Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात 16 कोरोनामुक्त ; 12 पॉझेटिव्ह जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2236 बेड उपलब्ध

 

यवतमाळ, दि. 24 जून : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 12 जण पॉझेटिव्ह तर 16 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 775 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 12 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 763 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 60 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72683 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70837 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 76 हजार 668 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 03 हजार 969 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.74 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.55 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2236 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 43 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2236 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 29 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 548 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 11 रुग्णांसाठी उपयोगात तर 515 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 3 उपयोगात तर 1173 बेड शिल्लक आहेत.

____________________________

कोविड अनुकूल वर्तणुक तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाची विशेष मोहिम

* 720 आस्थापनांवर कारवाईतून रु. 159700 दंड वसुल

यवतमाळ दि. 24 : कोविड पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये प्रशासनाद्वारे जिल्ह्यात विविध नियम लागू करण्यात आले आहेत. दिनांक 7 जून पासून ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत जिल्हा लेव्हल वन मध्ये आल्याने शासनाने कोविड प्रसार नियंत्रित ठेवण्यासाठी ठरवून दिलेल्या सूचनांच्या अधिन राहून अनेक बाबींना मुभा देण्यात आली आहे. याअंतर्गत प्रत्येक वस्तु व सेवा पुरविणाऱ्या आस्थापना चालकांकडून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होते किंवा नाही याबाबr जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार काल दि. 23 जून रोजी जिल्हा प्रशासनाद्वारे विशेष मोहिम राबवून तपासणी करण्यात आली.

या मोहिमेत शहरी भागात 355 तर ग्रामीण भागात 2587 असे एकूण 2942 दुकाने व आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यात कोविडचे नियम न पाळणाऱ्या 720 आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येवून रुपये एक लाख 59 हजार 700 दंड वसुल करण्यात आला.

जिल्ह्यातील 16 तालुक्यातील ग्रामीण भागात काल 2587 दुकाने व आस्थानांची तपासणी करण्यात आली. यापैकी 538 आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून रु. 88 हजार 700 दंड वसुल करण्यात आला. यात पुसद तालुक्यात सर्वाधिक 187 दुकानांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचेकडून रु. 24 हजार 400 दंड वसुल करण्यात आला. तर यवतमाळ शहरात 355 दुकाने व आस्थापनांची तपासणी करून कोविडचे नियम न पाळणाऱ्या 182 आस्थापनांकडून 71 हजार दंड वसूल करण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांच्या पथकाने सर्वाधिक 56 आस्थापनेवर कारवाई करून 41 हजार 200 रुपये दंड वसुल केला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या निर्देशनुसार जिल्ह्यातील प्रत्येक अत्यावश्यक वस्तू,सेवा व इतर वस्तू पुरविणाऱ्या आस्थापना चालक व त्यामधील सर्व कर्मचारी तसेच होम डिलेव्हरी व्दारे वस्तू/सेवा देणारे कर्मचारी यांनी लसीकरण करणे अथवा त्यांच्याकडे कोविड चाचणी निगेटीव्ह असल्याबाबतचा अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे. कोविड चाचणी अहवाल हा अहवालाच्या दिनांकापासून 15 दिवसांसाठी वैध राहील. लसीकरण न केल्याचे किंवा वरील मुदतीतील कोविड निगेटीव्ह अहवाल नसल्यास शासकीय पथाकाव्दारे पहिल्या वेळेस रु. 100 व त्यानंतर प्रत्येक वेळेस रु. 200 दंड आकारण्यात येईल. तसेच दुकान मालक/कामगार व ग्राहक यांनी मास्क लावणे, सामाजिक अंतर, सॉनिटायझर किंवा हॅन्डवॉशने नियमित हाताची स्वच्छता इ. कोविड त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. सदरचे पालन न केल्याचे आढळून आल्यास संबधित आस्थापना धारक यांचेवर पहिल्यांदा रु. पाच हजार दंड व पुन्हा आढळून आल्यास रु. 10 हजार दंड व योग्य प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. आस्थापना समोर नो मॉस्क नो एन्ट्री (मास्क नाही प्रवेश नाही) असे डिजीटली प्रिंटेड किंवा हस्ताक्षराने लिहलेला साधा बोर्ड दर्शनी भागात लावण्यात यावा.

प्रत्येक नागरीक योग्य पध्दतीने मास्क चा वापर न केल्याचे आढळल्यास अश्या सर्व व्यक्ती कडून प्रत्येकी रु. 500 प्रमाणे दंड आकारण्यात यावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

कोरोना अद्याप गेलेला नाही, कमी अधिक रुग्ण अद्यापही आढळून येत आहे, तरी सर्व नागरिकांनी मास्क लावणे, सुरक्षीत अंतराचे पालन करणे, वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकरी अमोल येडगे यांनी केले आहे.

Copyright ©