Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2164 बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 15 सप्टेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तसेच कोणीही कोरोनामुक्त झाले नाही. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात तीन व बाहेर जिल्ह्यात एक अशी एकूण चार आहे.जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 940 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 940 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72867 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71076 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 34 हजार 18 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 61 हजार 114 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.93 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.0 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2164 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 10 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2164 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 7 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 780 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 3 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 752 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत

पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा दौरा

यवतमाळ दि. 15 सप्टेंबर : राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे हे दिनांक 16 सप्टेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरूवार, दि. 16 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे नागपूरहून आगमन व राखीव. दु. 12.45 वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील रुग्णवाहिका कार्यक्रमास उपस्थिती. दु. 1.00 वा. स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यक्रमास समर्थ लॉन, आर्णी रोड येथे उपस्थिती. दु. 2.30 ते 3 राखीव. सायं. 4 वा. यवतमाळ येथून औरंगाबादकडे प्रयाण

क्रिडायुवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांचा दौरा

यवतमाळ दि. 15 सप्टेंबर : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण विभागाचे मंत्री सुनिल केदार हे दि. 16 सप्टेंबर 2021 रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरूवार, दि. 16 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 1.15 वा. शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे आगमन व राखीव. दु. 1.30 वा. स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यक्रमास समर्थ लॉन येथे उपस्थिती. दु. 3.30 वा. जिल्हा क्रिडा संकुल, यवतमाळ येथे पाहणी व बैठक. साय. 4 ते 6 स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 7 वा. वर्धा कडे प्रयाण.

जिल्ह्यात कलम 37 नुसार जमावबंदी आदेश लागू

यवतमाळ दि. 15 सप्टेंबर : जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी मुंबई पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये शस्त्रबंदी व जमावबंदी प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आला असून पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. सदर आदेश दि. 16 सप्टेंबर रात्री 12 वाजेपासून तर 30 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील.

या आदेशान्वये जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा कोणत्याही व्यक्तीस, शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, रिव्हॉल्व्हर, सुरे, काठया, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू, कोणताही क्षार, द्रव्ये पदार्थ, दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, जमा करून ठेवता येणार नाहीत किंवा जवळ बाळगता येणार नाही किंवा तयार करता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक किंवा जाहीरपणे असभ्य वर्तन करता येणार नाही.

सदर आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी तसेच विवाह, अंत्ययात्रा, सक्षम अधिकारी यांनी विशेष परवानगी दिलेले मिरवणूक व कार्यक्रम यांना लागू राहणार नाही.

Copyright ©