Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात एक नवीन पॉझिटिव्ह

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2157 बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 02 सप्टेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात एक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला तर कोरोनामुक्त झाल्याची संख्या निरंक आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 18 व जिल्ह्याबाहेर दोन अशी एकूण 20 आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1197 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 1196 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72860 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71053 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये नेर येथील एका पुरूष रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 22 हजार 922 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 49 हजार 786 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.08 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.08 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2157 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 17 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2157 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 15 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 772 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 2 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 753 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

______________________________________

गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

 

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी स्थानिक प्रशासनाची पुर्वपरवानगी आवश्यक

श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरिता 4 फुट व घरगुतीसाठी 2 फुट उंच मर्यादा

गर्दी टाळण्यासाठी दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्कद्वारे करावी.

श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यास मनाई

कोविड नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील

आरोग्य विषयक उपक्रम आयोजिनास प्राधान्य द्यावे

स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी.

 

यवतमाळ दि. 02 सप्टेंबर : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले असून यासाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुढील मार्गदर्शक सूचना निर्गिमित केल्या आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी नगरपालीका/नगर पंचायत/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पुर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-19 मुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नगरपालीका/नगरपंचायत तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी. श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरिता 4 फुट व घरगुती गणपती 2 फुटांच्या मर्यादीत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्ती ऐवजी घरातील धातु/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/पर्यावरणपुरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्विकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. सांस्कृतीक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

गणेशोत्सव कालावधीत ‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत लागू निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजीत करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर इत्यादी ) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

नगरपालीका/ नगर पंचायत विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादीच्या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मीती करण्यात यावी. कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगर परिषद/ नगर पंचायत, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.

आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, भारतीय दंड संहिता व इतर संबधित कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

______________________________________

एकलव्य मॉडेल निवासी शाळेत प्रवेशासाठी 25 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

 

यवतमाळ दि. 02 सप्टेंबर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद अंतर्गत एकलव्य मॉडेल निवासी शाळेत इयत्ता सहावी ते नववी वर्गात प्रवेश मिळण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी 25 सप्टेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रवेशासाठी ऑनलाईन आवेदनपत्र https://admission.emrsmaharashtra.com या संकेतस्थळावर 25 सप्टेंबर पुर्वी भरावे. फॉर्म भरण्याबाबत व प्रवेश संदर्भात अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पुसद येथे तसेच दूनध्वनी क्रमांक 07233-249546 यावर संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी सावन कुमार यांनी कळविले आहे.

 

______________________________________

शबरी आदिवासी महामंडळ कर्ज योजनेसाठी 6 सप्टेंबरपासून अर्ज वाटप

यवतमाळ दि. 02 सप्टेंबर : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ शाखा कार्यालय यवतमाळ अंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनेसाठी दि. 6 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज वाटप करण्यात येणार असून परिपुर्ण अर्ज कार्यालयात सादर करण्याची तारीख दि. 1 ते 30 ऑक्टोबर 2021 अशी आहे.

कर्ज योजनेसाठी यवतमाळ जिल्ह्यासाठी लक्षांक 40 प्राप्त झाले आहेत. यामध्ये बँकेचा 75 टक्के, शबरी महामडळ 15 टक्के आणि अर्जदाराचा 10 टक्के सहभाग आहे.

अर्जासोबत जातीचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, उत्पन्नचा दाखला, शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्रे, आदिवासी विभागाचे नोंदणी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, व्यवसायाचे कोटेशन, जामिनदाराचे कागदपत्रे, परवाना, शेतीचा 7/12 किंवा घर 8-अ पावती, दोन पासपोर्ट फोटो, बँकेचा नाहरकत दाखला इ. कागदपत्रे जोडणे आवश्याक आहे.

अर्जदाराने अर्जाची फाईल दोन प्रतित सादर करणे आवश्याक आहे. अपुर्ण अर्ज स्विकारले जाणार नाही, असे शाखा व्यवस्थापक शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ शाखा कार्यालय यवतमाळ यांनी कळविले आहे.

Copyright ©