यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात सात पॉझिटिव्ह ; चार कोरोनामुक्त

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2139 बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 01 सप्टेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात सात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर चार जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 17 व जिल्ह्याबाहेर दोन अशी एकूण 19 आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 733 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी सात अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 726 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72859 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71053 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये नेर येथील एक, पांढरकवडा येथील तीन व यवतमाळ येथील तीन असे एकूण सात पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 21 हजार 477 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 48 हजार 565 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.10 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.95 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2139 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 35 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2139 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 35 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 752 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

______________________________________

 

 

एम.पी.एस.सी. परिक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू

यवतमाळ दि. 01 सप्टेंबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एम.पी.एस.सी.) दिनांक 4 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील यवतमाळ शहर व दारव्हा शहरातील विविध परिक्षा केंद्रावर परिक्षा घेण्यात येणार आहे. सदर परिक्षेच्या कालावधीत अनुचित प्रकार घडू नये म्हणून फौजदारी दंड संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्गमित केले आहेत.

सदर आदेशानुसार दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी परिक्षा चालु असतांना सकाळी ८ ते सायंकाळी ६ वा. पर्यंत परिक्षार्थी व परिक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी याव्यतीरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करता येणार नाही. तसेच परिक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरापासून २०० मिटर पर्यंतची सर्व झेरॉक्स केंद्र चालु ठेवण्यात प्रतिबंध करण्यात आला आहे.

______________________________________

6 सप्टेंबर रोजी लोकशाही दिन

यवतमाळ दि. 01 सप्टेंबर : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने दि. 06 सप्टेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकशाही दिनाला उपस्थित राहणाऱ्या अर्जदारांनी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. उपस्थितांनी सॅनिटायझरने हात वारंवार स्वच्छ करणे, सामाजिक अंतर ठेवणे, मास्क घालणे आवश्यक राहील. कोविड प्रतिबंधक उपायोजना केल्यानंतरच नागरिकांना कार्यालयात प्रवेश देण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.

_______________________________________

सामाजिक न्याय भवनामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

यवतमाळ दि. 01 सप्टेंबर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, यवतमाळ, येथे काल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे हस्ते फणस या वृक्षाचे झाड लावून वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त दिलीपकुमार राठोड यांनी आंब्याचे झाड लावून तर सहाय्यक आयुक्त भाऊराव रा.चव्हाण यांनी डाळींबाचे झाड लावून वृक्षारोपण केले व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त दि. १५ ऑगष्ट रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यवतमाळ यांनी सामाजिक न्याय भवनातील मोकळया जागेमध्ये कार्यालय व महामंडळातील कार्यरत अधिकारी कर्मचारी संख्येच्या प्रमाणात झाडे लावण्यात येवून ‘माझे झाड माझी जबाबदारी’ याप्रमाणे प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी एक झाड लावण्यात येईल असे ठरविण्यात आले होते.

त्यानुसार वरीलप्रमाणे वृक्षरोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय तसेच सामाजिक न्याय भवनातील सर्व महामंडळातील अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व तालुका समन्वय व समतादुत यांनी प्रत्येकी एक झाड लावून वृक्षारोपण केले.

सदर झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी सर्व कर्मचाऱ्यांनी स्विकारली असून तयार झालेल्या वनास भारतवन असे नाव देण्याचे ठरविण्यात आलेले आहे. अशा अनोख्या प्रकारे सामाजिक न्याय भवनामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.

________________________________________

 

जिल्हा उद्योग केंद्र कर्ज व सुधारीत बिजभांडवल योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रित

 

यवतमाळ दि. 01 सप्टेंबर : जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना व सुधारीत बिजभांडवल योजनेसाठी जिल्ह्याला उद्दिष्ट प्राप्त झाले असून त्यानुसार इच्छुकांकडून प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहेत.

सुधारीत बिजभांडवल योजनेची पात्रता :- अर्जदार किमान सातवी वर्ग उत्तीर्ण बेरोजगार असावा, त्याचे वय १८ ते ५० वर्ष असावे व तो महाराष्ट्राचा १५ वर्षापासून रहिवासी असावा. अर्जदाराने यापुर्वी कोणत्याही शासकिय योजनेअंतर्गत लाभ घेतलेला नसावा.

 

जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेची पात्रता :- अर्जदारास शिक्षणाची व वयाची अट नाही. उद्योग व सेवा उद्योग नोंदणीपात्र असावा. उद्योगामधील यंत्रसामुग्रीची गुंतवणूक रु दोन लाखाचे आत असावी. उद्योग एक लाख लोकवस्ती पेक्षा कमी असणाऱ्या गावामध्ये सुरु करता येतो, चालु उद्योगाचा विस्तार करण्यासाठीही या योजनेचा लाभ घेता येतो.

अर्ज मिळण्याचे ठिकाण – महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन दुसरा माळा, दारव्हा रोड, यवतमाळ येथे इच्छुक लाभार्थ्यांकरिता अर्ज उपलब्ध आहेत. कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक ०७२३२-२४४०२२ यावर अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे जिल्हा उद्योक केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी कळविले आहे.

 

_____________________________________

 

 

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घ्या

जिल्हा अधिक्षक अधिकारी नवनाथ कोळपकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन

 

यवतमाळ दि. 01 सप्टेंबर : शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ.नैसर्गिक आपत्तिमूळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बरेच शेतकरी यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तिस तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यास झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होवुन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकरी/ त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ सुरु करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना योजनेचा विमा हप्ता भरावा लागत नाही. तरी अपघातग्रसत शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.

योजनेच्या लाभासाठी आवश्यक पात्रता, व इतर माहिती पुढीलप्रमाणे आहे.

