यवतमाळ सामाजिक

कृषी सलंग्न विभागांनी एकजुटीने शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहचवावे

 

विसाव्या शास्त्रीय सल्लागार समिती सभेत कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे आवाहन

 

यवतमाळ, दि. 28 जुलै : शेतकऱ्यांचा आर्थिक, सामाजिक दर्जा उंचाविण्यासाठी व सर्वांगीन विकासासाठी जिल्ह्यातील कृषी व सलंग्न विभागांनी एकजुटीने येवुन शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहचवीण्याचे कार्य करावे, असे आवाहन पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथे 26 जुलै रोजी 20 व्या शास्त्रीय सल्लागार समितीची सभा कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. सभेला विस्तार शिक्षण संचालक डॉ. विलास खर्चे, अटारी, पुणे चे संचालक डॉ. लखनसिंग, प्रधान शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. हुच्छे, डॉ. एस. एन. रोकडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. के. डी. ठाकुर, डॉ. आर. एन. काटकर, डॉ. प्रमोद यादगीरवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. भाले पुढे म्हणाले की शेतकऱ्यांना जंगली जनावरांपासन होत असलेला त्रास कमी करण्याकरीता सर्व संलग्न विभागांनी एकत्र येवून नियोजन करावे. शेतकऱ्यांनी पिकांची फेरपालट करण्याकरीता कडधान्य वर्गीय पिकांची लागवड करावी व उत्पादीत कच्च्या मालाची प्रक्रिया उद्योग उभारणी करीता अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे. खत व पाण्याचे नियोजनकरीता माती परिक्षण आधारीत व्यवस्थापन करावे, या करीता कृषी विज्ञान केंद्राने भरीव कार्य करावे, असेही कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी सांगितले.

डॉ. सुरेश नेमाडे यांनी यांनी सभेचे महत्त्व व उद्देश या विषयी प्रास्ताविकात माहिती दिली. तर डॉ. विलास खर्चे, डॉ. लखनसिंग यांनी देखील सभेला मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन विषय विशेषज्ञ मयुर ढोले यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. एस.एस. वाणे यांनी मानले.

सभेला कृषी विकास अधिकारी, मत्स विकास अधिकारी, महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा क्षेत्र सहायक, जिल्हा रेशीम कार्यालय, अग्रणी बॅकेचे प्रबंधक, जिल्हा आरोग्य अधिकारी, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण या संलग्न विभागाचे सदस्य प्रतिनिधी उपस्थीत होते.

Copyright ©