यवतमाळ सामाजिक

मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथेच व्हावे

 

ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाची मागणी

– महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महानुभावीयांची गत ३० वर्षापासून असलेल्या मराठी विद्यापीठ स्थापनेच्या मागणीला अनुकूलता दर्शवली आहे, परंतु हे विद्यापीठ मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ रचल्या गेलेल्या रिद्धपूर (ता. चांदूर बाजार जि. अमरावती) येथेच व्हावे, अशी मागणी ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली.

– मराठी भाषेत गद्य, चरित्र, व्याकरण, कोशग्रंथ यांसोबतच काव्यग्रंथाचेही लेखन महानुभाव साहित्यिकांनीच सर्वप्रथम केले. मराठी भाषेतील पहिला गद्य व चरित्रग्रंथ ‘लीळाचरित्राचे संकलन पंडीत म्हाइभट यांनी केल्यावर रिद्धपूर येथेच बाराव्या शतकात संपादन कार्य पूर्णत्वास गेले. मराठी साहित्यविश्वाला समृद्ध करणाऱ्या आणि संस्कृतऐवजी लोकभाषा मराठीतून साहित्यनिर्मिती करणाऱ्या महानुभावीयांची साहित्यसंपदा अजूनही उजेडात आली नाही. त्यामुळेच मराठी विद्यापीठाची गत 3० वर्षापासून महानुभावीयांनी मागणी लाऊन धरली आहे. मराठी विद्यापीठाची रिद्धपूर येथे स्थापना झाल्यास अनेक हस्तलिखित व सांकेतिक लिपी नव्याने जगासमोर येतील. त्यामुळे रिद्धपूर येथेच मराठी विद्यापीठाची स्थापना करण्याची विनंती ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाचे मार्गदर्शक प .पू . विनयमुनी उपाख्य वैरागी बाबा, नेर तालुका अध्यक्ष सौ. वैशाली बनसोड, श्रीमती आशा महाजन, सरिता चौधरी, हिराबाई ढोके यांनी केली आहे

Copyright ©