Breaking News यवतमाळ सामाजिक

पालकमंत्री पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर बाभुळगाव, कळंब व यवतमाळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधीत शेतीची केली पाहणी

गेल्या 24 तासात एक पॉझिटिव्ह ; दोन कोरोनामुक्त

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2162 बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 1 ऑक्टोबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात पाच व बाहेर जिल्ह्यात चार अशी एकूण नऊ आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 913 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 911 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72885 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71089 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.

आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये बाभुळगाव येथील एका पुरूष रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 45 हजार 53 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 72 हजार 56 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.78 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.10 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2162 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 12 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2162 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 12 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 775 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

______________________________________

पालकमंत्री पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर

बाभुळगाव, कळंब व यवतमाळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधीत शेतीची केली पाहणी

 

यवतमाळ दि. 01 ऑक्टोबर : पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज सकाळी बाभुळगाव, कळंब व यवतमाळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून अतिवृष्टीमुळे बाधीत शेतीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना शासनामर्फे सर्वतोपरी मदत दिल्या जाईल, अशी हमी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, जिल्हा अधिक्षक अधिकारी नवनाथ कोळपकर, तहसिलदार डॉ. सुनिल

चव्हाण (कळंब), विवेक कुमरे (बाभुळगाव), कुनाल झाल्टे (यवतमाळ), संबंधीत तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी उपस्थित होते.

नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव पाठविण्याबाबत पालकमंत्री यांनी प्रशासनाला सुचना दिल्या.

पालकमंत्री भुमरे यांनी आज सकाळी 8.30 वाजेपासूनच आपल्या दौऱ्याला सुरूवात केली व बाभुळगाव तालुक्यात अंतरगाव येथे अमोल प्रेमदास राऊत यांच्या शेतात, मांग-सावंगी येथे विलास विठ्ठलराव खोडे, नारायण गणपत बावणे व रेवताबाई अंबादास दांडगे यांच्या शेतात भेट दिली. तसेच कळंब तालुक्यात कळंब येथील गुलाब सिताराम बान्ते, हिरा रामभाऊ पाचघरे, नईमुल्ला अमानुल्ला खान, धनोडी येथे मंगेश भास्कर महिंद्रकर, चापर्डा येथे रामराव विठ्ठल उईके यांचे शेतात तसेच यवतमाळ तालुक्यात मडकोना इत्यादी ठिकाणी नुकसानग्रस्त शेतात भेट देवून पाहणी केली.

याप्रसंगी महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

______________________________________

खनिज निधीतून आवश्यक कामे तातडीने पुर्ण करा

– पालकमंत्री संदिपान भुमरे

 

यवतमाळ दि. 01 ऑक्टोबर : जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून प्रत्यक्ष बाधीत क्षेत्र व अप्रत्यक्ष बाधीत क्षेत्रातील उच्च प्राथम्याच्या बाबीवरील आवश्यक कामे तातडीने सुरू करून ती पुर्ण करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज दिल्या.

जिल्हा खनिज प्रतिष्ठान जिल्हा कार्यकारी परिषदेची बैठक आज पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विश्राम भवन येथे घेण्यात आली तसेच जिल्ह्यातील आमदार व खासदार यांच्याकडून विकास कामाबाबत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी खा. बाळू धानोरकर, आ.इंद्रनिल नाईक, आ. निलय नाईक, आ. वजाहत मिर्झा, आ. विश्वास नांदेकर, आ. दुष्यंत चतुर्वेदी, आ. मदन येरावार, आ. नामदेव ससाने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यक्रारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, खनिज प्रतिष्ठानचे सदस्य पराग पिंगळे व श्री. लोढा, जिल्हा खनिकर्म अधिकारी ओंकारसिंग भोंड प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री यांनी पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, क्रीडा, महिला व बालकल्याण पर्यावरण संवर्धन व प्रदुषण नियंत्रण, कौशल्य विकास व भौतिक पायाभूत सुविधा या बांबीवरील महत्वपुर्ण विकास कामांवर प्राधाण्याने निधी खर्च करण्याचे सांगितले. खनिज निधी अंतर्गत घ्यावयाच्या कामाबाबत पालकमंत्री यांनी सर्व खासदार व आमदार यांना त्यांच्या काही सूचना असल्यास तसे कळविण्याबाबतही सांगितले.

