Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात एक पॉझिटिव्ह ; एक कोरोनामुक्त जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2158 बेड उपलब्ध

 

यवतमाळ दि.27 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यातील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे तसेच एक जण कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यात ॲक्टीव पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या सात व जिल्ह्याबाहेर एक झाली आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 375 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी झरी जामणी येथील एका रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह असून उर्वरित 374 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72792 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70998 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 97 हजार 293 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 24 हजार 419 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.44 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.27 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2158 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 16 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2158 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 13 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 774 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 2 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 753 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी एक बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 631 बेड शिल्लक आहेत.

______________________________________

पालक गमावलेल्या बालकांना शासकीय योजनेतून अधिकाधिक मदत करा

कृतीदल समिती आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

यवतमाळ दि.27 जुलै : जिल्ह्यात कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना तसेच कोविड व्यतिरिक्त इतर कारणांनी पालक गमावलेल्या बालकांना शासनाच्या बालसंगोपान योजनेसोबतच त्यांच्या गरजेनुसार शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक सहाय्य देणाऱ्या योजनांमधून अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात.

जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामार्फत बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दल समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे काल आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. एम.आर.ए. शेख, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सुनिल घोडेस्वार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुनिल बल्लाळ, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यंवशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस.आगाशे, शासकीय निरीक्षण गृह व बालगृहाच्या समुपदेशक पुजा राठोड, बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, पालक गमावलेल्या बालकांची प्रलंबित गृह चौकशीची व इतर तपासणीची काम पुढील सात दिवसात पुर्ण करण्यात यावे जेणेकरून त्यांना मदतीचे प्रस्ताव लवकरात लवकर पुढे पाठविणे सोयीचे होईल. अशा मूलांसाठी वस्तीगृह, जात प्रमाणपत्र, अनाथ मुलांसाठीच्या योजना, सामाजिक सहाय्य योजना, मागासवर्गीयांच्या योजना, जिल्हा परिषदेच्या योजना, आर्थिक मदतीच्या योजना अशा विविध योजना आहेत. त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांना योजनांचा लाभ द्यावा.

कुमारी मातांची माहिती अद्यावत करून त्यांना सक्षम करण्यासाठी शासकीय योजनांद्वारे मदत करण्याचे तसेच लहान मुलांचे शोषण होऊ नये म्हणून पॉक्सो कायद्याबाबत जनजागृती करण्याचेही जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोविडमुळे 362 बालकांना आपले पालक गमवावे लागले असून यात 51 प्रकरणात आई, 301 प्रकरणात वडील तर 10 प्रकरणात आई व वडील असे दोन्ही पालक गमवावे लागले असल्याची माहिती जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी ज्योती कडू यांनी सादर केली. या 362 पैकी 305 बालकांची गृह चौकशी पुर्ण करून 256 बालकांना बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात येवून बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आला असल्याचे तसेच 10 अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्राची शिफारस व त्यांना आर्थिक सहाय्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

बैठकीला महिला व बालकल्याण विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
______________________________________

संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाची स्माईल योजना

कोरोनामुळे कुटूंबप्रमुख गमावलेल्या कुटूंबाचे पुनर्वसनासाठी कर्ज

यवतमाळ दि.27 जुलै : अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील कुटूंबप्रमुखाचा कोविडमुळे मृत्यू झाला असल्यास, त्या कुटूंबियाचे पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्या यांच्यामार्फत स्माईल (support for marginalized individuals for Livelihoods Enterperie- SMILE) अंतर्गत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना राबविण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत रुपये 1 लक्ष ते 5 लक्ष पर्यंत मुल्य असलेल्या प्रकल्पाकरिता एनएसएफडीसी सहभाग 80 टक्के, भांडवल अनुदान 20 टक्के, व्याजदर 6 टक्के राहील.

सदर योजनेकरिता अर्जदार चर्मकार समाजातील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्‍न 3 लक्ष रुपयेपर्यंत असावे, अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटूंब प्रमुखाच्या कुटूंबातील सदस्य असावा, कुटूंबप्रमुखाच्या रेशनकार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक आहे.

आवश्यक कागदपत्रे : मयत व्यक्तीचे नाव पत्ता, मृत्यू प्रमाणपत्र, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला (3 लक्ष पर्यंत), रेशन कार्ड, वयाचा पुरावा आवश्यक राहील.

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटूंबातील व्यक्तीने उपरोक्त वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अथवा https://forms.gle/Q485fSUQYEuL4xUx7 या लिंकवर भरण्यात यावी, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक रमाकांत पांडे यांनी केले आहे.

______________________________________
शासकीय तंत्रनिकेतन प्रवेशप्रकियेला 30 जुलै पर्यंत मुदतवाढ

यवतमाळ दि.27 जुलै : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रकिया राज्यभरात ऑनलाईन पध्दतीने सुरु झालेली आहे. याची अंतिम मुदत दि. 23 जुलै 2021 होती. परंतु प्रथम वर्षाच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला राज्य तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे दि. 30 जुलै 2021 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. याकरीता प्रवेशच्छुक विद्यार्थ्यांना www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून अर्ज नोंदणी करता येणार आहे.

