Breaking News यवतमाळ सामाजिक

गुटखाबंदी कडून… गुटखामुक्ती कडे’ अभिनव उपक्रम – पालकमंत्री भुमरे यांचे आवाहन

 

जिल्ह्यात व्यसनमुक्त गाव योजना राबवा

यवतमाळ दि. 16 ऑगस्ट : डॉ. अे.पी.जे. अब्दुल कलाम गुटखामुक्त समाज अभियान अंतर्गत ‘गुटखाबंदी कडून… गुटखामुक्ती कडे’ हा पोलीस विभागाने सुरू केलेला अभिनव उपक्रम असून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या धर्तीवर व्यसनमुक्त गाव ही योजना राबवावी, असे आवाहन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केले.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी लिखान केलेले ‘गुटखाबंदी कडून… गुटखामुक्ती कडे’ या पुस्तकाचे प्रकाशन व उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नगराध्याक्षा कांचन चौधरी, जे.जे.हॉस्पीटल मुंबईचे सेवानिवृत्त अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, मुख्य समन्वयक मुक्तेश्वर कुळकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते.

शासनाच्या गुटखाबंदी कायद्यातील त्रुटी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येतील असे पालकमंत्री यांनी सांगितले.

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले की तंबाखु ओढल्याने 26 आजार व तंबाखु खाण्याने 22 प्रकारचे आजार होत असून अशा व्यक्तीच्या सानिध्यात असणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीवरही त्याचा 70 टक्के धोका होऊन आरोग्यावर दुष्परीणाम होतो. समाज व्यसनमुक्त झाल्यास यामुळे होणारे 14 टक्के मृत्यू थांबतील त्यामुळे गुटखामुक्ती योजना राबवीणे समाजासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी ‘गुटखाबंदी कडून… गुटखामुक्ती कडे’ हे पुस्तक अनुभवातून व विविध प्रकरणांचा तौलनीक अभ्यास करून लिहीले असल्याचे सांगितले. गुटखा म्हणजे केवळ तंबाखु नसुन इतर सर्व प्रकारच्या व्यसनातुन मुक्त होण्यासाठी गावातील नागरिकांनी ग्रामसभेत गुटखा बंदीसाठी ठराव घेण्याचे व गावात तंबाखू खाणे, विकणे वा बाळगणे प्रतिबंधीत करण्यात यावे, असे सांगितले.

कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.के.अे.धरणे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, विविध प्रशासकीय विभागाचे विभागप्रमुख, पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Copyright ©