीता एका आदेशान्वये मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत.

जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी नगरपालीका, नगर पंचायत, स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पुर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील व मंडळातील सर्व सहभागी सदस्यांनी कोवीड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असणे बंधनकारक राहील. ब्रेक दि चेन अंतर्गत दिलेल्या सुधारित सूचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक राहील. मंडप उभारतांना न्यायालयीन आदेश आणि नगरपालीका, नगरपंचायत तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरणाशी सुसंगत मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षीत असल्याने घरगूती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीची मुर्ती सार्वजनिक मंडळासाठी चार फुट व घरगुती देवीची मुर्ती दोन फुट मर्यादेत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातु, संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची, पर्यावरणपुरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा. नवरात्रौत्सवाकरीता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्विकार करावा, जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे, तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.

गरबा, दांडीया व इतर सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच ध्वनी प्रदूषणा संदर्भातील नियमांचे व तरतूदीचे पालन करण्यात यावे. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणा-या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर इत्यादी ) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. भाविकांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा घेतले असल्याबाबत खात्री करावी. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये. नगरपालीका, नगर पंचायत विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादीच्या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मीती करण्यात यावी. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्विकृती केंद्राची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीत जास्त प्रसिध्दी देण्यात यावी.

मंडपात एकावेळी पाच पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा

पेयपानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल. विसर्जनाच्या तारखेस जर घरगूती तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्रात असेल तर, मुर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.

दस-याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा. रावण दहनाकरीता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. कोवीड बाबत शासनाच्या सर्व प्रतीबंधात्मक नियमांचे पालन करण्यात येईल व कोवीड लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असणे बंधनकारक राहील. प्रेक्षक बोलावू नयेत. त्यांना फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाव्दारे कार्यक्रम बघण्याची व्यवस्था करावी.

कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगर परिषद, नगर पंचायत, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सुचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामार्फत कोवीड लसीकरण सुरु आहे तरी याबाबत नागरिकांच्या मनामध्ये काही गैरसमज असल्यास ते दूर करण्याबाबत तसेच कोवीड लसीकरणासाठी नागरीकांचा प्रतिसाद वाढविण्यासाठी नवरात्रोत्सवात समाजमाध्यमांवर प्रसिद्धी करण्याबाबत आयोजकांनी कार्यवाही करावी व आरोग्य विभागाशी समन्वय साधावा.

उपरोक्त आदेशांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनिय, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम व भारतीय दंडसंहिता व इतर संबंधीत कायदे व नियमांतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

 

लोकशाही दिनात 116 तक्रारी प्राप्त

प्रलंबित तक्रारी मुदतीत निकाली न काढल्यास दंडात्मक कारवाई करणार- जिल्हाधिकारी

यवतमाळ दि. 4 ऑक्टोबर : जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज एक स्विकृत व 115 अस्विकृत अशा एकूण 116 तक्रारी प्राप्त झाल्या. लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या प्रकरणांवर दोन दिवसात कार्यवाही सुरू करण्यात यावी, तसेच मागील तीन महिन्यापुर्वीचे अर्ज सात दिवसात निकाली काढावे, सदर प्रलंबित तक्रारी पुढील लोकशाही दिनापुर्वी निकाली न काढल्यास संबंधीत कार्यालय प्रमुखांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्या.

प्रत्येक महिन्यातील पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे तसेच इतर सर्व विभाग प्रमुख/अधिकारी बैठकीस हजर होते.

जिल्हाधिकारी येडगे यांनी लोकशाही दिनात मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होत असून कार्यालय प्रमुखांनी त्यांचे स्तरावर जादा वेळ देवून तक्रारींचा निपटारा करावा जेणेकरून लोकशाही दिनात जास्त अर्ज येणार नाही, असे सांगितले. तसेच लोकशाही दिनातील प्रकरणे प्रदिर्घ कालावधी पासुन प्रलंबीत असलेली प्रकरणे सात दिवसाच्या आत निकाली काढण्याचे व एक महिण्यापेक्षा जास्त काळ कोणतीही स्विकृत व अस्विकृत तक्रार प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे त्यांनी विभागप्रमुखांना सांगितले.

लोकशाही दिनाला अतिरिक्त पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे, उपवनसंरक्षक केशव वाबळे उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, भूसंपादन अधिकारी सविता चौधर, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी पी.एस.चव्हाण, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, महिला व बालकल्याण अधिकारी ज्योती कडू, समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी तसेच इतर सर्व विभागाचे विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

Copyright ©