Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात 7 कोरोनामुक्त ; 6 पॉझेटिव्ह – जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1866 बेड उपलब्ध

शेतकऱ्यांना प्रगतीशील शेती करण्यासाठी उद्युक्त करावे

पुरस्कारप्राप्त प्रगत शेतकऱ्यांच्या सत्कार प्रसंगी जिल्हाधिकारी यांचे आवाहन

यवतमाळ दि. 1 जुलै, आदर्श शेतकरी म्हणून नावलौकीक मिळविणाऱ्या प्रगत शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रगतीशील शेती करण्यासाठी उद्युक्त करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज केले.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग व भाजीपालाचे विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल राज्य शासनाचा उद्यानपंडित पुरस्कार-2019 प्राप्त करणारे गाजीपुर ता. दारव्हा येथील प्रगतीशील शेतकरी जगदीश चव्हाण व वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार-2019 प्राप्त करणारे खैरगाव ता. केळापूर येथील महेंद्र नैताम यांचा आज कृषी दिनानिमित्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, वसंतराव नाईक जैवतंत्रज्ञान विद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.के.डी.ठाकूर, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर.एन.काटकर, पुणे येथील कृषी उपसंचालक जांबवंत घोडके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. प्रमोद यादगीरवार, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

कृषी विज्ञानाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा व अभ्यासाचा फायदा शेतकऱ्यांना जादा पीक उत्पन्नातून मिळावा व त्यातून शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी कृषी वैज्ञानीक व कृषी अधीकाऱ्यांनी नवनवीन संशोधन करून ते शेतकऱ्यांपर्यत पोहचविण्यासाठी प्रयत्नरत राहण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरेश नेमाने यांनी तर संचालन मयुर ढोले यांनी केले.

कार्यक्रमाला प्रगतीशील शेतकरी, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे, कृषी वैज्ञानिक डॉ. सुकेशनी वाने, तालुक कृषी अधिकारी श्री. धानोडे, तांत्रीक अधिकारी श्री. पिंपरखेडे तसेच कृषी विज्ञान केंद्र व जैवतंत्रज्ञान विद्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

———————————–

जिल्हाधिकारी कार्यालयात वसंतराव नाईक जयंती

– जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण

यवतमाळ दि. 1 जुलै : हरीत क्रांतीचे जनक व राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी कृषी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल परिसरात जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे व निवासी उपजिल्हाधिकारी लीलतकुमार वऱ्हाडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

___________________________________

यवतमाळ दि. 1 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात केवळ 6 जण पॉझेटिव्ह तर 7 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 709 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 6 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 703 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 47 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72733 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70900 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये दारव्हा, नेर, पांढरकवडा, पुसद, यवतमाळ व झरी जामणी येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 81 हजार 237 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 08 हजार 404 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.68 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.85 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1866 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1905 आहे. यापैकी 39 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1866 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 637 बेडपैकी 27 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 610 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 11 रुग्णांसाठी उपयोगात तर 625 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 1 उपयोगात तर 631 बेड शिल्लक आहेत.

__________________________________

अनुसूचित जमातीच्या नागरिकांना रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या खर्चाची प्रतिपूर्ती मिळणार

यवतमाळ दि. 1 जुलै : राज्य शासनाच्या 20 एप्रिल 2019 च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जमातीच्या नागरिकांना न्युक्लीअस बजेट अंतर्गत कोविड-19 उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या खर्चाची प्रतिपूर्ती देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी जातीचा दाखला, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडून प्रमाणित केलेले खाजगी रुग्णालयाचे देयक, बँकेचे खाते क्रमांक, आयएफएससी कोड व आधार कार्डची प्रत इ. कागदपत्रासह आपला प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा या कार्यालयात सादर करावा, असे प्रकल्प अधिकारी विवेक जॉन्सन यांनी कळविले आहे.

Copyright ©