Breaking News यवतमाळ शैक्षणिक

गेल्या 24 तासात तीन पॉझिटिव्ह : दोन कोरोनामुक्त

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2167 बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 18 ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात तीन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या एकूण ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या सात आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 566 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 563 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72827 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71033 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 10 हजार 740 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 37 हजार 905 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.25 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.53 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये पांढरकवडा, यवतमाळ व झरीजामणी येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2167 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 7 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2167 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 7 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 780 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

______________________________________

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक विभागाने ॲक्शन प्लॅन तयार करावा

जिल्हाधिकारी यांच्या सर्व विभाग प्रमुखांना सूचना

यवतमाळ दि. 18 ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत असून यानिमित्त पुढील 15 ऑगस्ट पर्यंत वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, नागरिकांना लोकाभिमुख योजनेद्वारे चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी प्रत्येक विभाग व कार्यालयाने स्वतंत्र्य ॲक्शन प्लॅन चे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी संयुक्तरित्या दुरदृष्य प्रणालीद्वार आज सर्व विभागप्रमुखांना दिल्या.

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर केंद्र शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत 12 मार्च 2021 पासून 75 आठवड्यांच्या कालावधीत ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फनन्सद्वारे सर्व विभाग प्रमुखांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख बैठकीत सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की प्रत्येक आठवड्यात एक कार्यक्रम घ्यावा, विशेष दिन महात्म्य असणाऱ्या तारखांना विशेष कार्यक्रम आयोजित करावा. स्वातंत्र्याच्या पाऊलखुणा असलेल्या जिल्ह्यातील हेरिटेज इमारती, मैदाने, पुतळे आदिचे संवर्धन, स्वच्छता व जपणूक करण्याबाबत नियोजन करण्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ यांनी कोविड नियमावलीचे पालन करून प्रत्येक कार्यालयाने यात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

______________________________________

शासकीय तंत्रनिकेतन प्रवेशासाठी प्रवेशप्रकियेला 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

23 ऑगस्टला तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शीत होणार

यवतमाळ दि. 18 ऑगस्ट : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला दि. 20 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. याकरीता प्रवेशच्छुक विद्यार्थ्यांना www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून अर्ज नोंदणी करता येणार आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी व कागदपत्र अपलोड 20 ऑगस्ट पर्यंत करता येतील, तर 23 ऑगस्ट रोजी तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करण्यात येतील. दिनांक 24 ते 26 ऑगस्ट या कालावधीत गुणवत्ता याद्यासंबंधीत तक्रारी दाखल करता येतील, व दिनांक 28 ऑगस्ट रोजी संकेतस्थळावर अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करण्यात येतील.

तरी विद्यार्थ्यांनी पदविका प्रवेश प्रकियेकरीता वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा, असे शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. डी. एन. शिंगाडे यांनी कळविले आहे.

पाणी आकारणीचे सुधारित दर लागू

यवतमाळ दि. 18 ऑगस्ट : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, यवतमाळ, यांचेद्वारे माहे जुलै-2021 च्या देयकापासून पाणी आकारणीचे नवीन सुधारित दर लागू करण्यत आले आहे.

सुधारित दरानुसार पाणी वापर 15 हजार लिटर पर्यंत घरगुती साठी रु. 19, बिगर घरगुतीसाठी रु. 87.90 व ना-नफा-ना-तोटा साठी रु. 36.60 करण्यात आले आहे. तर 15 हजार लिटर ते 25 हजार लिटर वापरासाठी अनुक्रमे रु.29.30, 87.9 व 36.60 तसेच 25 हजार लिटर पेक्षा जास्त वापरासाठी अनुक्रमे 39.90, रु.

सुधारित दरानुसार घरगुती पाणी वापर प्रकारासाठी 15 हजार लिटर पर्यंत साठी रु. 19, तर 15 हजार लिटर ते 25 हजार लिटर वापरासाठी रु.29.30, तसेच 25 हजार लिटर पेक्षा जास्त वापरासाठी रु. 39.90 दर राहणार असून बिगर घरगुती वापरसाठी रु. 87.90 व ना-नफा-ना-तोटा साठी रु. 36.60 दर आकारणी करण्यात आली आहे.

_____________________________________

क्रीडांगण व्यायामशाळेकरिता 27 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव आमंत्रित

यवतमाळ दि. 18 ऑगस्ट : राज्यात क्रीडा संस्कृतीचे सवंर्धन, प्रचार, प्रसार, व प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध स्थानिक स्वराज्यसंस्था, ग्रामपंचायत, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, शासकीय रुग्णालय, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था तसेच शिक्षण विभाग यांनी मान्यता दिलेल्या शाळा, महाविद्यालये, पोलीस, आदिवासी विकास, सामाजिक न्याय विकास, अल्पसंख्यांक विभाग यांच्या अंतर्गत मान्यता दिलेल्या अनुदानित संस्थेकडून क्रीडांगण व व्यायाम शाळा विकासाकरिता 27 ऑगस्टपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे.

खेळाडूंना खेळासाठी प्रोत्साहन मिळावे आणि क्रीडा चळवळ वृध्दींगत व्हावी यासाठी वरील संस्थांना क्रीडांगण व व्यायाम शाळा अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनामार्फत अनुदान मिळण्यास 5 वर्ष पुर्ण झालेल्या संस्था पात्र राहील. पात्र संस्थांना अनुदाना करीता जास्तीत जास्त अंदाजपत्रकाच्या खर्चाच्या प्रत्यक्ष रक्कमेपैकी जास्तीत जास्त रु.७.०० लक्ष किंवा या पैकी कमी असेल इतकी रक्कम प्राप्त तरतुद राहील क्रीडा साहित्या करीता कमाल रु.३.०० लक्ष अनुदान राहील. व्यायाम शाळा विकास योजने अंतर्गत व्यायामशाळा बांधकाम व्यायामसाहित्य पुरवठा करणे, खुली व्यायाम शाळा उभारणे याकरीता अनुदान सहाय्य करण्यात येईल.

क्रीडांगण विकास अनुदान योजनेअंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, धावणपथ तयार करणे, तारेचे/भिंतीचे कुंपण करणे विविध क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था/ क्रीडांगणावर पाणी मारणे /भांडारगृह, फ्लड लाईट, क्रीडा साहित्य, प्रेक्षक गॅलरी, ड्रेनेज , स्प्रिंकलर, मिनी रोलर, करीता अनुदान देण्यात येईल. अनुदाना करीता मालकी हक्काचा ७/१२ दिर्घमुदतीच्या करारावर (३० वर्ष जमीन) नोदणीकृत करारनामा बंधपत्र, दरपत्रक असणे आवश्यक आहे. अनुदानाव्यतिरिक्त येणारा खर्च संस्थेस करावा लागेल.

अंदाजपत्रक आराखडे सक्षम नोंदणीकृत अभियंता यांनी मान्य केलेले असावे. विविध हमीपत्रे क्रीडा स्पर्धा अहवाल इ. कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्जा सोबत जोडून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे संपर्क साधावा. प्रस्ताव सादर करण्याची अंतीम तारिख दि. 27 ऑगस्ट 2021 ही रहील. या तारखेनंतर आलेले प्रस्ताव तसेच त्रुटीपुर्ण असलेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाही, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, यांनी केले आहे.

Copyright ©