Breaking News यवतमाळ सामाजिक

वन्यप्राण्यांमुळे नुकसानग्रस्त गावात सोलर कुंपणाचे नियोजन करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

वन्यप्राण्यांमुळे नुकसानग्रस्त गावात सोलर कुंपणाचे नियोजन करा

– जिल्हाधिकारी अमोल येडगे

यवतमाळ दि. 21 सप्टेंबर : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे शेतीपिकांचे जास्त नुकसान झाले आहे त्या भागात सोलर फेन्सींग लावण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्या.

मानव वन्यजीव संघर्षाबाबत समन्वय साधण्यासाठी आंतर विभागीय जिल्हास्तरीय समिती स्थापन करणेबाबत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे आज सभा घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, यवतमाळ वनवृत्ताचे उपवनसंरक्षक केशव वाबळे, पांढरकवडा वनवृत्ताचे उपवनसंरक्षक किरण जगताप, पुसद वनविभागाचे उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर, सिंचन विभागाचे अधिक्षक अभियंता नितीन बनसोड, विद्युत विभागाच्या उपकार्यकारी अभियंता मनिषा बुरांडे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की वाघाचा वावर असलेल्या भागात ट्रॅप कॅमेरे लावण्यात यावे, जेणेकरून वाघाच्या वावर कोणत्या भागात कोणत्या वेळी जास्त असतो याची माहिती प्राप्त होईल व त्या भागात वाघाचे नागरिकांवरील हल्ल्याला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करता येईल.

वन्यप्राण्यांना अटकाव करण्यासाठी अनेक ठिकाणी तारेत विद्युत प्रवाह (करंट) सोडण्यात येतो, त्यामुळे अनेकदा वन्यजीव, पाळीव प्राणी व जनसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. अशा प्रकारे तारेत विद्युत प्रवाह सोडून नागरिक व वन्यजीव यांना धोका निर्माण करणाऱ्या शेतकऱ्याविरूद्ध वीजचोरी व जीवीत हानीचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हे नोंदवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

विविध वनवृत्तामध्ये वन्यप्राण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रीम पानवठ्याजवळ बोअरवेल व सोलर चे काम केल्यास टँकरद्वारे पाणी सोडण्याची गरज राहणार नाही, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

वन्यजीवाद्वारे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येते. मात्र नुकसान होऊ नये यासाठी वाघाचा वावर असलेल्या गावांमध्ये प्रामुख्याने प्राथमिक बचाव पथक व रॅपिड रिस्पॉन्स टीम गठीत करून ऍक्टिव्ह करावी. रॅपीड रिस्पॉन्स टिम व प्राथमिक बचाव पथकाद्वारे माहिती देवून जनजागृती करण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

तसेच वाघाची हालचाल आणि कालावधी समजून घेण्यासाठी ट्रॅप कॅमेरा लावावेत. त्यासाठी स्थळांचा शोध घ्यावा आणि मोबाईलचलीत कॅमेराचा वापर करावा असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

बैठकीत जिल्हास्तरीय समिती स्थापन करणेबाबत व त्यात अशासकीय सदस्यांच्या निवडीबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी, प्रा. डॉ. प्रविण जोशी, कृषी अधिकारी अनिल राठी, वन्यजीवरक्षक डॉ. रमजान विरानी, जलसंधारणचे एस.बी.गायकवाड आदि उपस्थित होते.

______________________________________

 

अन्नपदार्थ भेसळ रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवा

– जिल्हाधिकारी अमोल येडगे

 

यवतमाळ दि. 21 सप्टेंबर : येणाऱ्या नवरात्र, दसरा व दिवाळी निमित्त नागरिकाद्वारे विविध मिष्ठान्न, दुग्धजन्य पदार्थ व इतर अन्नपदार्थांची वाढीव मागणी राहणार असून याप्रसंगी नागरिकांना भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री होऊ नये यासाठी विशेष मोहीम राबवून अशा पदार्थांची तपासणी करण्यात यावी व विहित मानकांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

अन्न सुरक्षा व मानदे कायदा अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात घेण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त कृष्णा जयपूरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुडधे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे, पोलीस निरीक्षक श्री.परदेशी, शासकीय वैद्यकीय रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, प्रामुख्याने उपस्थित होते.

अन्नविषबाधा होऊ नये या करिता काय काळजी घ्यावी याबाबत अन्न व औषध प्रशासाकडून तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे अनावरण जिल्हाधिकरी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

बैठकीला अन्न सुरक्षा अधिकारी संदिप सुर्यवंशी व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

______________________________________

गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही ; एक कोरोनामुक्त

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2160 बेड उपलब्ध

 

यवतमाळ दि. 21 सप्टेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तर एक जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात एक व बाहेर जिल्ह्यात तीन अशी एकूण चार आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 852 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 852 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72872 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71081 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 38 हजार 197 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 65 हजार 271 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.87 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.0 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2160 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 14 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2160 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 14 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 773 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

______________________________________

दहावीत 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये विशेष अनुदान

 

यवतमाळ दि. 21 सप्टेंबर : दहावीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी दरवर्षी एक लाख रुपये याप्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दिले जाणार आहे.

अनुसूचित जातीतील ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीत 90 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले, त्यांना पुढील दोन वर्षात प्रत्येकी एक लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेअंतर्गत बार्टी मार्फत देण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष मार्च 2021 पासून ही योजना लागू करण्यात आली आहे.

