Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह – जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1869 बेड उपलब्ध

 

यवतमाळ, दि. 30 जून : गेल्या 24 तासात जिल्ह्यात केवळ 9 जण पॉझेटिव्ह तर 4 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 768 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 9 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 759 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 48 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72727 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70893 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये महागाव येथील दोन, नेर एक, पांढरकवडा एक, पुसद तीन, उमरखेड एक व यवतमाळ येथील एका रूग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 80 हजार 444 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 07 हजार 697 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.69 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.17 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1869 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1905 आहे. यापैकी 36 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1869 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 637 बेडपैकी 23 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 614 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 12 रुग्णांसाठी उपयोगात तर 624 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 1 उपयोगात तर 631 बेड शिल्लक आहेत.

___________________________________

कृषी दिनानिमित्त मुख्यमंत्री प्रगतीशील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार

यवतमाळ, दि. 30 जून : खरीप हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन 21 जून ते 1 जुलै 2021 या कालावधीत कृषी संजिवनी मोहिम यशस्वीपणे पार पडत आहे. दिनांक 1 जुलै 2021 रोजी महाराष्ट्राच्या हरीत क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमीत्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या कृषी दिनी या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप आहे.

नुकतेच कृषी विभागामार्फत सन 2020 च्या रब्बी हंगामाचे रब्बी ज्वारी, गहू, हरभरा आणि करडई या पिकांसाठी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीचे पिकस्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात आले. दिनांक 01 जुलै रोजी मुंबई येथे दुपारी 12.30 वाजता मंत्रालय येथे होणाऱ्या कृषी दिन कार्यक्रमामध्ये या राज्यस्तरीय रब्बी हंगाम 2020 मधील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते सत्कार होणार आहे.

सदर कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, कृषीमंत्री, फलोत्पादनमंत्री, कृषि राज्यमंत्री, फलोत्पादन राज्यमंत्री, सचिव (कृषि) आणि कृषी आयुक्त यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. तसेच सदर कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री हे कृषी विभागाच्या रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाच्या युट्युब चैनल www.youtube.com/c/AgricultureDepar tmentGOM वरुन होणार असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ यांचे मार्फत करण्यात येत आहे.

___________________________________

मदतदार यादी शुद्धीकरणासाठी राजकीय पक्षासोबत चर्चा संपन्न

यवतमाळ, दि. 30 जून : भारत निवडणूक आयोगाचे निर्देशान्वये, 78-यवतमाळ विधानसभा मतदार संघातील मतदार यादी दोषरहीत, शुध्दीकरण व अद्यावत करण्याच्या अनुषंगाने दिनांक 29 जून 2021 रोजी तहसिल कार्यालय, यवतमाळ येथे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व तहसिलदार यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय व विविध राजकीय पक्षाचे गटनेते यांचे समवेत सभा संपन्न झाली.

आयोजित सभेमध्ये उपविभागीय अधिकारी, यवतमाळ तथा मतदार नोंदणी अधिकारी यांनी मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे रंगीत छायाचित्र गोळा करणे, त्याचप्रमाणे मतदार यादीत नमुद पत्यावर मतदार राहत नसल्याचे आढळून आले आहे, अशा मतदारांची नावे वगळणे तसेत मय्यत, स्थलांतरीत, दुबार नाव असलेले मतदार यांचे नाव कमी करणे याकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्यक्ष घरोघरी भेटी देणार असून, सदरच्या राष्ट्रीय कामास योग्य ते सहकार्य करणेबाबत राष्ट्रीय व राजकीय पक्षाचे गटनेते यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. सदर सभेस भारतीय जनता पार्टीचे गटनेता विजय खडसे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे गटनेता वंदु चौधरी, शिवशेना गटनेता गजानन इंगोले, बहूजन समाज पार्टीचे गटनेता श्री. धवने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेता पंकज गुंडे तसेच निवडणूक नायब तहसिलदार राजेश कहारे ई. उपस्थित होते.

__________________________________
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणद्वारे वृक्षारोपण

यवतमाळ, दि. 30 जून : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व जिल्हा न्यायालय, यवतमाळ तसेच जिल्हा वकील संघ, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमानाने जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्य दिनांक 29 जून 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपन करण्यात आले.

सदर वृक्षारोपनाकरीता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर आर. पेठकर, जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.जी. भंसाळी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश एम.आर.ए. शेख तसेच जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष जितेंद्र बारडकर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष्य अमित बदनोरे आणि जिल्हा वकील संघाचे कार्याध्यक्ष सचिन आठवले यांच्या उपस्थितीत जिल्हा न्यायालयाच्या परिसरामध्ये विविध जाती व प्रजातीची झाडे लावण्यात आली.

_________________________________

पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास योजनेअंतर्गत 90 टक्के कर्ज

यवतमाळ, दि. 30 जून : केंद्र शासनाने सन २०२०-२१ या वर्षापासुन पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी या नवीन योजनेस मंजूरी प्रदान केली असून, सन २०२१ – २२ या वर्षात सदर योजनेकरीता १५ हजार रुपये कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. सदर योजनेअंतर्गत दुध प्रक्रिया (आईसक्रीम, चीज निर्मीती, दुध पाश्चरायझेशन, दुध पाऊडर, इत्यादी) मांस निर्मीती व प्रक्रिया, पशुखाद्य टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटीन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मीती, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना ९० टक्के कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार असून, व्याज दरामध्ये ३ टक्के सुट देण्यात येणार आहे.

योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना, योजनेसंदर्भात वारंवार उपस्थित होणारी प्रश्नोत्तरे, योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाच्या अर्जाचा नमूना आणि आवश्यक कागदपत्रांची यादी केंद्र शासनाच्या पशुपालन व डेअरी विभागाच्या संकेतस्थळावर http://dahd.nic.in/ahdf उपलब्ध आहे. सदर योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन आहे. विभागाच्या संकेतस्थळावर http://ahd.maharashtra.gov.in लिंक देण्यात आलेली आहे.

केंद्र शासनाने वर नमूद उद्योग व्यवसायासोबतच लिंग विनिश्चित विर्यमात्रा निर्मीती, बाह्यफलन केंद्र (आयव्हीएफ), पशुधनाच्या शुध्द वंशावळीच्या प्रजातींचे संवर्धन या बाबींचा समावेश केलेला आहे. सदर योजनेचा व्यक्तीगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, खाजगी संस्था, कलम ८ अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी यांना लाभ घेता येईल. राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाचा पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी असून, राज्यातील इच्छुक व्यावसायिक, उद्योजक व संस्था यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. प्रदीप नागापुरे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.क्राती काटोले यांनी केले आहे.

Copyright ©