Breaking News यवतमाळ सामाजिक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात औषधांचा तुडवडा पडू देणार नाही – पालकमंत्री संदिपान भुमरे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात औषधांचा तुडवडा पडू देणार नाही– पालकमंत्री संदिपान भुमरे

पालकमंत्र्यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण व विविध विकास कामाचे भूमिपूजन

 

 

यवतमाळ दि. 02 ऑक्टोबर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात औषधांचा कुठलाही तुडवडा पडणार नाही व स्वच्छतेची कुठेही अडचण येणार नाही याची काळजी घेण्यात येईल व रुग्णालयातील अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक सर्व मदत करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज दिली.

आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून शासकीय रुग्णालयास कार्डिॲक रुग्णवाहीका भेट देण्यात आली. या रूग्णवाहीकेचे लोकार्पण पालकमंत्री भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य आमदार दुष्यंत चतुर्वेदी, जिल्हा परिषद अध्यक्षा कालींदा पवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे, प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की कार्डिॲक लॅब असणारी रुग्णवाहीका उपलब्ध होणारे यवतमाळ हे शक्यतो एकमेव शासकीय रूग्णालय आहे, या ॲम्ब्युलन्सचा रुग्णसेवेसाठी चांगला उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, तसेच रुग्णवाहिका भेट दिल्याबद्दल आ. चतुर्वेदी यांना धन्यवाद दिले. पालकमंत्री झाल्यापासून आपण महाराष्ट्रात सर्वांधिक 43 ॲम्ब्युलन्स यवतमाळ जिल्ह्यासाठी उपलब्ध केल्या असून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात ॲम्ब्युलन्स देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमासाठी शाहीद रियाणी, हरीषभाउ कुडे, अभ्यागत मंडळ सदस्य राजेंद्र गायकवाड, जिल्हा परिषद सभापती श्रीधर मोहोड, पराग पिंगळे, संतोष ढवळे, शल्यचिकित्साशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.गिरीष जतकर, कान-नाक व घसाशास्त्रचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.एच. गवार्ले, न्यायवैद्यकशास्त्रचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ.ए.के.बत्रा, विभाग प्रमुख प्रा. डॉ.आर.पी.चव्हाण, डॉ.बी.एस.येलके, वैद्यकीय अधिक्षक डॉ.शरद मानकर, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ.महेंद्र वरठी, सहायक प्राध्यापक डॉ.चेतन जनबादे, अपघात विभागाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.अरविंद कुडमेथे, प्रशासकीय अधिकारी संतोष झिंजे व इतर विभागाचे डॉक्टर्स व सिस्टर्स उपस्थित होते .

 

विकास कामांचे भूमिपूजन

 

आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून प्रभाग क्र. 3 मध्ये रू. 33 लाख 20 हजार प्रशासकीय मान्यतेची सात कामे व प्रभाग क्रं.7 मध्ये रू. 22 लाख 30 हजार प्रशासकीय मान्यतेची 5 कामे सुरू करण्यात येत असून त्याचे भूमिपूजन पालकमंत्री संदिपान भूमरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे घेण्यात यावी, यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.

______________________________________

गेल्या 24 तासात एक पॉझिटिव्ह ; एक कोरोनामुक्त

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2166 बेड उपलब्ध

 

यवतमाळ दि. 2 ऑक्टोबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला तर एक जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात सहा व बाहेर जिल्ह्यात तीन अशी एकूण नऊ आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 580 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 579 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72886 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71090 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.

आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये यवतमाळ येथील एका महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 45 हजार 607 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 72 हजार 639 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.78 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.17 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2166 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 8 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2166 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 8 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 779 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

______________________________________

नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रयासवन येथे ओपन जीम सुरू करणार

‘फ्रीडम रन’ मध्ये सहभागी युवकांचा सत्कार व बक्षीस वितरण प्रसंगी पालकमंत्री भुमरे

यवतमाळ दि. 2 ऑक्टोबर : दैनंदिन व्यायामातून नागरिकांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी प्रयासवन येथे ओपन जीम व त्याव्यतिरिक्त इतर सुविधा आपण उपलब्ध करून देवू असे आश्वासन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज दिले.

स्वातंत्र्याच्या अमृत महात्सवानिमित्त नेहरू युवा केद्रातर्फे प्रयासवन येथे फ्रीडम रन चे आयोजन करण्यात आले होते. या रनमध्ये प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या युवक व युवतींना पालकमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी आ. दुष्यंत चतुर्वेदी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, अनिल ढेंगे, डॉ. विजय कावलकर, नितीन खर्चे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार इ. प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या मुलांमध्ये अजिंक्य गायकवाड, आवेश चौव्हाण, कुणाल कापडे, तर मुलींमध्ये उज्वला चामटकर, श्रुतीका सोनवणे व वैशाली टेकाम यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे या रन मध्ये निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी 10 कि.मी. अंतर धावून पुर्ण केल्याबद्दल त्यांचाही पालकमंत्री भुमरे यांनी सत्कार केला.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीदिनी त्यांचे आदर्शावर चालण्याचा व फिट इंडियाचा संदेश फ्रीडम रन ने दिला असल्याचे सांगितले. तर पोलीस अधिक्षक भुजबळ यांनी फ्रीडम रन सारख्या आदर्श कल्पनेत नवीन पीढीचे शिलेदार सहभागी असल्याचा सांगितले.

कार्यक्रमाचे शेवटी जिल्हाधिकारी येडगे यांनी उपस्थितांना फीट इंडियाचा संकल्प पुढे नेण्यासाठी शपथ दिली. उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी व्यक्त केले.

या फ्रीडम रन ची सुरूवात सकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हिरवी झेंडी दाखवून केली.

यावेळी प्रज्ञा निरकरी, मंगेश खुने, प्रमोद यादव, महेंद्र गुल्हाने, संदीप शीवराम, माणिक मेहरे, दिपक कुटे उपस्थित होते.

Copyright ©