महाराष्ट्र सामाजिक

अखेर राज्यातील आशा वर्कर्सच्या ‘संप’ला विराम

मुंबई,
महाराष्ट्र राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या आशा वर्कर्सचा ‘संप’ला अखेर विराम मिळाला आहे. आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेला यश आले आहे. कोरोना काळात सेवाभत्ता वाढवून मिळावा, या मागणीसाठी आशा वर्कर्स संपावर गेलेल्या होते. याशिवाय त्यांच्याकडून इतरही काही मागण्या करण्यात आल्या होत्या. अखेर हा संप मिटला, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आली आहे.

राज्यातील आशा वर्कर्स योग्य मानधन, आरोग्य सुविधा, विमा योजना यांसारख्या विविध सुविधा मिळाव्यात यासाठी संपावर गेल्या होत्या. या संपात राज्यातील 72 हजारांहून अधिक आशा वर्कर्स संपावर गेल्या होत्या. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आमचा संप सुरुच राहिल, असा निर्णय आशा वर्कर्सनी घेतला होता. यानुसार राज्यातील 72 हजारांहून अधिक आशा वर्कर कामावर न जाता घरी बसून हा संप केला. वारंवार सांगूनही सरकारने अजिबात आशा वर्कर्सबाबत गंभीर दखल घेतली नाही. कोरोना काळात कामे करुनही त्यांना कमी मानधन दिले जात आहे, अशा अनेक मागण्यांसाठी राज्यभरातील आशा वर्कर्सनी एकत्र येत संप पुकारला होता.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरातील आशा वर्कर्सनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी, आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये चर्चा सुरु होत्या. आशा वर्कर्सचा संप पुकारल्यापासून आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये तीन बैठका झाल्या. या बैठकांमध्ये चर्चेच्या अंती निर्णय झाला. एक जुलैपासून निश्चित मानधनात वाढ करुन एक हजार रुपये केलं जाणार असल्याची हमी आशा वर्कर्सना देण्यात आल्यामुळे त्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Copyright ©