Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात दोन पॉझिटिव्ह ; तीन कोरोनामुक्त

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2143 बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 31 ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर तीनजण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 14 व जिल्ह्याबाहेर दोन अशी एकूण 16 आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 976 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 974 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72852 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71049 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये दारव्हा येथील दोन महिलांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 20 हजार 751 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 47 हजार 825 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.11 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.20 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2143 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 31 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2143 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 31 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 756 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

______________________________________

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य ‘फ्रिडम रन’ चे आयोजन

 

यवतमाळ दि. 31 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य जिल्ह्यातील 75 गावांमध्ये 02 ऑक्टोंबर 2021 पर्यंत फ्रिडम रन चे आयोजन तसेच जिल्हास्तरावर 02 ऑक्टोंबर 2021 रोजी जिल्हास्तरीय फ्रिडम रनचे आयोजन नेहरु युवा केद्रातर्फे करण्यात आले आहे.

अमृत महोत्सवा निमित्य जन भागीदारी ते जन आंदोलन हे थिम ठेवून युवकांचे आरोग्य सुदृढ रहावे त्यांनी दररोज विविध खेळामध्ये सहभाग घ्यावा आणि इतरांनाही आरोग्य सुदृढ ठेवण्या करीता जनजागृती करुन आरोग्य सुदृढ ठेवण्या करीता जागृत करावे. याकरीता प्रत्येक गावच्या ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी केन्द्र, प्राथमिक आरोग्य केन्द्र व गावातील इतर सामाजीक संस्था व युवा मंडळ, महिला मंडळ, बचत गट यांनी सहभागी होवून अमृत महोत्सव साजरा करावयाचा आहे. तरी संपूर्ण गावकरी आणि युवकांनी सहकार्य करावे असे आवाहन नेहरु युवा केन्द्राचे अधिकारी सारंग मेश्राम यांनी केले आहे.

______________________________________

कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना पूरक व्यवसायासाठी प्रवृत्त करावे

– डॉ. लखन सिंग

 

यवतमाळ दि. 31 ऑगस्ट : शेतकऱ्याचे उत्पादन वाढीसाठी शेळीपालन, मधमाशी पालन, रेशीमशेती, गांडूळखत निर्मिती आदि शेतीपूरक व्यवसायाकरिता कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे तसेच विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून ग्रामीण युवक-युवतींना रोजगार निर्मितीकरिता उपयुक्त ठरणारे नाविन्यपूर्ण प्रशिक्षण द्यावे असे मत पुणे येथील आयसीएआर-अटारी चे संचालक डॉ.लखन सिंग यांनी व्यक्त केले.

कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ-1 येथील प्रात्यक्षिक व इन्ट्रक्शनल फार्म ला दि. 28 ऑगस्ट रोजी डॉ.लखन सिंग व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यालय अकोला चे कुलसचिव डॉ. एस .आर. काळबांडे यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी कृषी विज्ञान केंद्रातील पिक प्रात्यक्षिक संग्रहालय, गांडूळखत युनिट, अझोला युनिट, मधुमक्षिका पालन युनिट, शेळीपालन युनिट, मातीपरीक्षण प्रयोगशाळा, सुधारित कृषी औजारे संग्रहालय प्रात्यक्षिक युनिट येथेही भेट दिली. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्र यवतमाळचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे, यांनी कृषी विज्ञान केंद्र राबवत असलेल्या उपक्रमाचा कार्यअहवाल सादर केला व कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागाची माहिती सादर केली.

कुलसचिव डॉ. एस .आर. काळबांडे, यांनी सध्या खरीप हंगामामध्ये कापूस पिकातील गुलाबी बोंड अळी व्यवस्थान व बोंडसड व्यवस्थापनासाठी विद्यापीठाचे विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन विस्तार शिक्षण चे शास्त्रज्ञ मयूर ढोले यांनी केले तर आभार प्रयोग शाळा सहाय्यक विशाल राठोड यांनी व्यक्त केले. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

______________________________________

शासकीय तंत्रनिकेतन प्रवेशप्रकियेला 3 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

यवतमाळ दि. 31 ऑगस्ट : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला दि. 3 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. प्रवेशच्छुक विद्यार्थ्यांना www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून अर्ज नोंदणी करावी व वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा, असे शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. डी. एन. शिंगाडे यांनी कळविले आहे.
______________________________________

25 सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत

 

यवतमाळ दि. 31 ऑगस्ट : जिल्हा न्यायालय यवतमाळ व सर्व तालुका न्यायालय तसेच कामगार न्यायालय व औद्योगिक न्यायालय, कौटुंबीक न्यायालय व इतर सर्व न्यायालये तसेच न्यायाधिकरणे येथे दिनांक 25 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळच्यामार्फत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा सर्व संबंधित पक्षकारांनी लाभ घ्यावा व राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्देश पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष वि.प्र.पाटकर तसेच सचिव एम.आर.ए. शेख यांनी केले आहे.

या लोक अदालतीमध्ये कोर्टातील प्रकरणे आपसी समझोत्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. यात समझोतायोग्य फौजदारी प्रकरणे, पराक्राम्य दस्तावेज अधिनियमाच्या कलम 138 ची प्रकरणे, अधिकोष वसुली प्रकरणे, मोटार अपघात दावा प्राधिकरणातील प्रकरणे, अपघात माहिती अहवाल व कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणे, श्रमिकांचे वाद व त्यांच्या पुनर्नियुक्तीमधील जुन्या वेतनासंबंधीची प्रकरणे(कामगारांसंबंधी निस्तारणासंबंधीचे दावे, पॉलिसी, औद्योगिक कामगारांच्या वेतनासंबंधीचे आणि इतर प्रलंबित फायद्याची प्रकरणे), भू-संपादन प्रकरणे, विजेची आणि पाणी बिलाची (चोरीची) प्रकरणे, नोकरी संबंधी प्रकरणे ज्यामधील पैसे आणि भत्ते आणि सेवानिवृत्तीनंतरच्या फायद्यासंबंधी प्रकरणे, महसूल प्रकरणे, दिवाणी दावे-भाडेसंबंधी, वहीवाटसंबंधीचे दावे आणि दूरध्वनी प्रकरणे आदींचा समावेश राहणार आहे.

Copyright ©