Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात 13 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2233 बेड उपलब्ध

 

यवतमाळ, दि. 23 जून : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 15 जण पॉझेटिव्ह तर 13 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1080 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 15 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1065 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 64 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72671 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70821 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 76 हजार 05 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 03 हजार 171 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.75 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.39 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2233 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 46 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2233 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 26 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 551 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 17 रुग्णांसाठी उपयोगात तर 509 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 3 उपयोगात तर 1173 बेड शिल्लक आहेत.

________________________________

कोविडमुळे अनाथ मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी बीजेएस चा पुढाकार

यवतमाळ दि. 23, कोविडमुळे आई-वडिलांचे अथवा आई किंवा वडील यापैकी कोणाचेही एकाचे छत्र हरपलेल्या मुला-मुलींचे शैक्षणिक पुनर्वसन करण्यासाठी भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात बीजेएस ने जिल्ह्यातील अशा अनाथ विद्यार्थ्यांची माहिती मागीतली आहे. या यादीनुसार इयत्ता ५ वी ते ११ वी पर्यंत मराठी माध्यमामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरून घेतले जातील, असे पत्र संस्थेने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना सादर केले असून त्या अनुषंगाने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तसेच सर्व तहसीलदार यांनी आवश्यक पाठपुरावा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी येडगे यांनी दिले आहेत.

कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. तसेच हे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहेत. यांना दैनंदिन शिक्षणाबरोबरच मानसिक तणावातून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, मोठी स्वप्न दाखविणे व ते साकारण्यासाठी सक्षम करणे यासाठी भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) पुढे सरसावली आहे. लातूर भूकंपातील १२०० भूकंपग्रस्त विद्यार्थी, मेळघाट व ठाण्यातील ११०० आदिवासी विद्यार्थी,

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे ७०० विद्यार्थी असे मागील ३० वर्षात एकूण ३००० विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन पूर्ण करून त्यांना एक कर्तबगार, जबाबदार व संवेदनशील नागरिक बनविण्याचे कार्य यशस्वीपणे केले आहे. अशा विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी देश पातळीवरील वरिष्ठ मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याने व पुण्यातील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञांच्या सहाय्याने, संशोधनावर आधारित उपचार करून त्याचे रिपोर्ट्स बनविण्यात आले आहेत. देशातील हा सर्वात मोठा प्रयोग आहे. याचा फायदा कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल असे या संघटनेचे मत आहे.

संघटनेच्या वसतीगृहामध्ये ७०० विद्यार्थ्यांची व्यवस्था असल्यामुळे प्राप्त झालेल्या अर्जातून अंतिम प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची यादी ३० जून २०२१ पर्यन्त जाहीर करण्यात येईल.

‘इयत्ता ५ वी ते इयत्ता ११ वी या प्रत्येक इयत्तेत १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे, जेणेकरून इयत्तांचा समतोल साधला जाईल.

त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून आलेल्या अर्जाची छाननी करून विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेची औपचारिकता पूर्ण करून त्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येईल. कोविडमुळे शाळा बंद असल्याने राज्य शासनाने शाळा सुरु करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनेअशा विद्यार्थ्यांनाच बीजेएसच्या पुणे येथील वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात आणण्यात येईल.

या प्रकल्पातील मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून त्याच संकुलात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, नास्ता,भोजन, खेळ, अधिकचा अभ्यास, दवाखाना, मानसोपचार तज्ञांचा सल्ला, विविध प्रकारच्या स्पर्धा इत्यादी सर्व बाबींची व्यवस्था उपलब्ध असल्याचे संघटनेने प्रशासनाला कळवले आहे.

Copyright ©