यवतमाळ राजकीय

आमदार संजय राठोड पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

जिल्हा प्रतिनिधी

आमदार संजय राठोड पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

यवतमाळ – जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी धडकलेल्या ‘गुलाब’ वादळाने शेतकऱ्यांची वाट पुन्हा काटेरी करून ठेवली आहे. या अतिवृष्टीमुळे खरीप पीक खरडून गेले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. या अस्मानी संकटाने त्यांच्या दु:खास पारावर उरला नाही. मीही शेतकरीपुत्र असून शेतकरी बांधवांचे हे दु:ख समजू शकतो. मात्र शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. शासन, प्रशासन त्याच्या पाठीशी आहे. अतिवृष्टीने झालेली नुकसानभरपाई तत्काळ मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून पाठपुरावा करू व शेतकरी बांधवांना दिलासा देवू, अशी ग्वाही थेट शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून आमदार संजय राठोड यांनी दिली.
नेर तालुक्यातील सातेफळ येथील शेतकरी मधुकर सोनोने यांच्या शेतात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. अनेक गावांत त्यांनी आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार वादळी पावसाने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान केले. हाताशी आलेले सोयाबीनचे पीक पूर्णत: बुडाले. कपाशीची फुले, बोंडं सडल्याने कापसाचे उत्पादनही पूर्णत: घटणार आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, यासाठी आपण पाठपुरावा करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देवू, असे आमदार संजय राठोड यांनी सांगितले. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ संबंधित विमा कंपनीकडे विमा दावा दाखल करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यासाठी गावातील तलाठी, ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांना मदत करावी व शिवसैनिकांनीही शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी, अश सूचना त्यांनी केल्या. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मनोज नाल्हे, जिल्हा परिषद सदस्य भरत मसराम, पिंटू पाटील खोडे, रवींद्र राऊत ,प्रवीण राठोड, डॉ.सुमित खांदवे, बाबाराव राठोड, प्रशांत मासाळ, गणेश चव्हाण, निखिल भेंडे, मनोहर राठोड, नारायण भांडे, प्रमोद वाठ, सुनील गाढवे आदी उपस्थित होते.
या पाहणी दौऱ्यानंतर आ. संजय राठोड यांनी नेर पंचायत समितीमध्ये बचत भवनात घरकूल ‘ड’ यादीसंदर्भात विविध विभागांची बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकरी अधिकारी ठमके, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, विविध गावांतील सरपंच, सचिव उपस्थित होते. घरकूल लाभार्थ्यांची यादी परिपूर्ण करून गरजूंना तत्काळ लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.सातेफळ येथील शेतकरी मधुकर सोनोने यांच्या शेतात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करता ना आ. संजय राठोड व इतर

Copyright ©