त्याचप्रमाणे बारावी उत्तीर्ण (विज्ञान/ टेक्नीकल / व्होकेशनल व आयटीआय उत्तीर्ण) विद्यार्थ्यांनी थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनाक 3 ऑगस्ट 2021 आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त दहावी/बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रकियेकरीता नोंदणी करुन प्रवेश अर्ज भरावे व वाढीव मुदतीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. डी. एन. शिंगाडे यांनी कळविले आहे.

_____________________________________

कृषी योजनेत पात्र लाभार्थ्यांनी महाडीबीटीवर कागदपत्रे अपलोड करावी

यवतमाळ दि.27 जुलै : कृषी यांत्रिकीकरण तसेच सुक्ष्म सिंचन घटकांतर्गत विविध योजनेतुन माहाडीबीटी पोर्टलवर जिल्ह्यातील 10 हजार 514 लाभार्थ्यांची निवड झाली आहे. यातील चार हजार लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली आहेत, उर्वरीत लाभार्थ्यांनी देखील आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. कृषी विभागाने मोबाईल अॅप तयार केले असून त्याद्वारे कागदपत्रे अपलोड करणे सुलभ झाले आहे.

यांत्रिकीकरण घटकासाठी सातबारा, आठ-अ, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, तपासणी अहवाल, अनुसुचित जमाती प्रवर्गातुन निवड झाल्यास वैध जात प्रमाणपत्र तसेच सुक्ष्म सिंचन घटकासाठी सातबारा, आठ-अ, सिंचन स्त्रोताची नोंद, इ. कागदपत्रे तर अनुसुचित जमाती प्रवर्गातुन निवड झाल्यास वैध जात प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी.

ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली आहेत, त्यांना पूर्व संमती देण्यात आली आहे. सुक्ष्म सिंचन या घटकांतर्गत ज्या लाभार्थ्यांना पूर्व संमती मिळुनही सुक्ष्म सिंचन कार्यन्वित केले नाहीत, अशा शेतकऱ्यांनी सुक्ष्म संच प्रक्षेत्रावर कार्यान्वित करुन देयेके अपलोड करावी. विहीत मुदतीत संच कार्यान्वित करुन देयके अपलोड न केल्यास दिलेली पूर्व संमती रद्द होईल तसेच महाडिबीटी पोर्टलमधुन अर्ज रद्द होतील. ज्या लाभार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड झाली आहे, त्यांनीदेखील कागदपत्रे अपलोड करावी. अधिक माहीतीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.

______________________________________

कोविड अंतर्गत खावटी योजनेचा लाभ वितरीत

अनुसूचित जमातीच्या वंचित लाभार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

यवतमाळ दि.27 जुलै : कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या उदरनिर्वाहाच्या समस्येवर मात करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत खावटी अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसदच्या कार्यक्षेत्रातील पुसद, उमरखेड, महागांव, आर्णी, दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्यामधील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांचे खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळण्यासाठी एकूण 18201 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 14129 अर्जाना मंजुरी प्राप्त झाली आहे, व 13795 लाभार्थ्यांचे खात्यावर डी.बी.टी. व्दारे प्रत्येकी रुपये 2000 जमा करण्यात आले आहे. तसेच 7430 खावटी किट प्राप्त असून त्यापैकी 7080 पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आल्या आहेत व उर्वरीत अर्जावर मंजुरी प्राप्त करणे बाबत कार्यवाही सुरू आहे.

तरी वंचित अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी तीन दिवसाचे आत प्रकल्प कार्यालयामध्ये संपुर्ण कागत्रपत्रांसह अर्ज सादर करावेत. अधिक माहीतीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद जि. यवतमाळ या कार्यालय संपर्क करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी सावन कुमार यांनी केले आहे.

______________________________________

 

सोयाबीन पिकातील कीड व्यवस्थापन विषयक कृषी सल्ला

यवतमाळ दि.27 जुलै : यवतमाळ येथील कृषी विज्ञान केंद्राद्वारे जिल्ह्यात केलेल्या कीड सर्वेक्षण व पीक पाहणी नुसार सोयाबीन पिकातील खोड माशी व चक्र भुंगा किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर आढळला आहे. त्यापासून संभाव्य सोयाबीन पिकाचे नुकसान टाळण्याकरिता किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास पुढील उपाय योजना करण्याचा सल्ला कृषी विज्ञान केद्राने दिला आहे.

सोयाबीन पिकावर प्राथमिक स्वरूपाचा खोड किडीचा प्रादुर्भाव असल्यास त्वरित 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकावरील खोडमाशी व चक्रभुंगा किडीने आर्थिक नुकसान पातळी (5 ते 10 टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे किंवा रोपे) ओलांडली असल्यास रासायनिक कीड व्यवस्थापनाकरिता केंद्रीय कीटकनाशक मंडळ, फरीदाबाद यांचे लेबल क्लेम नुसार इथीऑन 50 टक्के ई.सी. 15ते 30 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के ई सी 7 मिली किंवा क्लोरणट्रनिलीप्रोल 18.5 टक्के एस सी 2.5 मिली किंवा लेम्बडा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के + थायमिथोक्झाम 12.6 टक्के झेडसी 2.5 मिली या पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी असे कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे यांनी कळविले आहे.

Copyright ©