Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात 3 कोरोनामुक्त ; 2 पॉझेटिव्ह जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2408 बेड उपलब्ध

 

यवतमाळ, दि. 28 जून : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 2 जण पॉझेटिव्ह तर 3 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 405 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 2 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 403 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 51 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72717 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70880 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये आर्णी व महागाव येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 79 हजार 232 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 06 हजार 515 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.71 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.49 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2408 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2449 आहे. यापैकी 41 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2408 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 637 बेडपैकी 24 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 613 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 14 रुग्णांसाठी उपयोगात तर 522 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 3 उपयोगात तर 1173 बेड शिल्लक आहेत.

_________________________________

तीसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ऑक्सीजन व्यवस्थापनाचे नियोजन करा

कोरोना टास्क फोर्स समितीच्या सभेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

यवतमाळ, दि. 28 जून : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पुर्वतयारी म्हणून जिल्ह्यात ऑक्सीजन प्लँट उभारणीसोबतच त्याचा योग्य वापर, ऑक्सीजन गळती थांबवीणे, ऑक्सीजन ऑडीटमधील परिच्छेदांचे अनुपालन, ऑक्सीजनची सुयोग्य वाहतूक, पर्याप्त ऑक्सीजन सिलेंडरची खरेदी, ऑक्सीजन सिलेंडर रिफीलींग युनीट, ऑक्सीजनचा राखीव साठा ठेवणे यासोबतच ऑक्सीजनच्या सुयोग्य वापरासंबंधी डॉक्टर, परिचारीका व तांत्रीक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे इ. ऑक्सीजन व्यवस्थापनाच्या बाबींचे सुक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज कोरोना टास्क फोर्स समितीच्या बैठकीत दिल्या.

बैठकीला अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मिलींड कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी सुहास कोरे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी येडगे यांनी जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर व रुग्णालयात वाढविण्यात येणाऱ्या ऑक्सीजन खाटा, ऑक्सीजन सिलेंडर व इतर साहित्य संबंधीत पुरवठादारांकडून तातडीने प्राप्त करून पुढील 15 दिवसात जिल्ह्यातील सर्व कोविड रूग्णालये परिपुर्ण तयारीने अद्यावत करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात सध्या कोवीड तपासण्याचे प्रमाण कमी दिसून येत आहे, त्या वाढवून दररोज दोन ते तीन हजार तपासण्या करण्याचे त्यांनी सांगितले. लसीकरणाबाबतही त्यांनी आढावा घेतला.

तत्पुर्वी आज सकाळी राज्याचे मुख्य सचिव यांनी सर्व जिल्ह्यांचा कोविडच्या अनुषंगाने व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या अडचणी आल्या त्या तीसऱ्या लाटेत कराव्या लागू नये म्हणून आवश्यक ऑक्सीजन स्टोरेज व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले तर जिल्ह्यातील ऑक्सीजन स्टोरेजशी संबंधीत सर्व कामे 31 जुलै पर्यंत पुर्ण करण्यात येतील असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

बैठकीला आरोग्य विभागाशी संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

____________________________________

आदिवासी विकास योजनांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

यवतमाळ, दि. 28 जून : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा या कार्यालयामार्फत सन 2021-22 या वर्षात विशेष केंद्रीय सहाय योजना, भारतीय संविधान अनुच्छेद 275(1) / आदिम जमातींचे संरक्षण तथा विकास (सीसीडी) कोलाम पॅकेज / पारधी पॅकेज योजनेंतर्गत या प्रकल्पांतर्गत येत असलेल्या यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव, वणी, केळापूर, घाटंजी, झरी-जामणी या 9 तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांकडून विविध योजनेकरीता अर्ज सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते.

उक्त जाहिरातीच्या अनुषंगाने या प्रकल्पांतर्गत येत असलेल्या 9 तालुक्यातील लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दिनांक 2 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

____________________________________

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची स्माईल योजना

कोरोनामुळे कुटूंबप्रमुख गमावलेल्या कुटूंबाचे पुनर्वसनासाठी कर्ज

यवतमाळ, दि. 28 जून : एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्यामार्फत कोविड – 19 या जागतिक महामारीत ज्या अनुसूचित जातीच्या कुटूंबप्रमुखाचा मृत्यू झाला आहे, त्या कुटूंबियाचे पुनर्वसन करण्यासाठी स्माईल (support for marginalized individuals for Livelihoods Enterperie- SMILE) अंतर्गत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे.