यासंबंधीच्या अधिक माहितीसाठी बार्टीच्या https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच 020-26333330 व 020-26333339 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी कळविले आहे.

______________________________________

 

भारी येथे कायदेविषयक शिबिर संपन्न

यवतमाळ दि. 21 सप्टेंबर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचेमार्फत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेठकर यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ तालुक्यातील ग्रामपंचायत भारी येथे दि. 17 सप्टेंबर रोजी कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश एम.आर.ए. शेख तर प्रमुख उपस्थिती म्हणून भारी ग्रामपंचायतच्या सरपंच ज्योती मरसकोल्हे, मार्गदर्शक ॲड. प्राची निलावार, ॲड. अजय दाणी आदी उपस्थित होते.

यावेळी ॲड. प्राची निलावार यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार, पोटगी व पेन्शन कायदा याबाबत तर ॲड. दाणी यांनी महिलांचे अधिकार कायद्याबाबत मार्गदर्शन केले. न्या. एम.आर.ए. शेख यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सल्ला व सहाय बाबत माहिती दिली.

______________________________________

एकही बालक जंतनाशक औषधोपचारापासून वंचीत राहू नये

– जिल्हा परिषद अध्यक्षा कालींदाताई पवार

राष्ट्रीय जंतनाशक मोहीमेचे उद्‍घाटन

यवतमाळ दि. 21 सप्टेंबर : राष्ट्रीय जंतनाशक मोहीमेचा शुभारंभ आरोग्य उपकेंद्र, करळगांव ता.बाभुबळगांव येथुन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालींदाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ही मोहीम जिल्ह्यातील आठ तालुक्यात राबविण्यात येत असून 01 ते 19 वर्षे वयोगटातील सुमारे चार लाख पन्नास हजार बालकांना जंतनाशकाच्या गोळ्या देण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत ज्या बालकांना आज 21 सप्टेंबर रोजी जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या नाही त्यांना दि.27 सप्टेंबर रोजी मॉपअप राऊंड मधून गोळ्या देण्यात येणार आहे.

अध्यक्षा कालींदाताई पवार यांनी एकही लाभार्थी बालक जंतनाशक औषधोपचारापासून वंचीत राहू नये, तसेच जंतापासून होणाऱ्या दुष्परीणाबाबत जागृती करून पालकांना याबाबत माहिती द्यावी, असे सांगितले. आरोग्य व शिक्षण सभापती श्रीधर मोहोड म्हणाले आरोग्य विभागाने वर्षभर चांगल्या प्रकारे कोविड अंतर्गत कामे केली आहे. ही मोहीमसुध्दा चांगल्या प्रकारे आरोग्य विभाग राबविणार असल्याचे सांगीतले. ह्रदयरोग, कर्करोग यासारख्या आजाराप्रमाणेच आपण लहान आजाराविषयी सजग असले पाहिजे.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ उपस्थितांना आरोग्या विषयी आपला दृष्टीकोन बदलविण्या बाबत सांगीतले. जंतामुळे जरी गंभीर आजार उद्भवत नसले तरी 70 टक्के बालकांमध्ये या कृमीमुळे त्यांच्या पोषण क्षमतेवर परिणाम होतो व पुढे कुपोषण, रक्ताक्षय या सारख्या समस्या निर्माण होत असल्याचे सांगीतले. लाभार्थ्यांना प्रवृत्त करण्याकरीता त्यांनी गोळी देताना सेल्फी विथ आशा अशा प्रकारचा उपक्रम राबविण्याचा सुचना केली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.चव्हाण यांनी प्रास्ताविकपर भाषणात जंतनाशक दिन का राबविण्यात येतो व त्याच्या उपयुक्ततेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जंताचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता स्वच्छता व योग्य आहाराची काळजी घ्यावी तसेच या मोहीमेत 01 ते 19 वयोगटातील बालकांना अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्ती यांच्या मार्फत ही गोळी देण्यात येणार असून त्यांच्या शरीरातील जंताचा नायनाट होईल व शरीराला व्यवस्थीत पोषण तत्वे मिळून शरीराची व बौध्दीक वाढ व्यवस्थीत होईल असे सांगीतले. तसेच पं.स.सभापती रोशनीताई ताडाम यांनी यावेळी समयोचित मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत पाटील यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.सुहास कोरे, डॉ.सुभाष ढोले, डॉ.प्रशांत पवार, डॉ.प्रिती दुधे, गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर, करळगांव येथील सरपंच सोनल जाधव, उपसरपंच ज्योती केळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनिष साऊळकर, वै.अ.डॉ.चेतन गोंडाणे, सिएचओ डॉ.रूपाली कनाके, हिना बेताल, अजय काळे, ए.एन.एम.वर्षा पाडेण, रिता फुंडे, एम.कोडापे, अनिल गेडाम, पी.एच.एन. वंदना येडसकर, किरण ठाकरे, संजय वाणे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

______________________________________

महाडीबीटी पोर्टलवर हरभरा पीक प्रात्याक्षिक व प्रमाणित बियाणे वितरण नोंदणीसाठी मुदतवाढ

यवतमाळ दि. 21 सप्टेंबर : रब्बी हंगाम 2021 अंतर्गत हरभरा पीक प्रात्याक्षिक व प्रमाणित बियाणे वितरण या बाबीकरिता महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याच्या तारखेमध्ये मुदतवाढ करण्यात आली असून आता 25 सप्टेंबर 2021 पर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.

महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर वरील दोन्ही बाबीकरीता शेतकऱ्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने होणार असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.

Copyright ©