Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात दोन पॉझिटिव्ह; चार कोरोनामुक्त जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2022 बेड उपलब्ध

 

यवतमाळ, दि. 20 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर चार जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 307 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी दोन पॉझिटिव्ह तर 305 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 18 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72785 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70981 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझेटिव्ह आलल्यांमध्ये पुसद व यवतमाळ येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 93 हजार 749 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 20 हजार 857 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.49 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.65 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2022 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2055 आहे. यापैकी 33 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2022 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 26 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 761 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 5 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 631 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 2 रुग्णांसाठी उपयोगात असून 630 बेड शिल्लक आहेत.

____________________________________

 

 

सुशिक्षीत बेरोजगार अभियंता यांची काम वाटप सभा 28 जुलै रोजी

 

यवतमाळ दि. 20 जुलै : सार्वजनिक बांधकाम मंडळ, यवतमाळ अंतर्गत सुशिक्षीत बेरोजगार अभियंता यांची काम वाटप सभा दिनांक 28 जुलै 2021 रोजी दुपारी 3 वा. सार्वजनिक बांधकाम मंडळ सभागृह यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी संबंधीतांनी ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मु.गो.कचरे यांनी केले आहे.

_____________________________________

बकरी ईदनमित्त मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश

यवतमाळ दि. 20 जुलै : यवतमाळ जिल्ह्यात दिनांक 21 जुलै रोजी बकरी ईद सण साजरा होणार आहे. सदर दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावा यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व मद्य अनुज्ञप्त्या मद्य विक्री करिता बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्गमित केले आहे.

या आदेशानुसार दिनांक 21 जुलै 2021 रोजी बकरी ईदनिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या (एफएल -1, एफएल-2, सीएल/एफएल/टिओडी-3, एफएल/ बिआर-2 एफएल-3, एफएल-4, सिएल-2, सिएल-3 अनुज्ञप्ती ) बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

बंदच्या कालावधीत अनुज्ञप्ती मद्य विक्रीसाठी उघडी ठेवू नये. तसे आढळून आल्यास संबंधीत अनुज्ञप्ती व अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कडक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे.

____________________________________

शेतकऱ्यांनी सोयाबीनला युरीयाची दुसरी मात्रा देऊ नये

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नवनाथ कोळपकर यांचे आवाहन

यवतमाळ दि. 20 जुलै :सोयाबीन पिकास युरिया खत दिल्यास कर्बनत्राचे प्रमाण विषम होऊन पिकाची वाढ मोठ्या प्रमाणात होते व फुलधारणा व फळधारणा कमी होऊन उत्पादनात घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरवातीच्या मात्रेनंतर सोयाबीनला युरिया खताची दुसरी मात्रा देण्यात येऊ नये.

जिल्ह्यात एकुण खरीप क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. सोयाबीन हे कडधान्य वर्गातील पीक असुन, या पिकाच्या मुळावर गाठी असतात. या गाठीद्वारे हवेत उपलब्ध असलेले ७८ टक्के नत्र शोषले जाते. त्यामुळे सोयाबीन पीकाला यूरिया खताची मात्रा देण्याची आवश्यकताच नसते. यामुळे कर्बनत्राचे प्रमाण विषम होऊन पिकाची कायिक वाढ मोठ्या प्रमाणात होते. परिणामी फुलधारणा कमी होऊन उत्पादनात घट येते. प्रत्येक द्विदलवर्गीय पिकाच्या मुळावर गाठी असतात. या गाठी हवेतील नत्र शोषुन घेण्याचे कार्य करतात. त्यामुळे या पिकांना युरियाच्या माध्यमातुन अतिरीक्त नत्र देणे चुकीचे आहे. या प्रकारातुन पिकाचे उत्पादन घटण्याची पर्यायाने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला युरिया खताची मात्रा देवू नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.

 

निवडणूक साक्षरता मंडळांनी मतदारांना त्यांच्या हक्काची जाणीव करून द्यावी

– जिल्हाधिकारी अमोल येडगे

निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी जनजागृतीची गरज

स्वीप कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

 

यवतमाळ, दि. 20 जुलै : मतदार नाव नोंदणी, निवडणूक प्रक्रिया, मतदान कसे करावे याबाबत जनसामान्यांना माहिती देवून निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढविणे व त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करुन देण्यासाठी शाळा महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळे, चुनाव पाठशाळा व मतदार जागृती मंच द्वारे व्यापक जनजागृती मोहिम राबविण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना दिले.

यवतमाळ जिल्ह्यात मतदार शिक्षण, मतदार जागरूकता आणि मतदारांची माहिती वाढविण्यासाठी ‘सुव्‍यवस्थित मतदार शिक्षण आणि मतदार सहभाग कार्यक्रमाची’ – स्वीप (सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ॲण्ड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन प्रोग्राम) प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नुकतेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची बैठक घेवून वरील निर्देश दिले आहेत. बैठकीला सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉनसन व सावन कुमार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. स्नेहल कनिचे, उपविभागीय अधिकारी अधिकारी शरद जावळे, शैलेश काळे, अनिरूद्ध बक्षी, जयंत देशपांडे, स्वप्नील कापडनीस प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्व मतदार संघातील निवडणुक अधिकारी यांनी नवयुवक, स्त्रिया, अपंग, तृतीय पंथीय, शहरी नागरिक यापैकी एका लक्ष्य गटाला अनुसरून प्रत्येक तालुक्यात एका वेबसंवादाचे आयोजन करणे, शाळा-महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळे यांची स्थापना, चुनाव पाठशाळांची स्थापना, मतदार जागरूकता मंडळाची स्थापना करणे व त्यांचे संपर्क यादीचे अद्ययावतीकरण, समन्वय, सक्षमीकरण करणे, तसेच जिल्हा आणि मतदारसंघ निवडणूक कार्यालयांनी फेसबुक, ट्विटर, इन्टाग्राम या समाजमाध्यमांची खाती उघडणे आणि ती सक्रिय करून यवतमाळ जिल्ह्यातील मतदार नोंदणी वाढवावी. यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीणे, समाजमाध्यमांचा वापर करणे, निवडणूक साक्षरता मंडळ, चुनाव पाठशाला व मतदार जागरूकता मंडळाचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

*यवतमाळ जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या शाळा महाविद्यालय, चुनाव पाठशाळा व मतदार जागरूकता मंचची माहिती उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांनी यावेळी सादर केली. जिल्ह्यात महाविद्यालयातील 53 निवडणूक साक्षरता मंडळात 551 सदस्य, शाळेतील 265 निवडणूक साक्षरता मंडळात 2744 सदस्य, 548 चुनाव पाठशाळेत 5520 सदस्य, विविध कार्यालयातील 118 मतदार जागरूकता मंडळात 1230 सदस्य असल्याची माहिती त्यांनी दिली.

Copyright ©