Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात एक पॉझिटिव्ह ; दोन कोरोनामुक्त जिल्ह्यात ॲक्टीव पॉझिटिव्ह केवळ आठ रूग्ण जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2154 बेड उपलब्ध

 

यवतमाळ दि.24 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात एक नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला तर दोन जण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात ॲक्टीव पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या केवळ आठ राहिली आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 352 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी झरीजामणी येथील एक रूग्ण पॉझिटिव्ह असून उर्वरित 351 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72790 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70996 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 96 हजार 115 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 23 हजार 262 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.46 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.28 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2154 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 20 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2154 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 18 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 769 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 2 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 753 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

____________________________________

पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्याने

धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे कामकाज अधीक कार्यक्षमतेने होईल

कार्यालयाच्या नूतन वास्तु उद्घाटन प्रसंगी न्यायधीश चंद्रकांत भडंग

 

यवतमाळ दि.24 जुलै : कुठल्याही संस्थेचा कारभार परिणामकारकरित्या चालवण्यासाठी कुशल मानव संसाधन व संस्थेतील अद्ययावत पायाभूत सुविधा या दोन गोष्टींची नितांत आवश्यकता असते. यवतमाळ येथील धर्मदाय आयुक्त कार्यालयाला सुसज्ज कार्यालयीन इमारत मिळाल्याने दुसरी बाब आज पूर्ण झाली आहे. तर रिक्त पदेही भरून कुशल मानव संसाधनांची पुर्तता करण्यात येईल. त्यामुळे या कार्यालयाचे कामकाज भविष्यात नक्कीच अधीक कार्यक्षमतेने होईल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तथा धर्मदाय संघटनेचे पालक न्यायमुर्ती चंद्रकांत भडंग यांनी आज केले.

यवतमाळ येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन व लोकार्पण आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रकांत भडंग यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे धर्मदाय आयुक्त प्रमोद तरारे, अमरावती येथील धर्मदाय सहआयुक्त केदार जोशी, यवतमाळच्या सहायक धर्मदाय आयुक्त शिवकन्या मडके, धर्मदाय वकील संघाचे अध्यक्ष ॲङ दिलीप पांडे प्रामुख्याने उपस्थित होते.

न्या. भडंग पुढे म्हणाले की, धर्मदाय आयुक्त कार्यालयात सार्वजनिक हिताशी संबंधीत संस्थांचे वाद सोडविल्या जातात, त्यामुळे या कार्यालयामार्फत अप्रत्यक्षरित्या सार्वजनिक हिताची कामे होतात, ही बाब कौतुकास्पद आहे. मागील ५१ वर्षापासून भाडेकरारावरील इमारतीत असलेल्या यवतमाळ न्यास नोंदणी कार्यालयाला ज्याप्रमाणे शासनाच्या प्रशासकीय इमारतीत नवीन सुसज्ज कार्यालय प्राप्त झाले त्याप्रमाणे राज्यातील इतर कार्यालयांनाही लवकरात लवकर यवतमाळ प्रमाणेच स्वत:चे सुसज्ज कार्यालय मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही न्या.भडंग यांनी यावेळी सांगितले.

यवतमाळ येथील धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आज राज्याचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात येणार होते, तथापि संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी उद्भवलेली आपत्ती निवारण्यात मुख्यमंत्री ठाकरे व्यस्त असल्याने ते हजर राहू शकले नाही, मात्र त्यांनी या इमारतीच्या उद्घाटनाला शुभेच्छा दिल्या असल्याचे न्या. भडंग यांनी सांगितले.

मुंबई येथील राज्याचे धर्मदाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी अश्रु घेवून येणारे नागरिक या कार्यालयातून परत जातांना डोळ्यात आनंद घेवून गेले पाहिजे असे सांगून या खात्यामार्फत जनतेची सेवा करण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.केदार जोशी यांनी तंत्रज्ञानाने सोयीयुक्त कार्यालयात स्थलांतरीत होत असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

यवतमाळच्या सहायक धर्मदाय आयुक्त शिवकन्या मडके यांनी या नुतन वास्तुमधून जनसामान्यांना सेवा पुरविण्यास सज्ज असल्याचे सांगितले. नवीन इमारतीत न्यायादानासाठी दोन कक्ष, न्यायीकप्रणाली असलेली सुसज्ज संगणक यंत्रणा,पीठासीन अधिकाऱ्यांसाठी दोन निजी कक्ष, जलद सेवेकरिता दूरदृष्य न्यायदान प्रणालीची व्यवस्था, अधिकारी कर्मचारी यांचेकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्था, न्यास नोंदणीच्या ऑनलाईन कामासाठी इंटरनेट व्यवस्था, अभिलेख कक्ष आदि. व्यवस्था नूतन इमारतीत करण्यात आली असल्याची माहिती दिली.

कार्यक्रमाला सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे न्यायीक अधिकारी, कर्मचारी तसेच वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

__________________________________

 

व्याजमाफीची सवलत घेण्यासाठी पीक कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करावे

– जिल्हाधिकारी अमोल येडगे

राष्ट्रीयकृत बँकांनी महिनाअखेर पीककर्जाचे ८० टक्के उद्दिष्ट गाठावे

 

यवतमाळ दि.24 जुलै : जिल्ह्यातील ज्या जुन्या पीककर्जदार शेतकऱ्यांना व्याजमाफी सवलत प्राप्तीसाठी कर्जपरतफेडीची मुदत ३१ जुलै २०२१ रोजी संपत आहे, अशा अशा सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करून त्यांना एस.एम.एस., दुरध्वनी अथवा तलाठ्यांमार्फत संपर्क साधावा व त्यांना कर्ज भरून किंवा कर्ज नुतणीकरण करून व्याजमाफीचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहीत करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज बँकर्स आढावा बैठकीत दिले.

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अमर गजभीये, सहाय्यक निबंधक राजेश गुर्जर, तसेच सर्व बँकांचे प्रतिनिधी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण उद्दिष्टाच्या ६२.३७ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे, मात्र यात राष्ट्रीयकृत बँकांची सरासरी ५० टक्केच्या आतच असून त्यांनी जास्तीज जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे व या महिनाअखेरीस पीककर्ज वाटपाचे ८० टक्के उद्दिष्ट गाठावे, अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

पीक कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांना शक्य असल्यास एका दिवसात ऑनस्पॉट कर्ज मंजूर करावे, त्यांना बँकेत जास्त चकरा माराव्या लागू नये असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले तसेच वनपट्टेधारक व विविध योजनेत शेतजमीन प्राप्त झालेले शेतकरी पीककर्ज मिळण्यास पात्र असून त्यांनाही पीककर्ज देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या. खाजगी बँकेचे पीक कर्ज वाटपाचे काम खुपच कमी असून त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्नही दिसून येत नाही. त्यामुळे अशा बँका प्रायरिटी सेक्टरमध्ये काम करत नसल्याचे वरिष्ठांना कळविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीला सर्व बँकेचे प्रतिनिधी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Copyright ©