यवतमाळ सामाजिक

गुरुपौर्णिमा गुरुमहिमा लेख

1. पिता हा पुत्राला केवळ जन्म देतो, तर गुरु त्याची जन्ममरणातून सुटका करतो; म्हणून पित्यापेक्षाही गुरूला श्रेष्ठ मानले आहे.
2. एक बद्ध जीव दुसर्‍या बद्ध जीवाचा उद्धार करू शकत नाही. गुरु मुक्त असल्यानेच शिष्यांचा उद्धार करू शकतात.
3. सद्गुरुवांचूनी सांपडेना सोय । धरावे ते पाय आधी त्याचे ।।
आपणासारिखें करिती तात्काळ । कांही काळवेळ न लगे त्यांसी ।।
लोह परिसासी न साहे उपमा । सद्गुरु-महिमा अगाधचि ।।
तुका म्हणे ऐसें आंधळे हें जन । गेलें विसरून खर्‍या देवा ।।
– संत तुकाराम
4. भगवान् श्रीकृष्णांनीही सांगितले आहे की, देवभक्तीपेक्षा गुरुभक्तिच अधिक श्रेष्ठ.
मज माझ्या भक्तांची थोडी गोडी । परि गुरुभक्तांची अति आवडी ।। – श्री एकनाथी भागवत ११:१५२७
म्हणजेच श्रीकृष्ण म्हणतात, ‘माझ्या भक्तांपेक्षा गुरुभक्तच मला अधिक आवडतो.’
आणि विश्वामाजी ईश्वरु । एकचि व्यापक सद्गुरु । म्हणूनि सर्वाभूती आदरु । करीती ते ।। – संत एकनाथ
5. ‘मला जे पाहिजे होते ते सर्व एके ठिकाणी, श्री तुकामार्इंच्या ठिकाणी, मला मिळाले. मला निर्गुणाचा साक्षात्कार, सगुणाचे अलोट प्रेम आणि अखंड नाम एकत्र हवे होते. ते त्यांच्यापाशी मिळाले. – श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज’
6. श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे, ‘ज्ञानदान करणार्‍या सद्गुरूंना शोभेल अशी उपमा या त्रिभुवनात कोठेही नाही. त्यांना परिसाची उपमा दिली तरी तीही अपुरी पडेल; कारण परीस लोखंडास सुवर्णत्व देत असला तरीही त्याचे परीसत्व देऊ शकत नाही.’ समर्थ रामदासस्वामींनीही दासबोधात (१.४.१६) म्हटले आहे –
शिष्यास गुरुत्व प्राप्त होये । सुवर्णे सुवर्ण करिता न ये । म्हणोनी उपमा न साहे । सद्गुरूसी परिसाची ।।
7. कल्पतरुची द्यावी उपमा । कल्पिलें लाभे त्याचा महिमा । न कल्पितां पुरवी कामा । कामधेनु श्रीगुरुचि ।।
श्री गुरुचरित्र ३:३५
8. ‘गुरूंना उपमा देण्याजोगी या जगात दुसरी कोणतीही वस्तु नाही. गुरु सागरासारखे म्हणावे, तर सागराजवळ खारटपणा असतो; पण सद्गुरु सर्वप्रकारे गोड असतात. सागरास भरती-ओहोटी असते; पण सद्गुरूंचा आनंद अखंड असतो. सद्गुरु कल्पवृक्षाप्रमाणे म्हणावे, तर कल्पवृक्ष आपण जी कल्पना करावी ती पुरवितो; पण सद्गुरु शिष्याची कल्पना समूळ नाहीशी करून त्याला कल्पनातीत अशा वस्तूची प्राप्ति करून देतात; म्हणून गुरूंचे गुणवर्णन करण्यास ही वाणी असमर्थ आहे.’

Copyright ©