Breaking News यवतमाळ सामाजिक

कोरोना तीसरी लाट पुर्वतयारीत दुर्गम भागाकडे विशेष लक्ष द्या – विभागीय आयुक्त पियुष सिंह

 

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या तीनपटपेक्षा जास्त ऑक्सीजन क्षमता वृद्धींगत

यवतमाळ दि.2 : जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तीसऱ्या लाटेपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करतांना जिल्हा मुख्यालयापासून दूर असलेल्या वणी, पुसद व उमरखेड या दुर्गम भागात कोरोना रुग्ण वाढल्यास ऑक्सीजन व इतर कोरोनाप्रतिबंधात्मक साहित्य तातडीने उपलब्ध व्हावेत याकरिता आवश्यक नियोजन व बफर स्टॉक तयार ठेवावे असे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिले.

जिल्हा प्रशासनाद्वारे कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवनात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी पी.एस.चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.

भविष्यात कोरोनाचा प्रकोप वाढल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी शहराकडे धाव घेण्याची गरज पडू नये, जास्तीत जास्त रुग्णांची स्थानिक तालुका स्तरावरील उपजिल्हा रुग्णालय व कोविड केअर सेंटरवरच सोय व्हावी, याकरिता आवश्यक नियोजन करावे. नागरिकांमध्ये कोरोना विषाणूविरु्ध लढण्यासाठी अॅण्टीबॉडीज तयार झाल्यात किंवा नाहीत, याचा अभ्यास करण्यासाठी सिरो सर्वे करावा, असे आयुक्त सिंह यांनी सांगितले. तसेच ऑक्सीजन सिलेंडरमधील जवळपास 15 टक्के ऑक्सीजनचा वापर विहित प्रेशरअभावी होऊ शकत नाही त्यामुळे ऑक्सीजनची मागणी 15 टक्के जास्त ठेवण्याच्या सूचनादेखील त्यांनी केल्या. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य सोयी सुविधा सामुग्री उपलब्ध करण्यात आली आहेत, त्यांचा वापर करतांना किंवा करत नसतांनाही आवश्यक देखभाल करण्याची दक्षता घेण्याचे सिंह यांनी सांगितले.

तीसऱ्या लाटेत लहान मुले बाधीत होण्याची शक्यता वर्तावण्यात आल्याने त्यादृष्टीने काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत तसेच ऑक्सीजन गळतीसाठी काय उपाययोजना केल्या, क्लीनीकल आणि टेक्नीकल ऑक्सीजन ऑडीट करण्यात आले आहे का, म्युकरमायसीस रुग्णसंख्या, गरोदर महिला व नवजात बालकांमध्ये कोविडची काय परिस्थीती आहे, तांत्रीक साहित्य व मनुष्यबळाची आवश्यकता याबाबत प्रश्न विचारून त्यांनी आढावा घेतला.

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या तीनपट जास्त ऑक्सीजन क्षमता वृद्धींगत करण्याचे उद्दिष्ट होते, मात्र त्यापेक्षाही जास्त ऑक्सीजन सुविधा येथे उपलब्ध करण्यात आली आहे, तसेच तालुकास्तरावरील सर्व शासकीय उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन बेडची सुविधा उपलब्ध असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. लस घेणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यास त्याप्रमाणात लससाठा उपलब्ध होणार आहे, तेव्हा जास्तीत जास्त पात्र नागरिकांचे लसीकरण करून लसीकरणाची गती वाढविण्याचे विभागीय आयुक्त सिंह यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील कोविड उपायोजनांची माहिती दिली. जिल्ह्यात सध्या 63.93 मे.टन ऑक्सीजन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे तर 68.21 मे.टन ऑक्सीजन साठाची प्रस्तावीत कामे लवकरच पुर्ण करण्यात येणार असून त्यानंतर जिल्ह्यात एकूण 132.14 मे.टन ऑक्सीजन क्षमतेचा साठा तयार होणार आहे. वणी, पांढरकवडा, उमरखेड व पूसद येथे पी.एस.ए. प्लँट उभारण्‍यात येत असून ते लवकरच कार्यन्वित होतील. यवतमाळ जिल्‍हास्‍तरावर 290 सिलेंडरचा बफर स्टॉक ठेवण्यात आला आहे. तसेच नव्याने उपलब्ध होणाऱ्या सिलेंडरमधून वणी,उमरखेड व यवतमाळ येथे प्रत्येकी 75 जम्बो सिलेंडर बफर स्टॉकमध्ये ठेवण्‍यात येतील, असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.

वणी येथून मारेगाव, पांढरकवडा, झरीजामणी ह्या तालुक्‍यांसाठी तसेच उमरखेड येथून महागाव, पुसद, दिग्रस ह्या तालुक्‍यांसाठी तर यवतमाळ येथुन बाभूळगाव, आर्णी, दारव्‍हा, नेर, कळंब, राळेगाव येथे गरजेनुसार बफर स्टॉकचे वाटप करण्‍याचे नियोजन करण्‍यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी सादर केली.

