यवतमाळ सामाजिक

विजयकुमार ठेंगेकर यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार 2021 जाहीर

मुंबई येथील शानदार ऑनलाईन सोहळ्यात होणार सन्मानित

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी , मुंबई द्वारा दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार 2021 यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांना प्राप्त झाला असून दिनांक 3 सप्टेंबर 2021ला मुंबई येथे होऊ घातलेल्या शानदार ऑनलाईन पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना सन्मानित केले जाणार आहे.

विजयकुमार ठेंगेकर यांनी त्यांच्या आजवरच्या सेवा कार्यकाळात गावाची तहान भागविण्यासाठी गावाची पाणी टंचाई लक्षात घेऊन ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये चर्चा घडवून आणली आणि चक्क दोन विहिरींचे अधिग्रहण मोफत मिळवून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आपल्या गावाचे नाव मोठे करून वृत्तपत्राची हेडलाइन बनवले. आणि गावाची कायमस्वरूपी तहान भागविण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना खेचून आणली आज ती पूर्णत्वास जात आहे.

गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून गावांमध्ये निवासाकरिता अतिक्रमण करून राहणाऱ्या ग्रामस्थांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्यादृष्टीने माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी यवतमाळ, तहसीलदार आर्णी व गटविकास अधिकारी पंचायत समिती, आर्णी यांच्या मार्फत पत्रव्यवहार करून अखेर सर्वांसाठी घरे 2022 च्या माध्यमातून 33 प्रकरणांना यशस्वीरित्या मंजुरात मिळवून दिली.

गावात ग्रामपंचायत कार्यालयाचे अस्तित्व नव्हते. शाळेच्या एखाद्या रूम मध्ये किंवा झाडाखाली मासिक सभा, ग्रामसभा घ्याव्या लागायच्या. मात्र विजयकुमार ठेंगेकर यांनी शाळेच्या आवारात समाज भवनाची एक रूम घेऊन ग्रामपंचायत कार्यालय निर्माण करून 14 वा वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय सुसज्ज आणि समृद्ध केले.

शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत कार्यकारणीला सोबत घेऊन मा. तत्कालीन आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या विकास निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा 100% डिजिटल केली शिवाय जिल्ह्यात तृतीय क्रमांकावर तर आर्णी तालुक्यात प्रथम क्रमांकावर अंगणवाडी डिजिटल करण्याचा सन्मान गणगाव ग्रामपंचायतीने विजयकुमार ठेंगेकर यांच्या माध्यमातून मिळवून महिला व बाल कल्याण सभापती सौ अरुणताई खंडाळकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण जाधव साहेब यांच्या हस्ते उदघाटन केले.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त करून ओ. डी. एफ. करण्यात आलेले आहे.

तसेच प्रतिवर्षी ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नाच्या पाच टक्के निधी मधून दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवून मदतीचे वाटप करण्यात येत आहे.

महिला व बालकल्याण अंतर्गत महिला मेळावा, हळदीकुंकवाचे कार्यक्रम, अंगणवाडीतील मुलांना गणवेशाचे वाटप आणि महिला सक्षमीकरण या अंतर्गत बरेच उपक्रम दरवर्षी विजयकुमार ठेंगेकर राबविण्यात असतात.

मागासवर्गीय कल्याण अंतर्गत निधी खर्च करतांना मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व इतर वैयक्तिक स्वरूपाचे लाभ देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, शबरी आवास योजना अंतर्गत सुंदर आणि विहित मुदतीत घरकुल पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांचा सन्मान करून घरकुल बांधकामास प्रोत्साहन दिले आहे.

सृष्टी संवर्धनाकरिता वृक्ष लागवड करून त्याचे पूर्णता संगोपन करण्याची गरज आहे हे लक्षात घेऊन प्रतिवर्षी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याकरिता ते तत्पर असतात.

कॅशलेस व्यवहारासाठी मार्गदर्शन करतांना नाबार्ड वित्तीय साक्षरता अभियानाचा शुभारंभ त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीतून केला.

