Breaking News यवतमाळ सामाजिक

शून्य पॉझिटिव्ह : शून्य कोरोनामुक्त गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात २१६१ बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 14 ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तसेच कोणीही कोरोनामुक्त झाले नाही त्यामुळे दिवसभराच्या अहवालाची आकडेवारी शून्य पॉझिटिव्ह व शून्य कोरोनामुक्त अशी राहीली. सध्या एकूण ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात सहा व बाहेरजिल्ह्यात दोन अशी एकूण आठ आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1287 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोनिही पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 1287 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72822 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71027 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष आठ हजार 759 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 35 हजार 785 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.27 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.0 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2160 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 14 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2161 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 13 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 774 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 1 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 631 बेड शिल्लक आहेत.

________________________________________

प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करा

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या सभेत जिल्हाधिकारी यांचे निर्देश

सबळीकरण योजनेंतर्गत जमीनी देण्याची कार्यवाही तत्परतेने करावी

दिव्यांग नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात यावे

यवतमाळ दि. 14 ऑगस्ट : अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत प्रलंबित प्रकरणे पाठपुरावा करून निकाली काढावे, तसेच सापडून येत नसलेल्या आरोपींना पकडण्यासाठी सायबर सेलची मदत घेवून अटक करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिले.

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची मासीक आढावा सभा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे काल आयोजित करण्यात आली होती. यावेळी समजाकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी पियुष चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेचाही आढावा घेतला. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जमीन मिळावी यासाठी तत्परतेने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

दिव्यांग कल्याण समितीची सभा

दिव्यांग कल्याण समितीच्या आढावा सभेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिव्यांग नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्वप्रथम जिल्ह्यातील दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात यावे, असे सांगितले. तसेच ज्यांचेकडे दिव्यांग प्रमाणपत्र नाही त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देणे, ज्यांचे प्रमाणपत्र जुने आहे व अद्याप ऑनलाईन केले नाही असे ऑफलाईन प्रमाणपत्र ऑनलाईन करणे, बोगस प्रमाणपत्रांच्या तक्रारींची पारदर्शकपणे चौकशी करणे, दिव्यांगासाठीचा पाच टक्के राखीव निधी विहित निकषाप्रमाणे खर्च करणे, पुर्वनिदान झालेल्या दिव्यांग बालकांना शस्रक्रियेसाठी पाठपुरावा करणे व त्यांना वैद्यकीय सुविधा पुरवण्याबाबत सूचना दिल्या.

समाजकल्याण कार्यालयामार्फत 4925 युडिआयडी (वैश्विक ओळखपत्र) गरजू दिव्यांगांना त्यांच्या घरपोच पोहोचविण्यात आले असल्याची माहिती समाजकल्याण अधिकारी पियुष चव्हाण यांनी यावेळी दिली.

बैठकीला समाज कल्याण विभाग, पोलीस विभाग, नगरपरिषद, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण तसेच इतर संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

_______________________________________

माहिती विभागाचे सचिव तथा महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांच्या भाषणाने

उद्या महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा समारोप

 

नवी दिल्ली, दि. १४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या भाषणाने महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा उद्या रविवार, १५ ऑगस्ट २०२१ रोजी समारोप होणार आहे .

 

महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु आहे. व्याख्यानमालेत एकूण ६० व्याख्यान पूर्ण झाली असून १५ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता डॉ.दिलीप पांढरपट्टे हे व्याख्यानमालेचे समारोपीय भाषण करणार आहेत.

 

महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, राजकारण, समाजकारण अशा विविध विषयांवर नामवंत मान्यवरांचे व्याख्याने झाली आहेत. व्याख्यानमालेच्या पूर्वाधात ४४ आणि उत्तरार्धात १६ असे एकूण ६० व्याख्यान पूर्ण झाली आहेत.

 

डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या विषयी

 

डॉ दिलीप पांढरपट्टे हे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आहेत, त्यासह ते प्रथितयश लेखक आणि कवी आहेत. त्यांनी एलएलएम, एमबीए या पदव्यांसह पीएचडी संपादन केली आहे. त्यांनी सनदी अधिकारी म्हणून 1989 मध्ये सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कारकिर्दीला सुरूवात केली. कोकण विभागाचे सहायक आयुक्त, कोकणविभागाचे प्रादेशिक विशेष अधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव, सिंधुदुर्ग व रायगड जिल्हा परिषदांचे मुख्यकार्यकारी अधिकारी तसेच धुळे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

प्रशासकीय सेवा बजावताना, डॉ. पांढरपट्टे यांनी आपली वाड्मयीन व साहित्यिक सर्जनशीलता फुलवित ठेवली आहे. ‘घर वाऱ्याचे, पाय पाऱ्याचे’ हा ललित लेखसंग्रह, ‘कथा नसलेल्या कथा’ कथासंग्रह, ‘बच्चा लोग ताली बजाव’ विनोदी लेखसंग्रह, उर्दू शायर आणि शायरीचा परिचय देणारे ‘शायरी नुसतीच नाही’, ‘शब्द झाले सप्तरंगी’ मराठी गजल संग्रह, ‘सव्वाशे बोधकथा’ बोधकथा संग्रह, ‘डॉ. राम पंडित संपादित मराठी गजल’ तसेच कुळकायद्यातील घर ठाण हक्काबाबत माहिती देणारे ‘राहील त्याचे घर’ आदी त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत.

डॉ.पांढरपट्टे हे २२ जानेवारी २०२० पासून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

रविवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण

 

रविवार, १५ ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारित होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.

Copyright ©