Breaking News यवतमाळ

गेल्या 24 तासात 3 कोरोनामुक्त ; 2 पॉझेटिव्ह जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1878 बेड उपलब्ध

 

 

यवतमाळ, दि. 8 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 2 जण पॉझेटिव्ह तर 3 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 948 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 2 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 946 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 25 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72755 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70944 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये मारेगाव येथील एक व उमरखेड येथील एका रूग्णांचा समावेश असून यात एक पुरुष व एक महिला आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 84 हजार 825 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 11 हजार 995 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.62 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.21 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1878 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1905 आहे. यापैकी 27 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1878 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 637 बेडपैकी 20 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 617 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 7 रुग्णांसाठी उपयोगात तर 629 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

__________________________________

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा

यवतमाळ, दि. 8 जुलै : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे शुक्रवार दिनांक ९ जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दिनांक ९ जुलै २०२१ रोजी दुपारी १.३० वा. शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे सेवाग्राम येथून आगमन व पदाधिकाऱ्यांच्या भेटी. दु. २ वा. राखीव. दु. २.३० वा. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ या संस्थांचा कान्फनन्स हॉल, शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळ येथे आढावा. दुपारी ३.३० वा. शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळ येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सायंकाळी ४ वा. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात येणाऱ्या व्हेंटीलेटरच्या लोकार्पण सोहळ्यास जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थिती. सायंकाळी ४.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रपरिषदेस उपस्थिती. सायं. ५ वा. यवतमाळ येथून कारंजा, जि. वाशिमकडे प्रयाण.
__________________________________

पशुव्यवसाय – उद्योगांना मिळणार 90 टक्के कर्ज

व्याज दरात 3 टक्के सूट

 

यवतमाळ, दि. 8 जुलै : केंद्र शासनाने सन 2020 -21 या वर्षापासून पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या नवीन योजनेस मंजुरी प्रदान केलेली आहे. सदर योजने अंतर्गत आईस्क्रीम, चीज निर्मिती, दूध पाश्चरायजेशन, दूध पावडर, मास निर्मिती व प्रक्रिया, पशुखादय, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटिन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती, पशु -पक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना 90 टक्के कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत असून व्याज दरांमध्ये 3 टक्के सुट देण्यात येणार आहे. यासोबतच लिंगवीनिश्चित वीर्य मात्रा निर्मिती, बाह्य फलन केंद्र, पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातीचे संवर्धन या बाबींचाही समावेश करण्यात आलेला आहे.

योजनेसंबंधी सर्व प्रकारच्या मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाच्या पशुपालन व डेअरी विभागाचे संकेतस्थळ http://dahd.nic.in/ahdf व राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळ http://ahd.maharashtrs.gov.in यावर उपलब्ध आहेत.

सदर योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलव्दारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे. सदर योजनेचा व्यक्तिगत, व्यवसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, खाजगी संस्था, कलम-8 अंतर्गत स्थापन कंपनी यांना लाभ घेता येईल, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले यांनी कळविले आहे.

__________________________________

 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ जुलै

 

यवतमाळ, दि. 08: प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2021- 22 खरीप हंगामाकरिता जिल्ह्यात लागू करण्यात आली असून योजनेत सहभागी होण्याकरिता 15 जुलै 2021 अंतिम मुदत आहे.

पीक विमा योजनेंतर्गत पिकाची प्रति हेक्टर विमा संरक्षीत रक्कम व शेतकऱ्यांना भरावयाचा पीक विमा हप्ता (कंसात) पुढीलप्रमाणे आहे. खरीप ज्वारी साठी प्रति हेक्टर विमा संरक्षीत रकम रु. 25 हजार असून विमा हप्ता रु. 500 आहे. सोयाबीन विमा रकम 40 हजार तर विमा हप्ता रु. 800, मुग व उडिद पिकासाठी विमा रकम रु. 20 हजार असून विमा हप्ता रु. 400 आहे, तुर पिकासाठी विमा रकम 35 हजार व विमा हप्ता रू. 700 तर कापूस पिकाकरिता विमा रकम 40 हजार असून विमा हप्ता रुपये दोन हजार आहे.

शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना 2021 -22 साठी इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, 06 वा मजला, सुयोग प्लॅटिनम, मंगलदास रोड, पुणे-411001 दुरध्वनी क्रंमाक 020-67278900 टोल फ्री क्रं. 1800 103 5490 agrimh@iffcotokio.co.in या विमा कंपनीची निवड केली आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे. तरी सदर योजनेचा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एन. एम. कोळपकर यांनी केले आहे.

_____________________________

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रद्दी कागदपत्रे विक्रीसाठी उपलब्ध

यवतमाळ, दि. 8 जुलै : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, यवतमाळ येथे मोटार वाहनांची नोंदणी, वाहनाचा परवाना, वाहन चालविण्याचे लायसन्स तसेच वाहनाशी संबंधीत इतर कामकाजाकरिता आवश्यक कागदपत्रे स्विकारण्यात येतात. सदर कागदपत्रांचा जतन कालावधी संपल्यामुळे काही कालबाह्य झालेली कागदपत्रांची विक्री करण्यात येणार असून सदर रद्दी कागदपत्रांची पाहणी करण्याकरिता इच्छुक उमेदवारांना बोलावण्यात येत आहे. तरी कालबाह्य झालेली कागदपत्रे विक्री करण्याकरिता आवश्यक नियम व अटी कार्यालयात उपलब्ध असून इच्छुक उमेदवारांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर रोड, कळंब चौक यवतमाळ येथे प्रत्यक्ष भेटून अथवा 07232-255111 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वाढेकर यांनी केले आहे
___________________________________
दिव्यांग व्यक्तीकरता स्वयंरोजगार योजना

यवतमाळ, दि. 8 जुलै : जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींकरिता इलेक्ट्रिकल ट्रायसायकल फिरते विक्री केंद्र स्वयंरोजगार योजना राबविण्याचे नियोजित आहे. सदर योजना ही दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता राबविण्यात येत आहे. ही योजना दिव्यांग व्यक्ती करिता राबविण्यात येणारी महाराष्ट्रातील पहिली नाविन्यपूर्ण योजना आहे. या योजनेतून अनेक दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होणार आहे. सदर योजने करीता लाभार्थी निवडीचे निकष व योजने करीता लागणारी कागदपत्रे याविषयी माहिती व ऑनलाईन अर्ज करण्याकरिता www.mavimyavatmal.org या संकेत स्थळावर अर्ज करावे, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय यवतमाळ यांच्या द्वारे करण्यात येत आहे.

Copyright ©