यवतमाळ सामाजिक

हक्काच्या रस्त्यासाठी सावंगी (डाफ) च्या नागरिकांनी फोडला टाहो.!

———————————————
लोक प्रतिनिधींचे आश्वासन हवेत विरले
———————————————
कळंब- देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली असली तरी सावंगी (डाफ) या गावाला हक्काचा रस्ता मिळाला नसल्याने,लोकप्रतिनिधींची आश्वासन हवेत विरून गेल्याने अखेर गावकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन देवून साहेब आम्हाला हक्काचा रस्ता द्याहो अश्या मागणीला घेवून टाहो फोडला आहे.
सावंगी (डाफ) ते सावरगाव हा मुख्य दळणवळणाचा रस्ता आहे. याच रस्त्याने गावकऱ्यांना मार्गक्रमण करावे लागते. मात्र स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष लोटली तरी या गावाकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याने रोड अभावी नरक यातना भोगत असल्याचे प्रत्यय याठिकाणी येत आहे. कोणत्याही कामानिमित्त बाहेर निघायचे झाल्यास सर्व प्रथम रस्त्याची धडकी भरते. रस्त्याअभावी येथिल अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याठीकांनचा रुग्ण दवाखान्यात नेण्यास काहीच पर्याय नसल्याने बैलबंडी चा वापर करावे लागते. मात्र रस्ता पुर्णतः खड्यात असल्याने बैलबंडी ची चाके आसकुडा पर्यंत फसतात यात मुके जनावर त्या बैलांचे काय हाल होत असेल त्याची कल्पनाही करणे योग्य ठरणार नाही. अनेकदा प्रसुती चे रुग्ण दवाखान्या पर्यंत जातात की नाही अशी भिती मनात घेवून तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा गंभीर रुग्ण रस्त्यातच दगावले आहेत. या गावातील वास्तव्यास असलेल्या जनतेचा मुख्यतः व्यवसाय शेती असल्याने गाव सुध्दा सोडून जावू शकत नाही. शेतीचे बी, बियाणे, खता पासून तर शेतीतील उत्पन्न कसे ने आन करीत असेल यासाऱ्या बाबींना काय त्रास सहन करावा लागतो हे सावंगी (डाफ) चेच शेतकरी जाणून घेवू शकते. निवडणूक आली की उमेदवार मोठ्या ऐटीत येवून अनेक आश्वासनाची खैरात सोडतात आणि एकदा निवडून आले की त्यांचे आश्वासन हवेत विरून जातात. या भागातील खासदार व आमदार यांनी सुध्दा फोल आश्वासन देवून वेळ मारून नेली. अनेकदा जिल्हा प्रशासनाकडे निवेदने दिलीत मात्र त्याचा कोणताही फायदा झाला नाही. एकीकडे डिजिटल इंडिया बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्यानी या गावच्या हक्काचा रस्ता दिसत नाही काय? अर्थात पुढे पुढे विकास दाखवून खरी गरज असणाऱ्या ग्रामीण भागाकडे लक्ष पुरवून डिजिटल बना म्हणत गावकऱ्यांनी जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना “साहेब! हात जोडतो पण आमच्या गावाला हक्काचा रस्ता द्या”अशी भावनिक विनंती करीत टाहो फोडला आहे. या गावाची दखल प्रसार माध्यमांच्या वतीने घेण्यात आल्या आम्ही त्यांचे आभार मानतो मात्र निगरगटट प्रशासनाला कधी जाग येणार असे गावकरी बोलत होते. हा रस्ता तातडीने बनविला नाहीतर तो कोणताही पदाधिकारी असो त्यांना गावात प्रवेश मिळणार नाही. कोणत्याही निवडणुकीवर गावकऱ्यांचा बहिष्कार राहील असे सावंगी (डाफ) येथिल नागरिक दिपक डाफ यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Copyright ©