Breaking News यवतमाळ सामाजिक

चिखलवर्धा ग्राम पंचायतीच्या सरपंचा अपात्र

——————————————–
मासिक सभा न घेणे आले अंगलट 
——————————————–
घाटंजी- सतत या ना त्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या तालुक्यातील चिखलवर्धा ग्राम पंचायतीचे प्रकरण माजी सरपंच असणारे विद्यमान ग्राम पंचायत सदस्य जैतुजी मेश्राम यांनी अपर जिल्हाधिकारी प्र. की. दुबे यांच्या न्यायालयात नेले त्यावरून अर्जदार व गैरअर्जदार यांच्या वतीने झालेल्या युक्तीवादानंतर मासिक सभा न घेणे ही बाब पुढे करून सरपंचा कु. वर्षा भिमराव कनाके यांना अपात्र ठरविण्यात आल्याचे नुकतेच आदेश पारित झाले आहे.
सन २०२०- २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर चिखलवर्धा ग्राम पंचायतची पहिली मासिक सभा दिनांक१८/२/२०२१ रोजी झाली त्यानंतर सरपंचा यांनी १६/४/२०२१ ला सभा बोलाविली मात्र ही सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर ही सभा सात दिवसानंतर घेण्याचे ठरविले परंतु ती घेण्यात आली नाही. त्यानंतर एप्रिल, मे आणि जून मध्ये ही सभा घेण्यात आले नसल्याने अर्जदार मेश्राम यांनी येथिल सरपंच यांना अपात्र ठरविण्यात यावे या मागणीला घेवून अपर जिल्हाधिकारी प्र. की. दुबे यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली. यावरून अर्जदार व गैर अर्जदार यांचे बयान नोंदवून घेण्यात आले. यामध्ये अर्जदार यांचे कडून ‌ॲड. श्री. अडकीने तर गैरअर्जदार यांचे कडून ॲड. श्री. शेंडे यांनी तोंडी युक्तीवाद केला. या सर्व प्रकरणाच्या अंतिम टप्प्यात सरपंचा कु. वर्षा भिमराव कनाके यांना अपात्र केल्याचे समजते. या आदेशाविरुद्ध त्या अमरावती विभागीय आयुक्त यांचे कडे अपील करणार असल्याचे ऐकण्यात आहे. यापुढे चिखलवर्धा ग्राम पंचायतीचे राजकारण काय वळण घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Copyright ©