Breaking News यवतमाळ

शिवर भंडारी येथे शेतीच्या ताब्या वरुन चाकु हल्ला

 

गंभीर जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविले.

घाटंजी : पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिवर भंडारी येथील शेतीच्या ताब्यावरुन दोन्ही गटात झालेल्या हाणामारीत रामसिंग चंदू राठोड, दारासिंग चंदु राठोड यांच्यावर चाकु हल्ला आणि विष्णू चंदू राठोड याच्या डोक्यावर बल्लम ने हल्ला केल्याने तिघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. दरम्यान, तिघेही गंभीर जखमी असल्याने त्यांना प्रथम यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आल्याने सद्यातरी आरोपी विरूध्द गुन्हे दाखल करण्यात आलेले नाही, असे पोलीस उप निरीक्षक रविंद्र ताले यांनी सांगितले.

शिवर भंडारी येथील शेतीच्या ताब्यावरुन राठोड कुटुंबियात मागील अठ्ठावीस वर्षांपासून वाद सुरू होता. आज पुन्हा शेतीच्या ताब्यावरुन दोन्ही कुटूंबात वाद झाला. अगोदर दोन्ही गटात सावळी (सदोबा) येथील महाराष्ट्र बँके जवळ हाणामारी झाली. रामसिंग राठोड, दारासिंग राठोड व विष्णू राठोड हे आपल्या आई सोबत पारवा पोलीस स्टेशनला गैरअर्जदारां विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी जात असतांना चिखलवर्धा ते कुर्लीच्या वन विभागाच्या जंगलातील मध्यभागी तुकाराम कनिराम राठोड, ज्ञानेश्वर तुकाराम राठोड व ईतर लोक हे अगोदरच कुर्ली शिवाराच्या जंगलात थांबले होते.

तेवढ्यात रामसिंग चंदू राठोड, दारासिंग चंदु राठोड व विष्णू चंदू राठोड आदींना रस्त्यात अडवून रामसिंग, दारासिंग याच्या पोटावर चाकुने हल्ला केल्याने दारासिंग च्या पोटातील आतड्या बाहेर आल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगीतले. तर विष्णूच्या डोक्यावर बल्लमने मारुन गंभीर जखमी केले. त्यामुळे तो गंभीर अवस्थेत होता. गंभीर जखमींना अगोदर घाटंजीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने नंतर यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

पारवा पोलीस स्टेशन चे ठाणेदार गोरख चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रविंद्र ताले, जमादार अविनाश मुंडे पुढील चौकशी करीत आहे.

Copyright ©