या योजनेअंतर्गत रुपये 1 लक्ष ते 5 लक्ष पर्यंत मुल्य असलेल्या प्रकल्पाकरिता एनएसएफडीसी सहभाग 80 टक्के, भांडवल अनुदान 20 टक्के, व्याजदर 6 टक्के तर परतफेडीचा कालावधी 6 वर्ष राहील.

पात्रता : सदर योजनेकरिता अर्जदार अनुसूचित जातीतील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्‍न 3 लक्ष रुपयेपर्यंत असावे, अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटूंब प्रमुखाच्या कुटूंबातील सदस्य असावा, कुटूंबप्रमुखाच्या रेशनकार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटूंब प्रमुखाची मिळकत कुटूंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींकरीता पुढीलपैकी एक दस्ताऐवज आवश्यक आहे, महानगरपालिका / नगरपालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र, स्मशानभूमी प्रधिकरणाने दिलेली पावती, एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गटविकास अधिकाऱ्यांने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र.

आवश्यक कागदपत्रे : मयत व्यक्तीचे नाव पत्ता, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला (3 लक्ष पर्यंत), कोविड – 19 मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, रेशन कार्ड, वयाचा पुरावा.

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटूंबातील व्यक्तीने उपरोक्त वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अथवा https://forms.gle/7mG8CMecLknWGt6k7 या लिंकवर भरण्यात यावी, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक माधूरी अवघाते यांनी केले आहे.

____________________________________

दुचाकी वाहन नोंदणी नवीन मालीका सुरू

आकर्षक क्रमांकासाठी लाभ घ्येण्याचे उपप्रादेदिक परिवहन विभागाचे आवाहन

यवतमाळ, दि. 28 जून : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळ येथे परिवहन विभागाकरीता वाहन 4.0 प्रणाली सुरु करण्यात आली आहे. सद्या स्कुटर/मोपेड/मोटार सायकल या दुचाकी वाहनासाठी एमएच-29 बीटी 0001 ते टीओ 9999 ही नवीन मालिका निर्गमित करण्यात येत आहे.

नमुद मालिकेतील आकर्षक क्रमांकाकरीता इच्छुक अर्जदारांनी विहीत नमुन्यात अर्ज दिनांक 28 जून 2021 रोजी कार्यालयात सादर करावेत. वर नमुद मालिकेमधील नियमित क्रमांक देणे सुरु आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वाढोकर यांनी कळविले आहे.

____________________________________

मतदार यादीत 30 जूनपर्यंत छायाचित्र अद्यावत करावे

यवतमाळ, दि. 28 जून : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये 78-यवतमाळ विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना सुचित करण्यात येते की, मतदार यादी दोषरहित, शुध्दीकरण व अद्यावत करण्यासाठी व्यापक स्तरावर मोहीम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेंतर्गत मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे रंगीत छायाचित्र गोळा करणे, त्याचप्रमाणे मतदार यादीत नमूद पत्यावर मतदार राहत नसल्याचे आढळून आले आहे अशा मतदारांची नावे लोकप्रतीनिधीत्व अधिनियम 1950 व मतदार नोंदणी अधिनियम 1960 मधील तरतुदी नुसार वगळणे तसेच मय्यत, स्थलांतरीत, दुबार नाव असलेले मतदार यांचे नाव कमी करणे या करीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्यक्ष घरोघरी भेटी देणार आहे. ज्या मतदारांचे मतदार यादीमध्ये स्वत:चे नावासमोर रंगीत छायाचित्र नाही अशा सर्व छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी yavatmal.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी सदर राष्ट्रीय कामास मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व प्रशासनाला योग्य सहकार्य करावे. दिनांक 30 जुन 2021 पर्यंत मतदारांना आपले फोटो सादर न केल्यास यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येइल याची मतदारांनी नोंद घ्यावी व त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, यवतमाळ यांनी केले आहे.

Copyright ©