Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात पाच पॉझिटिव्ह ; दोन कोरोनामुक्त जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2151 बेड उपलब्ध

 

यवतमाळ दि.28 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 463 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी पाच रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह असून उर्वरित 458 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात ॲक्टीव पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 11 व जिल्ह्याबाहेर दोन झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72797 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71000 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये दारव्हा येथील दोन, उमरखेड येथील एक, यवतमाळ येथील एक व इतर जिल्ह्यातील एका रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 97 हजार 983 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 24 हजार 887 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.43 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 1.08 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2151 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 23 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2151 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 19 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 768 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 3 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 752 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी एक बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 631 बेड शिल्लक आहेत.

_____________________________________

उदापूर गाव पुनर्वसनबाबत विभागीय आयुक्तांनी

जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

 

यवतमाळ दि.28 जुलै : टाकळी डोल्हारी मध्यम प्रकल्पाअंतर्गत बाधीत उदापूर गावठान पुनर्वसनबाबत विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी गावकऱ्यांच्या समस्या आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात जाणून घेतल्या.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, सिंचन विभाग अमरावतीचे मुख्य अभियंता अ.ना.बहादुरे, उपआयुक्त गजेंद्र बावणे, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अधिक्षक अभियंता सुनिल चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, कार्यकारी अभियंता नितीन बनसोड, जिल्हा पुनर्वसन अधिकारी संगीता राठोड, भुसंपादन अधिकारी सविता चौधर उपस्थित होते.

उदापूर गावाच्या पुनर्वसनासाठी शासनातर्फे देवू केलेल्या जागेसंदर्भात गावातील विविध गटासोबत विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी चर्चा केली व पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी संबंधीतांनी आपले लेखी आक्षेप तात्काळ सादर करण्याचे सांगितले.

बैठकीला संबंधीत अधिकारी व गावातील प्रातिनिधिक नागरिक उपस्थित होते.
____________________________________

आयकर विभागाच्या खेळाडू पदभरतीकरिता क्रिडा विभागाच्या सूचना

राष्ट्रीय शालेय स्पर्धेतील कामागिरी प्रमाणपत्रासाठी १० ऑगस्टपुर्वी करा अर्ज

यवतमाळ, दि. 28 जुलै : केंद्र शासनाच्या आयकर विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, आंतरविद्यापीठ इत्यादी खेळाच्या स्पर्धेत सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडूंकरीता विविध पदांच्या खेळाडू भरती करीता जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. यात आवेदन करण्यासाठी राष्ट्रीय शालेय स्पर्धेतील कामगिरी प्रमाणपत्राची आवश्यकता असलेल्या संबंधीत खेळाडूनी दिनांक १० ऑगस्ट पुर्वी जिल्हा क्रिडा कार्यालयास अर्ज सादर करावे.

जाहिरातीमध्ये प्रसिध्द करण्यात आल्यानुसार परिच्छेद-२ मध्ये पात्र खेळ प्रकार नमुद केले असून, त्यानुसार फक्त पुरुष व महिला खेळाडूंकरीता एकूण अनुक्रंमांक १ ते १६ हे खेळ समाविष्ठ असुन यामध्ये मैदानी स्पर्धा, जलतरण, स्क्वॅश, बिलियडर्स, बुध्दीबळ , कॅरम , ब्रिज,बॅडमिटन, लॉनटेनिस , टेबल टेनिस, शुटींग, वेटलिफ्टींग, कुस्ती, बॉक्सींग, ज्युदो व जिम्नॅस्टिक्स य खेळाकरीता महिला व पुरुष हे दोन्ही खेळाडू आवेदन पत्र सादर करु शकतात. परंतु बॉडी बिल्डींग (७० किलो आतील व ७० ते ८० किलो) व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, कबड्डी व क्रीकेट या ५ खेळाकरीता फक्त पुरुष खेळाडू आवेदनपत्र सादर करु शकतात. उपरोक्त ५ खेळाकरीता माहिला खेळाडू आवेदनपत्र सादर करु शकत नाही असे परिपत्रकात नमुद करण्यात आलेले आहे.

सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांचे दि. १२ जुलै २०२१ च्या पत्रान्वये जाहिरातीमध्ये नमुद करण्यात आलेल्या परिच्छेद ३ मधील मुद्दा क्र. (III) अन्वये भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजीत केलेल्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत, महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू पात्र ठरणार आहेत. परिच्छेद ४ व परिच्छेद ५ मधील मुद्दा क्रमांक (IV) अन्वये संबंधीत खेळाडूंची शालेय राष्ट्रीय स्पर्धेमधील कामगीरी पाहता संचालनयाव्दारे प्रमाणीत करुन देणे आवश्यक आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील जे खेळाडू भरतीच्या अनुषंगाने अर्ज दाखल करीत आहे व जे खेळाडू भारतीय शालेय महासंघाव्दारे आयोजीत (S.G.F.I.) राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग, प्रविण्य प्राप्त केलेले आहे व जाहिरातीमध्ये नमुद करण्यात आलेल्या खेळानुसार व वयोमर्यादेनुसार पात्र ठरणार आहेत, अशा खेळाडूंनी आपल्या क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्र विहित नमुन्यातील अर्ज परिपुर्ण भरुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे कार्यालयीन वेळेत दि.१० ऑगस्ट २०२१ पुर्वी सादर करावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी कळविले आहे.

Copyright ©