Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात 2 पॉझिटिव्ह रुग्ण; 3 कोरोनामुक्त जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1874 बेड उपलब्ध

 

यवतमाळ, दि. 13 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर 3 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 514 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 2 पॉझिटिव्ह तर 512 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 21 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72769 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70962 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये दिग्रस येथील एक व घाटंजी येथील एका रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 86 हजार 824 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 14 हजार 36 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.59 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.59 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1874 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1905 आहे. यापैकी 31 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1874 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 637 बेडपैकी 15 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 622 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 13 रुग्णांसाठी उपयोगात तर 623 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 3 रुग्णांसाठी उपयोगात असून 629 बेड शिल्लक आहेत.

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम

जिल्ह्यातून ६०० युवकांना मिळणार प्रशिक्षण

यवतमाळ, दि. 13 जुलै : कोरोना साथरोगाच्या पार्श्वभुमीवर आरोग्य क्षेत्राला भरीव मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी यवतमाळ जिल्हयामध्ये मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत एकुण ६०० युवकांना हेल्थकेअर, नर्सीग, पॅरामेडिकलसारख्या विविध अभ्यासक्रमाचे येत्या तीन महीन्यात प्रशिक्षण देवुन प्रशिक्षीत करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण केंद्रामध्ये मुख्यतः कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ, लक्ष्मणराव कळसपूरकर आयुर्वेदिक रुग्णालय, यवतमाळ, उपजिल्हा रुग्णालय, दारव्हा, पांढरवडा, पुसद इ. रुग्णालयाचा समावेश आहे. तसेच काही खाजगी रुग्णालये यांचाही समावेश आहे. सदरचे प्रशिक्षण हे ऑन जॉब ट्रेनिंग पध्दतीने असणार आहे.

 

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत संपुर्ण महाराष्ट्रामध्ये हेल्थकेअर, नर्सीग, पॅरामेडिकलसारख्या क्षेत्रामध्ये ३६ अभ्यासक्रमामधुन येत्या तीन महिन्यामध्ये २० हजार युवकांना प्रशिक्षीत केले जाणार आहे यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा शुभारंभ ८ जुलै रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आला. तर यवतमाळ येथे या कार्यक्रमाचा ऑनलाईन शुभारंभ कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे अधिष्ठाता मा. श्री. मिलींद कांबळे यांचे अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे उपस्थित होते.

यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करुन उपस्थित उमेदवारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. तसेच जिल्ह्यातील उमेदवारांना सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. अधिक माहितीसाठी कार्यालयात संपर्क करावा, असे कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी कळविले आहे.

१ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन

यवतमाळ, दि. १३ जुलै : जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथे तसेच यवतमाळ जिल्हयातील सर्व तालुका न्यायालये, कामगार न्यायालय व औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय आणि इतर सर्व न्यायालये तसेच न्यायाधिकरणे येथे दिनांक ०१ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने तसेच प्रमुख जिल्हा व सत्रन्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,यवतमाळ किशोर आर. पेठकर, यांचे मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भुअर्जन मामल्याची प्रकरणे, महसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद प्रकरणे, बँका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे व तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघणार आहे.

सदर लोकअदालतीमध्ये वाद मिटविण्याकरीता न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजीक कार्यकते यांचे मंडळ पक्षकारांस मदत करेल. तसेच लोकअदालतीमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही व लोकअदालतीचे निवाड्याविरूध्द अपील नसल्याने वाद कायमचा मिटतो. न्यायालयाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोकअदालतीमध्ये होणा-या निवाड्याची अंमलबजावणी न्यायालयामार्फत करता येते.

खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलट तपासणी, दिर्घ युक्तीवाद याबाबी टाळल्या जातात. येणे प्रमाणे लोकअदालतीमध्ये वाद मिटविल्याने वेळेची व पैशाची बचत होते. तसेच प्रकरण न्यायालयात चालविण्या करीता होणा-या त्रासातुन सुटका होते व त्वरीत आपसी संमतीने न्याय मिळतो.

तरी संबधीत पक्षकारांनी आपली प्रकरणे दिनांक ०१ ऑगस्ट, २०२१ रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठेवण्याकरीता प्रलंबित प्रकरणांसाठी संबधीत न्यायालयात अर्ज सादर करावा आणि दाखलपूर्व प्रकरणांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ तसेच जिल्ह्यातील इतर तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपली जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून आपसी तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम.आर.ए. शेख आणि श्री जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष जे.एम. बारडकर यांनी केले आहे.

