Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात केवळ एक पॉझिटिव्ह रुग्ण; दोन कोरोनामुक्त जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1874 बेड उपलब्ध

 

यवतमाळ, दि. 15 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात केवळ एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 877 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक पॉझिटिव्ह तर 876 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 21 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72776 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70969 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझेटिव्ह आलेला एकमेव रूग्ण घाटंजी येथील आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 88 हजार 511 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 15 हजार 707 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.57 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.11 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1881 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1905 आहे. यापैकी 24 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1881 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 637 बेडपैकी 12 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 652 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 9 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 627 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 3 रुग्णांसाठी उपयोगात असून 629 बेड शिल्लक आहेत.

___________________________________

अन्न पदार्थाचे नमुने तपासणी वाढवा

अन्न व औषध प्रशासनाच्या आढाव्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

यवतमाळ, दि. 15 जुलै : नागरिकाद्वारे जे अन्न पदार्थ व आरोग्य पूरक औषधींचा जास्तीत जास्त वापर करण्यात येतो अशा पदार्थांचे जास्तीत जास्त नमूने तपासणी करण्यात यावी व विहित मानकांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिले.

अन्न सुरक्षा व मानदे कायदा अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात घेण्यात आली. यावेळी अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त कृष्णा जयपूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जि.के. वनारे, शासकीय वैद्यकीय रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, नगरपालीकेच्या ममता राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी अन्न तपासणीसोबतच विक्रीसाठी येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्याचे तसेच आरोग्य पूरक औषधीच्या नावावर नागरिकांना चुकीची माहिती देवून भेसळयुक्त अन्न पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. अन्न पदार्थांपासून विषबाधा होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी तसेच अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांनी करावयाच्या सुधारणांबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने जनजागृती करावी असेही जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.

अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपयोजिलेल्या बाबींची माहिती कृष्णा जयपूरकर व गोपाल माहोरे यांनी दिली.

___________________________________

 

मुख्य निवडणूक अधिकारी यांनी घेतला यवतमाळ जिल्ह्याचा आढावा

स्वीप कार्यक्रमाच्या पंचउपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दिल्या सूचना

यवतमाळ, दि. 15 जुलै : सुव्‍यवस्थित मतदार शिक्षण आणि मतदार सहभाग कार्यक्रम, स्वीप (सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ॲण्ड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन प्रोग्राम) कार्यक्रमाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात मतदार शिक्षण, मतदार जागरूकता आणि मतदारांची माहिती वाढविण्यासाठी नेमून दिलेल्या पंच उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे आज दिल्या.

स्वीप कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी राज्यात आज सर्वप्रथम अमरावती विभागाची दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यवतमाळ जिल्ह्याचे सादरीकरण केले. बैठकीला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी विवेक जॉनसन(आर्णी), सावन कुमार(पुसद), उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. स्नेहल कनिचे, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शरद जावळे(वणी), शैलेश काळे (राळेगाव), अनिरूद्ध बक्षी (यवतमाळ), जयंत देशपांडे (दिग्रस), स्वप्नील कापडनीस (उमरखेड) प्रामुख्याने उपस्थित होते.

निवडणुक अधिकारी यांनी नेमून दिलेल्या पंच उपक्रमांमध्ये नवयुवक, स्त्रिया, अपंग, तृतीय पंथीय, शहरी नागरिक यापैकी एका लक्ष्य गटाला अनुसरून प्रत्येक तालुक्यात एका वेबसंवादाचे आयोजन करणे, शाळा-महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळे यांची स्थापना, चुनाव पाठशाळांची स्थापना, मतदार जागरूकता मंडळाची स्थापना करणे व त्यांचे संपर्क यादीचे अद्ययावतीकरण, समन्वय, सक्षमीकरण करणे, तसेच जिल्हा आणि मतदारसंघ निवडणूक कार्यालयांनी फेसबुक, ट्विटर, इन्टाग्राम या समाजमाध्यमांची खाती उघडणे आणि ती सक्रिय करणे या बाबींचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी येडगे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील मतदार नोंदणीची सद्यस्थिती, नोंदणी वाढविण्यासाठी केलेले नावीन्यपूर्ण उपक्रम, समाजमाध्यमांचा वापर, निवडणूक साक्षरता मंडळ, चुनाव पाठशाला व मतदार जागरूकता मंडळाच्या सद्यस्थितीबाबत माहितीचे सादरीकरण केले.

बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते

Copyright ©