यवतमाळ सामाजिक

धर्मांतराची वाढती समस्या : उपाय काय आहेत ?’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

धर्मांतरबंदी करण्यासाठी केंद्रीय कायद्यासह हवाला आणि काळा पैशावर प्रतिबंध आवश्यक ! – अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय, सर्वोच्च न्यायालय
यवतमाळ – धर्मांतराची समस्या भारताच्या स्वातंत्र्यपूर्वकाळापासून चालू आहे. परकीय आक्रमकांनी भारताची केवळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हे, तर भारताला ‘गझवा-ए-हिंद’ (इस्लामी राज्य) बनवण्यासाठी आक्रमणे केली आहेत. आज धर्मांतरासाठी विदेशांतून ‘हवाला’ आणि ‘काळे धन’ यांच्या माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर पैसा येत आहे. केवळ मिशनरी-धर्मांधांनाच नव्हे; तर नक्षलवादी, माओवादी, फुटिरतावादी, आतंकवादी या सर्वांना हवालाच्या माध्यमांतून पैसा सर्वत्र पोहोचवला जातो. त्यामुळे देशाला सर्वांत मोठा धोका ‘हवाला’ आणि ‘काळे धन’ यांमुळे निर्माण झाला आहे. धर्मांतरावर खर्‍या अर्थाने बंदी आणायची असेल, तर या ‘हवाला’ आणि ‘काळे धन’ बंद करण्यासाठी 100 च्या वरील नोटा चलनात आणू नये, तसेच धर्मांतराच्या विरोधात कठोरतम कलम भारतीय दंड संहितेमध्ये वाढवावे. त्यात 10 ते 20 वर्षे कारावास अन् संपत्ती जप्तीचा अंतर्भाव असावा, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय यांनी केले. ते ‘हिंदु जनजागृती समिती’ आयोजित ‘धर्मांतराची वाढती समस्या : उपाय काय आहेत ?’, या ऑनलाईन विशेष परिसंवादात बोलत होते. हा कार्यक्रम समितीच्या Hindujagruti.org या संकेतस्थळाद्वारे, तसेच यू-ट्यूब आणि ट्वीटर यांद्वारे 3800 हून अधिक लोकांनी प्रत्यक्ष पाहिला.
या वेळी बोलतांना उत्तरप्रदेश येथील ‘इंडिक अकॅडमी’चे समन्वयक श्री. विकास सारस्वत म्हणाले की, धर्मांतरबंदी कायदा अनेक राज्यांत असूनही एकाही मिशनरींवर कठोर कारवाई केलेली नाही. अन्य बेकायदेशीर कृत्यांमध्ये सापडल्यावरही धर्मांधांवर कारवाई करण्याची हिंमत सरकार आणि पोलीस दाखवत नाहीत. धर्मांतर कसे करावे, यासाठी विदेशांत विविध पद्धतीचे प्रगत प्रशिक्षण दिले जाते. अशांचा सामना करण्यासाठी केवळ धर्मांतरबंदी कायद्यावर विसंबून चालणार नाही. कायद्यातून पळवाटा काढल्या जातात. त्यापेक्षा हिंदु धर्माचे मिशनरी निर्माण केले पाहिजेत. धर्मांतराला उत्तर प्रतिधर्मांतरानेच दिले पाहिजे.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे आंध्र प्रदेश समन्वयक श्री. चेतन जनार्दन म्हणाले की, धर्मांतरामुळे देशातील 7 राज्यांमध्ये आज हिंदु अल्पसंख्यांक झालेले आहेत. कोरोना महामारीच्या काळात एक लाखांहून अधिक हिंदूंचे धर्मांतर केल्याचे ख्रिश्‍चन मिशनरी उघडपणे सांगत आहेत. एका धर्मांतर झालेल्या व्यक्तीकडून आंध्र प्रदेशात 100 हून अधिक मूर्ती भंजनाच्या घडना घडलेल्या आहेत. एका ठिकाणी ख्रिश्‍चन पास्टर विजय म्हणाला की, हिंदूंना आमची अडचण होत असेल, तर आम्हाला वेगळे राष्ट्र द्या. यावरून त्यांची मानसिकता लक्षात येते. या सर्व धर्मांतरावर मूलभूत उपाय म्हणून हिंदूंना आपल्या धर्माचे शिक्षण देणे, हा आहे. यासाठी समितीने अनेक ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्ग चालू केले आहेत. त्यातून हिंदूंना जागृत आणि संघटित केले जात आहे. एकदा जागृत झालेला हिंदु धर्मांतरीत होत नाही.

Copyright ©