Breaking News यवतमाळ सामाजिक

कोरानाचा पुन्हा ब्रेक : गेल्या 24 तासात शुन्य पॉझिटिव्ह ; पाच कोरोनामुक्त.

 

 

पावसात बाहेर जातांना घ्या काळजी

जिल्हा  मार्गदर्शक सूचना जारी

 

यवतमाळ दि.22, बाभुळगाव तालुक्यातील मौजा नांदुरा खुर्द येथील २ अल्पवयीन मुलांचा दिनांक २० जुलै २०२१ रोजी शेततळ्यामध्ये बुडून मृत्यु झाला. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होवू नये या करीता जिल्हा प्रशासनाच्या वतीने खालील मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे.

 

या सुचनांनुसार अतिरिक्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणात, तलावात, शेततळे मध्ये शक्यतो मासेमारी करीता जाणे टाळावे. वहीवाटीच्या पुलावरून पाणी वाहत असतांना पुलावरचे पाणी ओसरे पर्यत वाहनाने तसेच प्रत्यक्ष जाण्याचे टाळावे. पुलावरून पाणी वाहत असतांना दुचाकीने रस्ता ओलाडंण्याचे धाडस करू नये. पालकांनी अल्पवयीन मुलांना मासेमारी, तलाव,धरण, तलाव इत्यादी ठिकाणी जावून पोहणे याकरीता प्रतिबंध घालावे. तलावात पाणी साठवण झाल्यानंतर खेळण्यासाठी वा पोहण्यासाठी जाणे इत्यादी प्रकार टाळावेत. नदी, नाले, ओढे इत्यादी ठिकाणी पाऊस सुरू असतांना व पूर परिस्थिती असतांना जावू नये. पाऊस सुरू असतांना सुरक्षीत स्थळी आश्रय घेण्यात यावा. मान्सून कालावधीत धरणाचे/तलावाचे ओव्हरप्लो पाहण्यासाठी गर्दी करू नये. सर्व ग्रामपंचायती, ग्रामपंचायत सरपंच तसेच ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील यांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व सूचना आपल्या गावांमध्ये द्याव्यात व लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अमंजबजावणी करावी.

जिल्हयातील सर्व गाव स्तरीय आपत्ती व्यवस्थापन समिती यांनी पुढाकार घेवून अशा प्रकारच्या घटना पुनश्च : होणार नाही यादृष्टीने उपाययोजना कराव्यात व गाव स्तरावर याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार व-हाडे यांनी केले आहे.

_________________________________

कोरानाचा पुन्हा ब्रेक : गेल्या 24 तासात शुन्य पॉझिटिव्ह ; पाच कोरोनामुक्त

* जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2033 बेड उपलब्ध

यवतमाळ, दि. 20 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही तसेच पाच जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 231 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणीही पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 231 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 14 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72789 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70989 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 95 हजार 188 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 22 हजार 342 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.47 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी शुन्य आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2033 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2055 आहे. यापैकी 22 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2033 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 17 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 770 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 5 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 631 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी शुन्य बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 632 बेड शिल्लक आहेत.

______________________________________

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज ५ ऑगस्टपुर्वी सादर करा

समाजकल्याण विभागाचे आवाहन

यवतमाळ दि.22, समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रिशिप संबंधीत लाभ देण्यात येतो. सदर सर्व योजनांतर्गत स्टेट डिबीटी च्या https://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून सन 2020-21 चे परिपुर्ण अर्ज जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी दिनांक 5 ऑगस्ट 2021 पुर्वी मुळ टि.सी. सह सादर करावे. विद्यार्थी सदर लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयांची राहील. तसेच पात्र विद्यार्थ्यांकडून शुल्क घेता येणार नाही. संबंधीत विद्यार्थ्यांनीसुद्धा अर्जाची नोंदणी करून अर्ज महाविद्यालयास सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.

________________________________________

सोयाबीनवरील खोडमाशी व चक्रीभुगां किडीचे एकात्मिक व्यवस्थापन

यवतमाळ दि.22, जुन महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातील पाऊसानंतर ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली केली आहे, त्यांचे पीक सद्यस्थीतीत 25 ते 30 दिवसाचे आहे. या सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भावास सुरुवात झाली आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर सोयाबीनची पेरणी केलेली आहे, अशा पिकांवरसुद्धा पुढील काही दिवसात या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच या दरम्यान सोयाबीन या पिकावर चक्रीभुंगा किडीच्या प्रादुर्भावाची सुद्धा शक्यता नाकरता येत नाही. म्हणुन शेतकऱ्यांनी जागरुक राहुन खालील प्रमाणे या किडीचे व्यवस्थापण करावे.

