Breaking News यवतमाळ सामाजिक

जिल्ह्यात कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू

• दुकाने, हॉटेल्स, खाजगी कार्यालये सायंकाळी चार वाजेपर्यंत

• मॉल्स, खाजगी शिकवण्या, चित्रपट गृह, प्रार्थना स्थळे बंद
• लग्न समारंभात 50 तर अंतविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थितीस परवानगी
खाजगी व शासकीय कार्यलये 50 टक्के क्षमतेने सुरू

• अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार व रविवार सर्व बंद

यवतमाळ, दि.26: कोव्हिड-19 च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यवतमाळ जिल्हा करिता सोमवार दिनांक 28 जून च्या सकाळी सात वाजेपासून सुधारित मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत.

सुधारित सूचनांनुसार अत्यावश्यक वस्तू व सेवेंची दुकाने रोज सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरु राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना व दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत तर शनिवार व रविवारी पूर्णतः बंद राहतील.

रेस्टॉरंट, हॉटेल, खानावळी व शिवभोजन केंद्र सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत 50 टक्के आसन क्षमतेने सुरू राहतील. शनिवार व रविवारी फक्त पार्सल सेवा व होम डिलिव्हरी सुविधा सुरू राहील.

मॉल, चित्रपटगृह, नाट्यगृहे बंद राहतील.सार्वजनिक जागा, खुली मैदाने, वॉकिंग, सायकलींग करिता सकाळी पाच ते नऊ मुभा राहील.

खाजगी कार्यालये सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत क्षमतेने सुरु राहतील, तथापि खाजगी बँका, विमा, औषध कंपन्या, सूक्ष्म वित्त संस्था व गैर बँकिंग वित्त संस्था यांचे कार्यालय नियमितपणे सुरू राहू शकतील.

शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयातील उपस्थिती क्षमतेच्या 50% राहील तथापि कोरोना विषयक कामे करणाऱ्या आस्थापना, कृषी, बॅंक, मान्सूनपूर्व कामाशी संबंधित यंत्रणा, दुय्यम निबंधक कार्यालये, एल. आय. सी., एम. एस. आर. टी. सी. पूर्ण क्षमतेने सुरू राहतील.

सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, विवाह समारंभ 50 लोकांच्या उपस्थितीत करता येईल तर अंत्ययात्रेस 20 लोकांची परवानगी राहील.

बांधकामची कामे ज्या ठिकाणी मजुरांची राहण्याची व्यवस्था आहे अशा ठिकाणी नियमित वेळेत सुरू राहतील किंवा बाहेरून मजूर आणण्याचे बाबतीत सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. ई-कॉमर्स वस्तू व सेवा कोवीड नियमांचे पालन करून पूर्णवेळ सुरू राहतील.

जिम, सलुन, ब्युटी पार्लर,स्पा, वेलनेस सेंटर दररोज सायंकाळी चार वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेनुसार व ए.सी. चा वापर न करता सुरू राहील. क्रीडासाठी मोकळ्या जागेत सकाळी पाच ते नऊ संध्याकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत मुभा राहील.

सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू राहील, तथापि प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास मनाई राहील. बाहेर जिल्ह्यातील प्रवासी लेव्हल पाच मधून येणार असेल तर ई-पास आवश्यक राहील.

उत्पादन क्षेत्रात निर्यातप्रधान उद्योग, अत्यावश्यक वस्तू व त्यावरील पॅकिंगचे उत्पादन, निरंतर प्रक्रिया असलेले उद्योग,संरक्षण संबंधित उद्योग, डाटा सेंटर, माहिती तंत्रज्ञान सेवा संबंधीचे उद्योग, गुंतागुंतीचे पायाभूत सेवा व उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू राहतील तर इतर उत्पादन क्षेत्रातील उद्योग आस्थापना 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. संपूर्ण जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी तर त्यानंतर संचारबंदी लागू राहील.

मास्क लावणे, सामाजिक अंतर, सॅनिटायझर किंवा हॅन्डवॉशने नियमित हाताची स्वच्छता इ. कोविड त्रिसूत्रिचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील, सदरचे पालन न केल्याचे आढळून आल्यास संबधीत आस्थापना धारक यांचेवर पहिल्यांदा 5 हजार रुपये दंड व पुन्हा आढळून आल्यास 10 हजार रुपये दंड आकारण्यात येईल व योग्य प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच दुकानासमोर नो मास्क नो एन्ट्री (मास्क नाही प्रवेश नाही) असे बोर्ड त्यासोबत कोविड त्रिसूत्रिचे पालन करण्याबाबतचे ग्राहकांना आवाहन ह्याबाबत डिजीटली प्रिंटेड किंवा हस्ताक्षराने लिहलेला साधा बोर्ड दर्शनी भागात लावणे बंधनकारक राहील. दुकानासमोर ग्राहकांना योग्य सामाजिक अंतर राखून उभे राहण्याकरीता स्पष्ट दिसेल असे वर्तूळ करण्यात यावे. दुकानासमोरील पार्किंगच्या जागेत व ओट्यावर सामान ठेवण्यात येऊ नये जेणेकरून सदर जागा ग्राहकांना उभे राहण्याकरीता वापरता येईल व गर्दी होणार नाही.

आदेशांचे उल्लंघन करतील त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद आहे.

Copyright ©