Breaking News यवतमाळ सामाजिक

चांगल्या आरोग्यासाठी खेळ आवश्यक – जिल्हाधिकारी अमोल येडगे

 

यवतमाळ दि. 17 ऑगस्ट : नवीन खेळाडू घडविण्यासोबतच चांगल्या आरोग्यासाठीदेखील सर्वांना खेळ आवश्यक असून क्रिडा विभागाने खेळाच्या माध्यमातून प्रत्येक गावात पोहचावे अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

जिल्हा क्रीडा संकुलातील विविध विषयांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी आज महसुल सभागृहात घेतला. यावेळी अपर पोलीस अधिक्षक डॉ.के.अे.धरणे, क्रीडा उपसंचालक विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रविण कुळकर्णी, शिक्षणाधिकारी दीपक सुर्यवंशी, श्री. चवणे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा संकुला प्रकल्पांतर्गत पुर्ण झालेले क्रीडा सुविधा कंत्राटी पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी त्याचे तातडीने निविदा प्रकिया पुर्ण करण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच क्रीडा संकुलातील मुख्य प्रवेशद्वार तसेच मागील बाजूचे प्रवेशद्वार व सुरक्षा भिंतीचे काम पुर्ण करण्याचे, खेळाडूंशिवाय इतर नागरिकांना क्रीडासंकुलात विनाकारन फिरू न देणे व हायमास्क लाईटचे अंदाजपत्रकात दिरंगाई करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश दिले.

समता मैदान येथील भाड्याने दिलेल्या गाळ्यांचे ज्यांनी भाडे दिले नाही, त्यांना नोटीस बजावून भाडे वसुल करण्याचे अन्यथा गाळे रिकामे करून घेण्याचे सांगीतले. तसेच या गाळ्याच्या भाड्यापोटी येणाऱ्या रकमेतून अथवा इतर निधीतून समता मैदानाचा विकास करण्याच्या सूचना दिल्या. शिक्षण विभागाने देखील शाळेतील क्रीडांगणाचा विकास करावा, अशा सूचना‍ जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

यावेळी क्रीडा संकुलातील पाण्याच्या टाकी दुरूस्ती, जलतरण तलावाची दुरूस्ती, सर्व तालुक्यात क्रीडा संकुलाचे बांधकाम, आदिंबाबत आढावा घेण्यात आला.

बैठकीला नगरपरिषद, क्रीडा व शिक्षण विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Copyright ©