किडीची ओळख व नुकसान :- खोड माशी लहान व चमकदार काळ्या रंगाची असुन त्याची लांबी 2 मि.मि असते. अंड्यातुन निघालेली अळी पाय नसलेली, फिक्कट पिवळया रंगाची, 2 ते 4 मिमि लांब असते. ही अळी प्रथम जवळच्या पानाच्या शिराला छिद्र करते. नंतर पानाच्या देठातुन झाडाच्या मुख्य खोडात किवां फांदीत प्रवेश करुन आतील भाग पोखरुन खाते. पादुर्भावग्रस्त खोड चिरुन पाहील्यास पांढुरक्या रंगाची अळी दिसते. खोडमाशी प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळते व मोठया प्रमाणात नुकसान होते. खोड माशीची अळी तसेच कोष फांद्यात खोडात असतो. अशा किडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याचे वजन कमी होऊन उत्पादनात 16 ते 30 टक्के घट होते. चक्रीभुंग्याची मादी पानाच्या देठावर, फांदीवर किंवां मुख्य खोडावर साधारण एकमेकांपासुन 1 ते 1.5 से.मी. अंतरावर एकमेकास संमातर दोन गोल (चक्र) काप तयार करुन त्यामध्ये अंडी टाकते. त्यामुळे चक्रकापाचा वराचा भाग सुकतो अंड्यातुन निघालेली अळी पानाचे देठ आणि फांदीतुन आत जाते, मुख्य खोडाचा भाग पोखरते. या किडीचा पादुर्भाव मुग, उडीद, चवळी या पिकांवर सुद्धा होवु शकतो. पिकांच्या सुरुवातीच्या अवस्थेत झांडाची पाने, फांद्या व मुख्य खोडाचा भाग वाळतो. पिक साधारण दिड महीन्याचे झाल्यावर चक्रभुंग्याचा पादुर्भाव असलेले झाड वाळत नाही, पण किडग्रस्त झाडास शेंगा कमी लागतात परिणामी उत्पादनात घट येते.

व्यवस्थापण : पिवळे चिकट सापळे लावुन नियमीत माशांचा प्रादुर्भाव पाहावा. खोडमाशी व चक्रीभुंगा प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात, अशी किडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा.

रासायनीक किटकनाशकांचा वापर : खोडमाशी व चक्रीभुग्यांने आर्थीक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर (सरासरी 10 टक्के किडग्रस्त झाडे) या दोन्ही किडीच्या नियंत्रणासाठी इथियॉन 50 टक्के -30 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के -6.7 मिली किंवा क्लोरॅट्रॅनिप्रोल 18.5 टक्के -3.0 मिली किंवा थायोमेथोक्झाम 12.6 टक्के + लॅब्डा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेडसी टक्के- 2.50 मिली यापैकी कोणत्याही एक किटकनाशकाची प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी करतांना किटकनाशक फवारणी सुरक्षा किट वापरावी, सुरक्षेची काळजी घ्यावी.

अधिक माहीतीकरीता कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक किवां कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांनी कळविले आहे.

_________________________________

इतर मागासवर्ग विकास महामंडळतर्फे कर्ज योजनेसाठी अर्ज आंमत्रित

यवतमाळ दि.22, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय यवतमाळ मार्फत विविध योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील बेरोजगारांना स्वयंरोजगाराकरिता सन् २०२१-२२ या आर्थीक वर्षासाठी बीज भांडवल कर्ज योजना ४४ भौतिक व रु. २६ लक्ष आर्थीक, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना ५५ भौतिक व रु. ६२.७०लक्ष आर्थीक, गट कर्ज व्याज परतावा याजेना १२ भौतिक व रु. ६८.४० लक्ष आर्थीक तसेच वैयक्तिक थेट कर्ज याजेना १३३ भौतिक व रु. १३३ लक्ष आर्थीक उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

वरील सर्व कर्ज योजनांचे उद्देश, स्वरूप व पात्रतेचे निकष याबाबत, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणी विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन, दक्षता भवनच्या मागे, दारव्हा रोड,यवतमाळ, दुरध्वनी क्र. ०७२३२-२४३०५२ यांचेकडे तसेच महामंडळाचे संकेतस्थळ www.msobcfdc.org यावर माहिती उपलब्ध आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील बेरोजगारांनी व होतकरूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एस.तारे यांनी कळविले आहे.