 

निवासी शाळेत प्रवेशासाठी ३० जुलै पर्यंत अर्ज आमंत्रित

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी माध्यमाच्या इयता पहिला व दुसरी साठी प्रवेश प्रक्रिया

यवतमाळ, दि. १३ जुलै : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,पांढरकवडा, अंतर्गत केळापुर, घाटंजी, वणी, मारेगाव, झरी, राळेगाव, कळंब, बाभुळगाव, यवतमाळ हे तालुके येत असुन या कार्यक्षेत्रात सन 2021-22 या वर्षाकरिता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत इयता पहिला व दुसरी मध्ये प्रवेश देण्यासाठी दिनांक ३० जुलै २०२१ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

इयता 1 ली 2 री मध्ये प्रवेश देण्यासाठी अटी व शर्ती : सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिनारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. प्रवेश अर्जासोबत विद्यार्थ्यांचे जन्म तारखेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. पालकाने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिका-याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिना-या विद्यार्थ्यांच्या पालकाचे कुटूंबातील वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रुपये 1.00 लाख इतकी राहील. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड छायांकित प्रत प्रवेश अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय 6 वर्ष पुर्ण असावे. विधवा/घटस्फोटीत /निराधार /परितक्त्या व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येतील.तसे प्रमाणपत्र प्रवेश अर्जासोबत जोडावे लागेल. विद्यार्थ्यांचे पालक शासकिय /निमशासकिय नोकरदार नसावेत. खोटी माहितीसादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येतील. निवड केलेल्या विद्यार्थ्यांला एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थित पालकाच्या व पाल्याच्या विनंती नुसार शाळा बदलता येणार नाही.

अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे : अर्जदार विद्यार्थ्यांचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो. पालकाचे रहिवासी प्रमाणपत्र. पालकाचे जातीचे प्रमाणपत्र. सन 2021-22 चा उत्पन्नाचा दाखला. अंगणवाडीचा दाखला (पहिल्या इयत्तेसाठी) ग्रामसेवकाचा दाखला. दारिद्रय रेषेखालील असल्याबाबतचा दाखला/ग्रामसेवकाचा दाखला. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड. महिला पालक विधवा/घटस्फोटीत/निराधार/परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला. विद्यार्थ्यांचे वैद्यकिय प्रमाणपत्र.

वरील प्रमाणे प्रत्येक शासकिय/अनुदानित आश्रमशाळांच्या पातळीवर व प्रकल्प अधिकारी एकात्मिक

आदिवासी विकास प्रकल्प,पांढरकवडा जि.यवतमाळ या कार्यालयात प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. तेव्हा आवश्यक त्या कागदपत्रासह अचूक माहिती भरुन अर्ज दिनांक 30/07/2021 पर्यंत कार्यालयात

शेतु विभागात अर्ज सादर करण्यात यावे.

वरील निकषामध्ये बसणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण घेण्याकरिता या कार्यालयाकडून अर्ज मागवून विद्यार्थ्यांची निवड करुन नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्यात आलेले आहे. नामांकित शाळा योजनेअंतर्गत पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.1.00 लाखापेक्षा कमी असावे असा नियम असतांना काही विद्यार्थ्यांचे पालक (आई-वडील) शासकीय /खाजगी नोकरीवर असतांना या योजनेचा लाभ घेण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तेव्हा अशा पालकांना याव्दारे आवाहन करण्यात येते कि,जर त्यांनी चुकिची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेऊन इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत आपल्या पाल्याचे प्रवेश घेतला असल्यास तो रद्द करुन या योजनेचा लाभ सोडण्यात यावे.या कार्यालयाच्या तपासणीमध्ये असे विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतल्याचे आढळून आल्यास त्या विद्यार्थ्यांचे पालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी विवेक जॉनसन यांनी कळविले आहे.

 

आदिवासी लाभार्थ्यांच्या विविध योजनांकरिता अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

यवतमाळ दि. 13 जुलै, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पांढरकवडा या कार्यालयामार्फत सन 2021-22 या वर्षात विशेष केंद्रीय सहाय योजना, आदिम जमातींचे संरक्षण तथा विकास, कोलाम पॅकेज, पारधी पॅकेज योजनेअंतर्गत केळापुर, घाटंजी, वणी, मारेगाव, झरीजामणी, राळेगाव, कळंब, बाभुळगाव व यवतमाळ या तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांकडून विविध योजनेरिता २५ जून पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. तरी सदर अर्ज सादर करण्यात आता 23 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी विवेक जॉनसन यांनी कळविले आहे.

Copyright ©