Breaking News यवतमाळ सामाजिक

कोरोनाने घेतला ब्रेक : आज नवीन पाझेटिव्ह रूग्ण नाही जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2033 बेड उपलब्ध

 

यवतमाळ दि. 19 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही तसेच एकही जण कोरोनामुक्त झाले नाही. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1053 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एकही पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 1053 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 20 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72783 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70977 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 93 हजार 400 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 20 हजार 549 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.50 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2033 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2055 आहे. यापैकी 22 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2033 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 11 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 776 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 9 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 627 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 2 रुग्णांसाठी उपयोगात असून 630 बेड शिल्लक आहेत.

____________________________________

 

बकरी ईद साध्या पध्दतीने साजरी करा

-जिल्हाधिकारी अमोल येडगे

 

यवतमाळ दि. 19 जुलै : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे, त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच साध्या पध्दतीने साजरी करावी, अशा मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्गिमित केल्या असून ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील, नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अथवा दूरध्वनीवरून खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. बकरी ईद निमित्त नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये. जिल्ह्यात ब्रेक दि चेन अंतर्गत लागू निर्बध कायम असून त्यात बकरी ईन निमित्त कोणतीही शिथीलता देण्यात आलेली नाही.

आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, भारतीय दंड संहिता व संबंधीत कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात बकरी ईदच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय संयुक्त सभा घेण्यात आली. यावेळी उपरोक्त मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात जनावरांच्या वाहतुकीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक असून विनापरवाना जनावरांची वाहतुक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. जिल्ह्यात म्हशी व म्हशीचे पारडे या अनुसुचित प्राण्यांची कत्तल करण्यात परवानगी देण्यात आलेली नाही त्यामुळे ईद हा सण साजरा करतांना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांनी त्यांच्या हद्दीतील मृत जनावरांची विल्हेवाट तातडीने लावून स्वच्छता ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

राज्यात प्राणी रक्षण सुधारणा कायद्यान्वये गाय, वळू व बैलांची इ. शेड्युल जनावरांची कत्तल करण्यास मनाई आहे. तसेच कत्तलखाना नियमावाली-2001 मधील तरतुदी व मानकाचे पुर्तता केली नसल्याने यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही कत्तलखान्याचे संचानल नसल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नागापूरे यांनी यावेळी सादर केली.

बैठकिला अपर पोलीस अधिक्षक डॉ. के.ए.धरणे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदिप नागापूरे, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. क्रांती काटोले, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले, नगरपालीका प्रशासन अधिकारी सतिश गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©