__________________________________________

नागरी सेवा क्रीडा स्पर्धेकरिता शासकीय कर्मचाऱ्यांकडून अर्ज आमंत्रित

यवतमाळ दि.22, केंद्रीय सिव्हील सेवा सांस्कृतीक आणि क्रीडा मंडळ नवी दिल्ली यांच्या वतीने विविध खेळ प्रकारातील अखिल भरतीय नागरी सेवा स्पर्धा दरवर्षी आयोजीत केल्या जातात. केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेसाठी विविध खेळ प्रकारांतील महाराष्ट्र शासनाचा संघ निवड चाचणी घेवून स्पर्धेसाठी पाठविले जातात. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सचिवालय जिमखान्यास या स्पर्धांसाठी महाराष्ट्र शासनाचा, विविध खेळ प्रकारांतील संघ निवडण्याची व प्रशिक्षण शिबीराची जबाबदारी सोपविली आहे. अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा २०२१-२२ स्पर्धेकरीता यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील कार्यरत असलेले खेळाडू, नियमित कर्मचाऱ्यांसाठी खालील प्रमाणे स्पर्धा होणार आहे.

टेबल-टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केटबॉल, ब्रिज, कॅरम, बुध्दीबळ, ॲथलेटीक्स, लघुनाट्य, कबड्डी, वेटलिफ्टींग, पॉवरलिफ्टींग, शरिरसौष्ठव, कुस्ती, लॉन-टेनिस, नृत्य व संगीत इत्यादी खेळ प्रकारात अखिल भारतीय नागरीक सेवा स्पर्धातुन ज्या खेळाडूंना / कर्मचाऱ्यांना, भाग घ्यावयाच्या असेल त्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज /आवेदन पत्र प्रत्येक खेळाकरीता स्वतंत्र भरून ते कार्यालय प्रमुख / विभाग प्रमुख यांच्या मान्यतेने एक आगावू प्रतिसह मानद महासचिव सचिवालय जिमखाना मुबंई ४०००३२ येथे पाठवावे. तसेच आवेदन पत्र जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे शिफारशिसह मानद महासचिव सचिवालय जिमखाना मुबंई यांचेकडे ३० नोव्हेंबर २०२१ पर्यत टपालाद्वारे व sachivalayagym@rediffmail.com या ई मेलवर पाठवावे. विहित नमुना अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचेकडे उपलब्ध आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी उपरोक्त स्पर्धेची नोंद घेवुन आपले परीपुर्ण प्रस्ताव आपल्या कार्यालयामार्फत जिल्हा क्रीडा कार्यालयास दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ पुर्वी सादर करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, यवतमाळ यांनी कळविले आहे.

__________________________________

अन्न व औषध परवानासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे प्रशिक्षण

यवतमाळ दि.22, अन्न सुरक्षा आयुक्त यांचे निर्देशानुसार यवतमाळ तालुक्यातील सेतु केंद्र चालक व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ व औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत परवाना अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे प्रशिक्षण दि. २२ जुलै २०२१ रोजी देण्यात आले.

सदर प्रशिक्षण सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, केमिस्ट भवन, शिवाजी नगर, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणामध्ये उपरोक्त दोन्ही कायद्यातील महत्वाच्या संज्ञा, संकल्पना सविस्तर विषद करण्यात आल्या. तसेच प्रत्यक्ष अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

 

अन्न परवाना बाबतचे प्रशिक्षण औरंगाबाद येथील फुड सेफ्टी सोल्युशन, इंडीया चे संचालक अजय कन्हाळे यांनी दिले. तर औषध परवाना बाबत श्री वेदांत कन्सल्टींग सर्व्हीसेस परभरणी चे श्रीपाद वट्टमवार यांनी मार्गदर्शन केले.

 

सदर प्रशिक्षणाकरिता जिल्हाधिकारी अमोल येडगे व अन्न व औषधचे अमरावती विभागाचे सह आयुक्त सुरेश अन्नपुरे, यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. अन्न व औषधचे सहायक आयुक्त कृष्णा जयपुरकर, यांनी प्रशिक्षणार्थीच्या विविध शंकांचे निरसन केले व सर्व अन्न व्यावसायिकांपर्यंत परवाना व नोंदणी बाबत जागृती करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षणामध्ये गोपाल माहोरे, घनश्याम दंदे, संदीप सुर्यवंशी, गजानन गोरे, सर्व अन्न सुरक्षा अधिकारी तसेच औषध निरीक्षक सविता दातीर उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©