Breaking News यवतमाळ सामाजिक

यवतमाळ जिल्ह्यात विकास कामांना गती देण्यात येईल पालकमंत्री संदिपान भुमरे यांची स्वातंत्रदिनी ग्वाही

यवतमाळ दि. 15 ऑगस्ट : यवतमाळ जिल्हा विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहावा, यासाठी पालकमंत्री म्हणून समतोल विकासाची मी हमी देत असून शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने विकासाला गती देण्याचे काम यापुढे केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी दिली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालींदा पवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ, नगराध्यक्षा कांचन चौधरी, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अपर पोलिस अधिक्षक डॉ.के.अे.धरणे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री संदिपान भुमरे पुढे म्हणाले की शेतकरी, दुर्बल घटक यांचेसह सर्वसामान्य नागरिक यांना विकासाचा केंद्रबिंदू मानून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार विकासाच्या अनेक योजना राबवित आहे, जिल्ह्यात देखील विविध योजनांची प्रशासनाकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे.

कोरोनाची तीसरी लाट दुर्दैवाने आलीच तर तिला तोंड द्यायला शासन पूर्ण तयारीनिशी सज्ज असून जिल्ह्यात एकूण 5 हजार 681 इतक्या मोठ्या प्रमाणात बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. लहान मुलांसाठी ऑक्सीजन सुविधेसह विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. नागरिकांना उपचारासाठी त्यांच्या गावापासून दूर जावे लागू नये म्हणून तालुक्याच्या ठिकाणीच उपजिल्हा रूग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्यावत साधनसामुग्री तसेच ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. कोरोनाच्या मागील लाटेत 22 मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज पडली होती आता पुढील लाटेत ऑक्सीजनची टंचाई जाणवू नये म्हणून जिल्ह्यात 95 मेट्रीक टन ऑक्सीजन साठवण केली असून अजून 40 मे.टन ऑक्सीजन साठवणूक क्षमता विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. ऑक्सीजन उपलब्धतेसाठी त्यांनी प्रशासनाचे कौतुक देखील केले. कोरोनापासून बचावासाठी प्राप्त होणाऱ्या लस साठ्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत साडेआठ लाख लसीचे डोज देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

‘महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती’ योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 87 हजार 942 खात्यांवर कर्जमाफीची 646 कोटी 79 लाख रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेतल्यावार पात्र शेतकऱ्यांना पुन्हा 516 कोटी 63 लाख रुपये कर्ज वाटप केले आहे. तसेच चालु खरीप हंगामात आतापर्यंत 1 लाख 70 हजार 500 शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयाचे खरीप पीक कर्ज वाटप करून कर्जवाटपात अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा पहिल्या क्रमांकावर असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 22 हजार 990 घरकुले आणि राज्य पुरस्कृत योजने अंतर्गत 12 हजार 151 घरकुलांचे काम पुर्ण करण्यात आले आहे. तर सुमारे 9 लाख 80 हजार शिवभोजन थाळी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोना काळात कुणीही उपाशी राहू नये म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सुमारे पावनेदहा लाख क्विंटल मोफत गहु व तांदुळ वाटप केले असून विविध शासकीय योजनेतून अन्नधान्य वाटपात यवतमाळ जिल्हा राज्यात पहिल्या दहा मध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.

चालु हंगामात कापुस पिकविणाऱ्या 88 हजार 500 शेतकऱ्यांकडून 16 लाख 75 हजार क्विंटल कापूस, खरेदी करून मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी यवतमाळ जिल्हा राज्यात कापुस खरेदीत अग्रेसर असल्याचे सांगितले. ई-पीक पाहणी अॅपचा उपयोग करून स्वतःच्या पिकाची नोंद सातबारावर वेळच्या-वेळी नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी पालकमंत्री यांचे हस्ते वीरनारी, वीरमाता यांचा सन्मान करण्यात आला. कोरोना काळात उत्कृष्ठ काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी, शासकीय व खाजगी रुग्णालये तसेच कृषी विभागातील अधिकारी यांना प्रशस्तीपत्र देवून गौरवीण्यात आले. सखी वन स्टॉप योजनेच्या पोस्टरचे विमोचन व मतदार जागृती रथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, शेतकरी बांधव, देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या शुरविरांच्या विरमाता, विरपिता, विरपत्नी व त्यांचे कुटूंबिय, ज्येष्ठ नागरिक, सर्व जिल्हावासी तसेच या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकार बंधूंचे मी स्वागत करतो.

यावेळी लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, माजी सैनिक, विर पिता, विर माता, विर पत्नी, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.

गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही : एक कोरोनामुक्त

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात २१६१ बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 15 ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तसेच एक जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या एकूण ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात पाच व बाहेरजिल्ह्यात दोन अशी एकूण सात आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 742 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोनिही पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 742 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72822 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71028 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष नऊ हजार 478 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 36 हजार 554 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.26 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.0 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2161 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 13 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2161 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 13 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 774 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर ध्वजारोहन करतो तेव्हा. . .

यवतमाळ दि. 15 ऑगस्ट : ‘ध्वजारोहन… आणि तेही कलेक्टरच्या बंगल्यावर… माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या शासकीय निवासस्थानी स्वातंत्र्य दिनानिमित्त मिळालेला हा बहुमान माझ्या कायम स्मरणात राहणारा असून शासनाची शेतकऱ्यांप्रती असलेली संवेदना यातून प्रकट होते’ अशी प्रतिक्रीया यवतमाळ तालुक्यातील भारी या गावचे शेतकरी राजेश डफाळ यांनी व्यक्त केली.

आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी भारी येथील शेतकरी राजेश डफाळ या यांनी ध्वजारोजन केले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे व त्यांच्या कुटूंबियांनी शेतकरी राजेश डफाळ त्यांच्या पत्नी श्रीमती उषा डफाळ व मुलगा ओम व यशवंत डफाळ यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार केला

49 वर्षीय शेतकरी श्री. डफाळ यांनी आज प्रथमच ध्वजारोहन करायला मिळाल्याबद्दल व पोलीस मानवंदना स्विकारतांना आलेले दडपनासोबतच झालेला आनंद व जिल्हाधिकारी येडगे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे व त्यांचे कुटूंबिय, नायब तहसिलदार अजय गौरकार, अंगरक्षक प्रदिप मानकर, संकेत बोपचे, जिल्हाधिकारी याच्या शासकीय निवासस्थानी असलेले महसुल व पोलीस कर्मचारी, सुरक्षा रक्षक इ. उपस्थित होते.

Copyright ©