कन्या व स्त्री भ्रूण हत्या आणि मुलींच्या अस्तित्वास वाचविण्याच्या दृष्टीने तसेच त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी या बालिका जन्मास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने “लेकीच्या जन्माचे स्वागत” हा उपक्रम ग्रामसेवक ठेंगेकर यांनी अस्तित्वात आणला आणि ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नियमितपणे राबवीत असतात.
यात जन्मास आलेल्या कन्येचा व माता-पित्यांचा सन्मान केला जातो.

ग्रामस्तरावर राबविल्या जातात सन्मान योजना

एवढेच नाही तर गावात विकासात सदैव मदत करणाऱ्या ग्रामस्थांकरिता “ग्राम गौरव सन्मान” विध्यार्थी वर्गास प्रोत्साहन देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांकरिता “गुणवंत विद्यार्थी सन्मान” आणि कर्तव्यनिष्ठ शिक्षकांप्रती सदभावना व्यक्त करण्यासाठी गुरुंसाठी “गुरू गौरव सन्मान” स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कार्यात उत्कृष्ट सहभाग दर्शविणाऱ्या ग्रामस्थांना “स्वच्छता दूत सन्मान” तर विविध उपक्रम राबविण्यात सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांस “उपक्रम सहकारीता सन्मान” अशा स्वरूपाचे पुरस्कार विजयकुमार यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामपंचायती मार्फत चालू करून गावात एक वेगळा इतिहास रचला आहे.

कोरोना अर्थात कोविड-19 या महामारीचा सामना करीत असतांना कोरोना प्रतिबंध समितीला सोबत घेऊन यशस्वीरित्या कार्य पार पाडले आहे शिवाय सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थ आणि कर्मचारी वर्गास त्यांनी कोरोना वारियर्स सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये रमणारा ग्रामसेवक

शनिवार… सकाळची शाळा आणि या वेळेमध्ये आवर्जून उपस्थित राहणारे ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर आणि त्यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत शनिवारी भरविली जाणारी दप्तर मुक्त शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गुणांना चालना देणारी बालसभा… यात ते स्वतः विद्यार्थ्यांना बौद्धिक खेळ व उपक्रम शिकवितात व त्यांच्यामध्ये रमतात देखील.

समाजप्रतीचे ऋण आणि दातृत्व दाखविणारा ग्रामसेवक

विजयकुमार ठेंगेकर हे केवळ आपल्या नोकरीपूरतेच किंवा ग्रामपंचायत पुरतेच कार्य न करता ते आपल्या “सुविचार- संस्कार कलश” या यांच्या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दुर्बल आणि गरजू व्यक्तींना निश्चितपणे वेळोवेळी मदत करीत असतात. आजवर त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप, शिक्षणासाठी आर्थिक मदत, गरजूंना कापडे आणि गंभीर आजारात आजारी व्यक्तीला उपचारासाठी आर्थिक सहकार्याची गरज पडली तर त्यांना आर्थिक मदतीचा हात पण देत असतात. कोरोना काळात त्यांनी दिव्यांग, आर्थिक दुर्बल व ज्यांचा व्यवसाय हिरावला गेला अशांना आर्थिक मदतीसोबतच अन्न-धान्य किट व कापडे पुरविण्यासारखी मदत केली आहे. आणि ते या प्रकारचे उपक्रम अविरत राबवित असतात.

याच सर्व कार्याची दखल घेऊन विजयकुमार ठेंगेकर यांना “राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार 2021” ने दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत मुंबई येथे पार पडणाऱ्या ऑनलाईन सोहळ्यात सन्मानचिन्ह, गौरवपदक, मानपत्र, महावस्त्र, मानकरी बॅच, आणि मानाच्या फेट्याने सन्मानित करण्यात येणार आहे.

यापूर्वी विजयकुमार ठेंगेकर यांना शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानासाठी तत्कालीन जिल्हा परिषद, यवतमाळ च्या अध्यक्षा सौ माधुरीताई आडे यांच्याहस्ते गौरविण्यात आले आहे तर जिल्हा परिषद अंतर्गत दिल्या जाणाऱ्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कार 2019-2020 साठी देखील त्यांची निवड झाली आहे.

या पुरस्कार निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

Copyright ©