Breaking News यवतमाळ सामाजिक

मिशन कायाकल्प’द्वारे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कायापालट करणार – पालकमंत्री संदिपान भुमरे

 

 

23 रुग्णवाहिकेचे लोकार्पण

महाआवास अभियानांतर्गत उत्कृष्ठ काम करणाऱ्या तालुके, ग्रामपंचायतींचा सत्कार

आरोग्य संस्थेच्या विकासाकरीता एकही रूपया कमी पडू देणार नाही

अपुर्ण कामे पुर्ण करण्यास प्राथमिकता देऊ

यवतमाळ दि. 16 ऑगस्ट : जिल्हा परिषदेच्या मिशन कायाकल्प या नाविण्यपूर्ण उपक्रमातून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना सर्वसाधारण सुईपासून शल्यचिकित्सेसाठी आवश्यक अद्यावत यंत्रसामुग्रीपर्यंत तसेच चांगले बेड, प्रशस्त ओपीडी, रुग्‍णवाहिका, स्ट्रेचर, इमारत बांधकाम व दुरूस्ती, अटॅच टॉयलेट इ. सर्व अद्यावत सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येवून त्यांचा कायापालट करण्यात येईल व भविष्यातील आरोग्य संस्थेच्या विकासाकरीता एकही रूपया कमी पडू देणार नाही, असे आश्‍वासन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिले.

मिशन कायाकल्प पुस्तिकेचे अनावरण, रुग्णवाहिका लोकार्पण तसेच महाआवास अभियानांतर्गत उत्कृष्ठ काम करणारे तालुके, ग्रामपंचायती, व्यक्ती व संस्था यांचा सत्कार जिल्हा परिषद सभागृहात पालकमंत्री यांच्या उपस्थितीत 15 ऑगस्ट रोजी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके तसेच विशेष निमंत्रीत म्हणून जे.जे.हॉस्पीटलचे सेवानिवृत्त अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री भुमरे पुढे म्हणाले की जिल्हा परिषदेने कायाकल्प मिशनमध्ये केवळ 25 प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेष न करता जिल्ह्यातील पुर्णच्या पुर्ण 66 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश करावा, यासाठी आवश्यक सर्व निधी उपलब्ध करण्यात येईल तसेच जिल्ह्यात निधीअभावी अपुर्ण असलेली कामे पुर्ण करण्यास प्राथमिकता देण्यात येईल. दुदैवाने कोरानाची तीसरी लाट आलीच तर भविष्यात ऑक्सीजनची टंचाई भासणार नाही यादृष्टीने ऑक्सीजन साठा उपलब्ध करून नियोजन करण्यात आले आहे. तसेच मोठ्या प्रामाणात बेडची उपलब्धता करण्यात आली आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्यावत रुग्णवाहिका देण्यात येत असून यापुर्वी 34 व आता 23 अशा एकूण 57 रुग्णवाहिका आरोग्य सेवेत उपलब्ध करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महाआवास योजनेअंतर्गत नागरिकांना तातडीने घरकुलाची सोय उपलब्ध करून उत्कृष्ठ काम केल्याबद्दल त्यांनी पुरस्कार प्राप्त संस्थांचे अभिनंदन केले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार यांनी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री यांचे आभार व्यक्त केले सोबतच ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्तीकरिता निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी पालकमंत्री यांचेकडे केली. आरोग्य सभापती मोहोड यांनी कोरोनामुळे आरोग्य विभागाला अद्यावत होण्याची संधी प्राप्त झाली असून त्याचा पुरेपुर फायदा घेवून सर्व आरोग्य केंद्रे अद्यावत करण्यावर भर देण्याचे सांगितले. तर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिकांचा आरोग्य यंत्रणेवरील खर्च टाळण्यासाठी शासनामार्फत आवश्यक सुविध उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे पुर्ण सहकार्य राहील असे सांगितले.

पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ यांचा उल्लेख करून सांगितले की आरोग्य सेवेबाबत प्रशासकीय निर्णय घेणारी व्यक्ती डॉक्टर असल्यास लहान-लहान गोष्टीत सुधारणा होऊन मोठे बदल घडून त्याचा नागरिकांना फायदा होतो असे सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ यांनी प्रास्ताकेतून सांगितले की, कोविड काळात आरोग्य सेवेतील त्रुटी व सेवासुविधेतील अभावाची जाणीव झाल्याने मिशन कायाकल्प अंतर्गत ग्रामीण स्तरावर पायाभूत सुविधेत वाढ करून प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर सुसज्ज व अद्यावत व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. यामुळे ग्रामीण जनतेला योग्य उपचार व गर्भवती माता-बालकांचे मृत्यू थोपवणे शक्य होईल. जिल्ह्यातील जनतेला गुणवत्तापूर्ण व विश्वासाहार्य् व मोफत आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नीशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वोत्कृष्ठ तालुका म्हणून अनुक्रमे बाभुळगाव, केळापूर व दिग्रस, उत्कृष्ठ ग्रामपंचायतसाठी जवळा ता. आर्णी, म्हैसदोडका ता. मारेगाव व धारणा ता. केळापूर यांचा तर राज्य आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ठ तालुका म्हणून केळापूर, दिग्रस व पुसद आणि उत्कृष्ठ ग्रामपंचायतसाठी अनुक्रमे बिटरगाव ता. उमरखेड, तरोडा ता. आर्णी, मुडाणा ता. महागाव यांचा सत्कार करण्यात आला. संबंधीत गावाचे सभापती, गटविकास अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक यांनी पुरस्कार स्विकारला. तत्पुर्वी जिल्हा परिषदेच्या आवारात 23 नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्री भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन प्रशांत पाटील व प्रभु पांडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस. चव्हाण यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

______________________________________

गेल्या 24 तासात दोन पॉझिटिव्ह : दोन कोरोनामुक्त

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2168 बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 16 ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या एकूण ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात सहा व बाहेरजिल्ह्यात एक अशी एकूण सात आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 421 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 419 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72824 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71030 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये आर्णी येथील एक व घाटंजी येथील एका रूग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष नऊ हजार 877 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 36 हजार 976 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.26 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.48 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2168 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 6 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2168 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 6 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 781 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.
______________________________________

मातेच्या दुधापासून वंचित बालकांना मातृत्वाचा ठेवा उपलब्ध करून द्यावा

पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे स्तनदा मातांना दुध दान करण्याचे आवाहन

 

नवजात बालकांना ‘ह्युमन मिल्क बॅंकेमुळे’ नवजीवन मिळेल

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ह्युमन मिल्क बॅक चे उद्घाटन

 

यवतमाळ दि. 16 ऑगस्ट : कमी वजनाचे किंवा कमी दिवसाचे बालकांना तसेच काही कारणास्तव मातेचे दुध उपलब्ध होऊ शकत नाही, अशा नवजात बालकांना ‘ह्युमन मिल्क बँकेच्या’ दुधपेढीत साठवुन ठेवलेले दुध मिळाल्यामुळे नवजीवन मिळेल, तरी स्तनदा मातांनी आपले दुध ह्युमन मिल्क बँकेत जमा करून अशा बालकांना आपल्या मातृत्वाचा अनमोल ठेवा उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केले.

श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथील बालरोगशास्त्र विभागामध्ये मातेच्या दुग्ध बॅकेचे (ह्युमन मिल्क बॅक) उद्घाटन पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2021 रोजी करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.

सदरील दुग्धपेढीमध्ये मातेचे दुध 6 महिने जतन करण्याची क्षमता आहे. जतन केलेल्या दुधावर निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया करून गरजु शिशुंसाठी ते वितरीत केले जाते. सदरील दुग्धपेढीचा फायदा मातेचे दुध उपलब्ध होउ न शकणाऱ्या नवजात बालकांना होईल. आज सुरू झालेल्या श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,यवतमाळ येथील बालरोगशास्त्र विभागामधील ही दुग्धपेढी महाराष्ट्रातील पाचवी दुग्धपेढी ठरत आहे असे अधिष्ठाता डॉ.मिलींद कांबळे यांनी सांगीतले.

कार्यक्रमाला डॉ.स्नेहा भुयार, डॉ.अजय केशवानी, डॉ.अजय कसुंबीवाल, डॉ.विशाल चव्हाण, डॉ.रोहीदास चव्हाण, स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र व बालरोग विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, डॉक्टर्स व सिस्टर्स उपस्थित होते.

Copyright ©