Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात तीन पॉझिटिव्ह रुग्ण; दोन कोरोनामुक्त जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1882 बेड उपलब्ध

 

यवतमाळ, दि. 17 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात कोरोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1117 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी तीन पॉझिटिव्ह तर 1114 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 21 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72782 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70975 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझेटिव्ह आलल्यांमध्ये दिग्रस, महागाव व वणी येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 91 हजार 250 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 18 हजार 161 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.53 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.27 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1882 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1905 आहे. यापैकी 23 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1882 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 637 बेडपैकी 11 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 626 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 9 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 627 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 3 रुग्णांसाठी उपयोगात असून 629 बेड शिल्लक आहेत.

__________________________________

पीक कर्जापासून कोणीही शेतकरी वंचित राहू नये

शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या सूचना

यवतमाळ दि. 17 जुलै : जिल्ह्यातील ज्या बँका पीक कर्ज वाटपात मागे आहेत त्यांनी पीक कर्ज वाटपासाठी विशेष मोहिम राबवून बँकेतर्फे ‘मागेल त्याला पीककर्ज’ देण्यात येईल, असा संदेश शेतकऱ्यांपर्यत पोहचवावा व कर्जाची मागणी करणाऱा कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना कै.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज दिल्या.

जिल्ह्यातील खरीप हंगाम पीककर्ज वाटप तसेच पांढरकवडा वनविभातील समस्याबांबत किशोर तिवारी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी विवेक जॉनसन, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

किशोर तिवारी पुढे म्हणाले की जिल्ह्यात आतापर्यंत 1334 कोटी 64 लाख 71 हजार रुपये पीककर्ज वाटप हे एकूण उद्दिष्टाच्या 60.56 टक्के वाटप झाले असून पुढील 15 दिवसात बँकांनी एकूण 75 टक्के उद्दिष्ट गाठावे व तद्नंतर 100 टक्के पीक कर्ज वाटपासाठी प्रयत्नशील राहावे. यावेळी त्यांनी पीककर्ज वाटपात चांगले काम करणाऱ्या बँकांचे अभिनंदनही केले.

पांढरवकडा वनपरिक्षेत्रातील टिपेश्वर अभयारण्य हे राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने तेथे पर्यटनाच्या विकासाठी मोठा वाव असून वनविभागाने याभागात पर्यटन वाढविण्याचे व त्याद्वारे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना किशोर तिवारी यांनी दिल्या. यावेळी त्यांनी वाघाच्या हल्ल्याबाबत सुरक्षा योजना, आदिवासींना खावटी वाटप व घरकुल योजना, गौणखनिज उत्खनन, कोरानासंबंधीत वैद्यकीय उपाययोजना, फवारणीमुळे विषबाधा टाळण्यासाठी उपाययोजना तसेच पोकरा योजनेचा आढावा घेवून संबंधीतांना आवश्यक सूचना दिल्या.

बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक तरंगतुषार वारे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अमर गजभिये, तसेच विविध विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Copyright ©