Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही ; एक कोरोनामुक्त

जिल्ह्यात ॲक्टीव पॉझिटिव्ह केवळ सात रूग्ण
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2154 बेड उपलब्ध
यवतमाळ दि.25 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही तर एक जण कोरोनामुक्त झाला असून जिल्ह्यात ॲक्टीव पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या केवळ सात राहिली आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 555 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणीही पॉझिटिव्ह आढळून न आल्याने सर्व 555 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72790 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70997 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 96 हजार 726 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 23 हजार 820 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.45 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी शुन्य आहे तर मृत्युदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2154 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 20 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2154 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 18 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 769 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 2 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 753 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

*नैसर्गिक आपत्तीमुळे पीकनुकसान झाल्याच्या सूचना विमा कंपन्यांना त्वरित द्याव्या*
– जिल्हाधिकारी अमोल येडगे
यवतमाळ दि. 25 जुलै ; पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झाल्याच्या सूचना 72 तासाच्या आत संबंधित विमा कंपनीला देण्यात याव्या, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
खरीप हंगाम २०२१ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबविली जात आहे. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमेच्या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते.
माहे जूलै महिन्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीने तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेत पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. पीक विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे उपरोक्त बाबींमुळे नुकसान झाल्यास पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या पूर्वसूचना शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून ७२ तासामध्ये विहित मार्गाने विमा कंपनीस देणे आवश्यक आहे.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमे अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पिक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत क्रॉप इंश्युरन्स ॲप / संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक / बँक / कृषी व महसूल विभाग यांना कळविण्यात यावे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक
असेल. या बाबी अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या पिक नुकसानीबाबतची पूर्वसूचना शेतकऱ्यांनी
पिक नुकसान झाल्यापासून ७२ तासादरम्यान वैयक्तिकरित्या मोबाईल अॅपद्वारे, विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक अथवा लेखी स्वरुपात विमा कंपनीच्या तालुका/जिल्हा कार्यालयात किंवा कृषी/महसूल विभागास देणे आवश्यक आहे.
याबाबत अधिक तपशिलासाठी तात्काळ नजीकच्या कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय )
राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर
मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत

मुंबई दि २५: कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

२७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला तरी या आपत्तींमुळे तो साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मिडीया व ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे,संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पडावे असेही मुख्यमंत्री म्हणतात.

Copyright ©