______________________________________

 

स्टिंग ऑपरेशन करून 36 तासात पकडली बाळ विक्री करणारी टोळी

यवतमाळ व अकोला महिला बाल कल्याण विभागाची संयुक्त कारवाई

यवतमाळ दि. 01 ऑक्टोबर : ‘बाळ दत्तकसाठी उपलब्ध आहे’ असा मेसेज यवतमाळ जिल्ह्यात व्हायरल झाल्यापासून 36 तासात स्टिंग ऑपरेशन करून यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील 21 दिवसाच्या मुलीची विक्री करणाऱ्या टोळीस अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बाल कल्याण समिती अध्यक्ष यांनी स्वतः डमी पालक बनून ही घटना पुढे आणली आहे. तसेच अकोला आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांच्या बाल संरक्षण यंत्रणांनी योग्य समन्वय साधत आज संध्याकाळी बाळालाही ताब्यात घेतले आहे.

याबाबतच्या सविस्तर माहितीनुसार “बाळ दत्तकसाठी उपलब्ध आहे, निसंतान लोकांनी संपर्क साधावा” असा संदेश राज्यात व्हायरल होत होता. सदर मेसेज अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी वाचल्यावर त्यांनी व्हायरल मेसेजची खात्री करण्यासाठी डमी पालक म्हणून मेसेजमध्ये दिलेल्या नंबरवर फोन केला असता आर्थिक लाभाच्या लालसेने वणी येथील रहिवासी महिला बाळ देण्यास तयार झाली. त्यानंतर यवतमाळ व अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी आणि महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांनी स्टिंग ऑपरेशनची कार्यवाही करण्याचे नियोजन केले.

अकोला बाल कल्याण समिती अध्यक्ष व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी स्वतः डमी पालक बनून बाळ ताब्यात घेवून व्यवहार केल्याचा यावेळी बनाव केला व इशारा मिळताच पोलीस पथकाने धाड टाकून २१ दिवसाच्या नवजात मुलीची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीस ताब्यात घेवून कारवाई केली. यामध्ये अकोला आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांच्या बाल संरक्षण यंत्रणांनी योग्य समन्वय साधत मोठा अनर्थ टाळला. या प्रकरणातील मध्यस्थी महिला ही वणी येथे बेटी फाऊडेशन नावाने संस्था चालवीत असून तिने त्याच परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबात चौथी मुलगी झाली व कुटुंबाची अत्यंत हालाखीची परिस्थिती असल्याने त्याचा फायदा घेत. पालकाना बाळ देण्याकरिता प्रवृत्त केले.

पोलीस पथकाने वेळीच प्रसंगावधान राखून सर्व टोळीस जेरबंद केले व सहा आरोपीस अटक केली. संबधितावर भा.द. सं. ३७० व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम ८१ व ८७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. बाल कल्याण समिती यांच्या आदेशाने बाळाला ताब्यात घेवून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

या कार्यवाहीत जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांचे महत्वपुर्ण मार्गदर्शन लाभले व दोन्ही जिल्ह्यातील बाल संरक्षण यंत्रणा व पोलीस विभाग यांच्या समन्वयाने हे स्टिंग ऑपरेशन यशस्वी झाले व बेकायदेशीर रीत्या बालकाची विक्री करणा-या टोळीस अटकाव करून मोठा अनर्थ टाळल्या गेला.

“अवैधरीत्या, कोणत्याही कारणाने बालकाची खरेदी व विक्री हा गंभीर गुन्हा आहे त्यामुळे कोणत्याही आमिषास नागरिकाने बळी पडू नये, अश्या प्रकारे कोणत्याही कारणाने बालकाची खरेदी विक्री होत असल्यास अथवा बेकायदेशीर दत्तक प्रक्रिया होत असल्यास महिला व बाल विकास विभाग, दुसरा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे अथवा १०९८ चाईल्ड हेल्प लाईन वर माहिती द्यावी.” असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांनी केले आहे.

सदर कारवाईत यवतमाळचे बाल कल्याण समिती अध्यक्ष अॅड. सुनील घोडेस्वार, अकोलाच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, अकोलाचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, यवतमाळ चे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, जिल्हा परिविक्षा अधिकारी गजानन जुमळे, महिला व बाल विकास कर्मचारी रविंद्र गजभिये, सामाजिक कार्यकर्त्या वनिता शिरफुलें, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष चे पोलीस निरीक्षक बबन कराळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक विवेक देशमुख, बाल अत्याचार प्रतिबंधक कक्षच्या सहा. पोलीस निरीक्षक शुभांगी आगाशे तसेच पोलीस कर्मचारी अरविंद बोबडे, अशोक आंबीलकर, अर्चना मेश्राम, प्रमिला ढेरे, उल्हास कुरकुटे, किशोर झेंडेकर, सलमान शेख, देवेंद्र गोडे याचे कारवाईसाठी सहकार्य लाभले.

Copyright ©