पात्रता – महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले आई, वडिल, शेतकऱ्याची पत्नी/पती, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण दोन जण.

नुकसान भर्पाइची रक्कम- (अ).-अपघाती मृत्यू – रु.2 लाख., (ब) अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.2 लाख. (क) अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.1 लाख.

विमा हप्ता भरावा लागत नाही- सर्व शेतकरी यांची विमा हप्त्याची रक्कम प्रती शेतकरी रु.32.23 शासनामार्फत विमा कंपनीस भरण्यात येते. त्यामुळे शेतकरी यांनी विमा हप्ता भरण्याची गरज नाही.

विमा पॉलिसी कालावधी- 7 एप्रिल 2021 ते 6 एप्रिल 2022

सदर योजने अंतर्गत लाभास पात्र शेतकर्याने /शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वीत असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी या योजने अंतर्गत लाभास पात्र असणार नाही.

आवश्यक कागदपत्रे- अ) लाभ घेण्याकरिता दावा दाखल करताना सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे- i) विहित नमुन्यातील पुर्व सुचनेचा अर्ज व सोबत 7/12 उतारा किंवा 8-अ, मृत्यू दाखला, प्रथम माहिती अहवाल (विजेचा धक्का अपघात, विज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, उंचावरुन पडून झालेला मृत्यू, सर्प दंश/ विंचू दंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलिस पाटील अहवाल), घटनास्थळ पंचनामा, वयाचा दाखला (नसल्यास शपथपत्र), खातेदार शेतकरी कुटुंबाची शिधापत्रिका.सदरचा दावा दुर्घटने नंतर शक्यतो 45 दिवस कालावधीत नोंदवण्यात यावा.

उपरोक्त कागदपत्र मुळ किंवा राजपत्रीत अधिकारी यांनी स्वाक्षांकित केलेले अथवा स्वसाक्षांकीत (घोषणापत्र-ब नुसार) असल्यास ग्राह्य धरण्यात येइल. मृत्युच्या कारणाची नोंद सक्षम प्राधिकार्याने स्पष्ट केली असल्यास रासायनीक विश्लेषण अहवाल(व्हिसेरा अहवाल) या कागद पत्रांची आवश्यकता राहणार नाही.

अर्ज कुठे करावा- तालुका कृषी अधिकारी कार्यालयात. विमा दाव्याच्या अनुषंगाने पुर्व सुचना अर्ज विहित कागदपत्रांसह ज्या दिनांकास तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल/प्राप्त होइल व संगणक प्रणालीमध्ये अपलोड होइल त्या दिनांकासच तो विमा कंपनीस प्राप्त झाला आहे असे समजण्यात येइल.

अधिक माहिती साठी तालुका कृषी अधिकारी अथवा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालयात संपर्क करावा, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी कळविले आहे.

______________________________________

गरोदर मातांनी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घ्यावा

– जिल्हा परिषद अध्यक्षा कालींदा पवार

यवतमाळ दि. 01 सप्टेंबर : ग्रामीण व आदिवासी भागात अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या काळात तसेच प्रसुती नंतर मजुरीचे काम करणे शक्य होत नाही व रोजगार बुडाल्याने माता व बाळ कुपोषीत राहण्याची शक्यता निर्माण होते. अशी परिस्थिती ओढवू नये म्हणून शासनातर्फे प्रधानमंत्री मातृवंदन योजना सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत तीन टप्प्यात पाच हजार रुपये लाभार्थी महिलेला देण्यात येतात. तरी गरोदर महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा व आपल्या आरोग्यावर दुर्लक्ष न करता सकस आहार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालींदा पवार यांनी केले आहे.

आरोग्य विभागामार्फत गरोदर महिलांसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सप्ताह दिनांक 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचा शुभारंभ यवतमाळ तालुक्यातील लासीना उपकेंद्रात जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार यांचे अध्यक्षतेत घेण्यात आला. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून आरोग्य व शिक्षण सभापती श्रीधर मोहोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुषमा खोडवे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.प्रिती दुधे, ज्योती दुधे-सरपंच ग्रा.पं.लासीना, वैद्यकीय अधिकारी डॉ.जया चव्हाण, पी.एम.व्ही.वाय.समन्वयक पोर्णीमा गजभिये उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी या सप्ताहानिमित्त जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहचविण्याबाबत तसेच गरोदर माता व बालकांचे वेळेत नोंदणी करून त्यांना सर्व प्रकारचे लसीकरण व प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्‍चात सर्व लाभ द्यावे अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या.

आरोग्य सभापती श्रीधर मोहोड यांनी भावी पिढी हे देशाचे भविष्य असल्याने त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणेबाबत सांगीतले.

प्रास्तावीकपर भाषणात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.चव्हाण यांनी जिल्ह्यात चालू वर्षात चार हजार पाचशे अठरा गर्भवती महिलांना दोन कोटी एकसष्ठ लक्ष रूपयाची मदत तर योजना सुरू झाल्यापासून म्हणजे सन 2017 पासून जिल्ह्यातील एकुण सत्तावण हजार महिलांना चोवीस कोटी सदुसष्ठ लक्ष रूपयाचा लाभ त्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे सांगीतले.

कार्यक्रमाचे संचालन प्रशांत पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.प्रगती कोपरकर यांनी व्यक्त केले.

गावातील लाभार्थी मयुरी बोरकर, निर्मला कासार, वैशाली शेंडे, मनिषा रामगडे, जयश्री दाभेकर, रेणु कांबळे, मंगला गेडाम, अंजली टाले यांचा या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी डॉ.पायल गुल्हाने, छाया म्हस्के, सपना दोडेवार, दिक्षा अडकिने, दिपक तारगे, बी.एल.लांढे, एस.ठाकरे इ. उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©