यवतमाळ सामाजिक

सुधाकर नगर (चौफुली) येथे अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

घाटंजी- पारवा पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आर्णी तालुक्यातील सुधाकर नगर (चौफुली) येथे हातभट्टी दारूचे गाळप करून अवैध रित्या विक्री करीत असल्याची माहिती सावळी (सदोबा) सब स्टेशन ला मिळाल्यावरुन पोलीस उपनिरीक्षक दिपक राणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचून रविवारला दोन दारू विक्रेत्यांना हातभट्टी दारुसह पकडून कारवाई केली.
हातभट्टी दारूचे गाळप करून अवैध विक्री करीत असल्याबाबतची माहिती मिळाल्यावरुन दिनांक १२ सप्टेंबर रविवारला दुपारच्या सुमारास सुधाकर नगर (चौफुली) येथिल शिवलाल नथू पवार वय ५० वर्ष व चरण गोबरा राठोड वय ५५ वर्ष यांच्या घराची पंचासमक्ष झाडाझडती घेतली असता शिवलाल पवार यांच्या घरात दोन प्लास्टिक ड्रम मध्ये प्रत्येकी दहा लिटर असे वीस लिटर हातभट्टी दारू त्याची अंदाजे किंमत दोन हजार रुपये तर चरण राठोड यांच्या घरात एका प्लास्टीक ड्रम मध्ये १५ लिटर हातभट्टी दारू त्याची अंदाजे किंमत पंधराशे रुपये असा एकूण तीन हजार पाचशे रुपयाची हातभट्टीची दारू अवैधरित्या विक्रीकरिता बाळगताना मिळून आले. त्यावरून शिवलाल पवार व चरण राठोड या दोन्ही अवैध दारू विक्रेत्यांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (क)(ड) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दिपक राणे यांचे सह नायक पोलीस कॉन्स्टेबल राठोड, पोलीस कॉन्स्टेबल राठोड व होमगार्ड सहभागी झाले होते. या कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. पुढील तपास पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सावळी (सदोबा) सब स्टेशनला नेमून दिलेले पोलीस करीत आहेत.

Copyright ©