विदर्भ सामाजिक

आत्मनिर्भर भारत निर्माणासाठी हीच योग्य वेळ- नितीन गडकरी

– नमस्ते भारत प्रदर्शनाचे उद्घाटन

नागपूर- उद्योगांसमोरील समस्यांचे संधीत रूपांतर करून स्वदेशी व स्वावलंबनाची कास धरीत, तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत आत्मनिर्भर भारत निर्माणासाठी हीच योग्य वेळ असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान व डे आयडियाज सिंगापूर यांच्यातर्फे आयोजित नमस्ते भारत प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. ते म्हणाले, नमस्ते भारत ही चांगली संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहिले आहे. ते प्रत्यक्षात साकार करण्यासाठी महिला उद्योजिकांनी आयात कमी कशी करता येईल आणि निर्यात कशी वाढेल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. नवीन संशोधन, कौशल्य, तंत्रज्ञान, विज्ञान, नावीन्य, यशस्वी प्रयोग म्हणजेच ज्ञान होय. आणि ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्याची आज देशाला खरी गरज आहे.

अनेक महामार्ग, एक्सप्रेस हायवे, लॉजिस्टिक पार्क आम्ही तयार करीत आहोत. यामुळे वाहतूक, इंधन खर्चात बचत होईल. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धेसाठी आम्हाला वाहतूक खर्च कमी करावा लागेल. उत्पादित वस्तुच्या दर्जाशी कोणताही समझोता करता येणार नाही. वस्तूचे पॅकेजिंग आकर्षक असले पाहिजे, किंमत कमी असली पाहिजे आणि पुरवठा वेळेत होणे, हे आवश्यक आहे, असे सांगताना गडकरी म्हणाले, यासोबतच कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्राचा तसेच 115 मागास जिल्ह्यांचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासही करण्याची गरज आहे. त्यामुळे मागास भागात उद्योग निर्माण होतील व रोजगाराची समस्या सुटेल. परिणामी भुकमरी आणि गरिबी दूर करणे शक्य होईल. आज बेरोजगारी आणि गरिबी आपल्या अर्थव्यवस्थेसमोरील मोठे आव्हान आहे. ही समस्या संपविण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास, स्वदेशी आणि स्वावलंबनाची कास धरीत विकास केल्याशिवाय आत्मनिर्भर भारत निर्माण होणार नाही.

नवीन उद्योजिकांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या उद्योगांमध्ये करून समस्या सोडविणे आवश्यक असल्याचे सांगतानाच गडकरी म्हणाले, नवीन तंत्रज्ञान गावांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आज 80 हजार कोटी रुपयांची ग्रामीण अर्थव्यवस्था येत्या 5 वर्षात 5 लाख कोटींची करण्याचे लक्ष्य आमच्यासमोर आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.

Copyright ©