लहान मुलांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे 60 बेड्स, स्‍त्री रुग्‍णालयात 40 तसेच पुसद,पांढरकवडा व दारव्‍हा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रत्‍येकी 20 बेड्स तयार करण्‍यात आलेले आहे. तर ग्रामीण रुग्‍णालय व उपजिल्हा रूग्णालयातील बेडची क्षमता वाढ करण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

तद्नंतर आयुक्त सिंह यांनी शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील तसेच महिला रुग्णालयातील लीक्वीड ऑक्सीजन प्लँट, कोरोना वार्ड व लहान मुलांकरिता तयार करण्यात येत असलेल्या कोरोना वार्डाची पाहणी केली.

बैठकीला जिल्हा लसीकरण अधिकारी सुहास कोरे, डॉ. रमा बाजोरीया व सबंधीत अधिकारी उपस्थित होते.

 

गेल्या 24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1868 बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 2 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात केवळ 1 जण पॉझेटिव्ह तर 3 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 316 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 315 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 45 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72734 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70903 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये यवतमाळ येथील एका रूग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 81 हजार 575 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 08 हजार 719 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.67 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.32 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1868 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1905 आहे. यापैकी 37 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1868 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 637 बेडपैकी 23 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 614 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 13 रुग्णांसाठी उपयोगात तर 623 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 1 उपयोगात तर 631 बेड शिल्लक

आजपासून सर्व लसीकरण केंद्रावर पहिला व दुसरा डोज़ मिळणार

कोविशिल्ड व कोवाक्सिन या दोन्ही लस उपलब्धतेनुसार

यवतमाळ 2: जिल्ह्यात 21 जून पासून 18 वर्ष वयोगटावरील सर्व नागरिकांना कोविड ची लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्याला आज 44000 कोविशिल्ड व 11000 कोवाक्सिन लस प्राप्त झाली असून शासनाच्या सूचनेनुसार आता कोविशिल्ड व कोवाक्सिन या दोन्ही लस उपलब्धतेनुसार पहिल्या व दुसऱ्या दोन्ही डोज साठी वापरण्यात येणार आहे.

नागरिकाना आपले ओळख पत्र दाखवून किवा आधीच कोविन पोर्टलवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून दोन्ही पद्धतीने लस घेता येईल. आता पर्यंत जिल्ह्याला 5.10 लक्ष कोविशिल्ड व 1.15 लक्ष कोवाक्सिन लस प्राप्त झाली आहे. 18 ते45 वयोगटातील जवळपास 70000 नागरिकांना लस देण्यात आली असून एकूण 575000 नागरिकांचे लसीकरण आरोग्य विभागाने पूर्ण केले आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांनी लसीकरण करून घेणे साठी स्वतःहून पुढे येणाचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. गाव स्तरीय समितीने आपले गावात 18 वर्षे वरील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करुण जिल्हा परिषदेच्या कवच कुंडल अभियाना अंतर्गत ग्राम पंचयतीला एक लक्ष्य रूपयाचे प्रोत्सहन पारितोषीक जींकण्याची संधी उपलब्ध करुण दिली आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

3 जुलै रोजी ‘मिशन लसीकरण 30000’

– जिल्हाधिकारी अमोल येडगे

यवतमाळ 2 : जिल्ह्यामध्ये कोविड प्रतिबंधासाठी लसीकरणाचे प्रमाण वाढविणे अत्यंत गरजेचे असल्याने ‘माझे लसीकरण सर्वांचे संरक्षण, सर्वांचे लसीकरण माझे संरक्षण’ हा कार्यक्रम मोहिम स्वरुपात राबविण्यात येत आहे. याअंतर्गत लसीकरणास गती देण्यासाठी आणि लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी दिनांक 3 जुलै 2021 रोजी ‘मिशन लसीकरण 30000’ हा कार्यक्रम मोहिम स्वरुपात राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यंत्रणेला दिल्या आहेत.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्व तालुकास्तरीय लसीकरण समिती यांनी आपल्या तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये जास्तीतजास्त लसीकरण करण्यासाठी केंद्राची निश्चिती करावी. निश्चित करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावर लसीकरणाबाबत प्रबोधन, प्रसिध्दी व लोकांना लसीकरणासाठी घेऊन येण्यासाठी पाठपुरावा करावा. झालेल्या लसीकरणाचा आढावा घेऊन शिल्लक असणारे लसीकरण एकाच दिवशी जास्तीत जास्त लाभार्थ्यांचे लसीकरणाचे नियोजन तालुकास्तरीय समितीने करावे. मिशन लसीकरण 30 हजार ही एक दिवसीय मोहीम राबवून या पुढेही लसीकरणाचे प्रमाण, नागरिकांमध्ये प्रबोधन, लसीकरणासाठी पात्र लाभार्थ्यांकडे पाठपुरावा यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, क्षेत्रीय कर्मचारी, ग्रामस्तरीय व प्रभागस्तरीय लसीकरण समिती यांचा सहभाग घेऊन 100 टक्के पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी तालुक्याला प्राप्त होणाऱ्या लसी त्याच दिवशी वापरात आणून संपविता येतील. त्यानुसार नियोजन पाठपुरावा तालुकास्तरीय लसीकरण समितीने करावा. तसेच ज्या तालुक्याकडून निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्तता किंवा उद्दिष्टापेक्षा जास्त लसीकरण करण्यात येईल त्या संबंधीत तालुकास्तरीय समितीचा प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे

Copyright ©