यवतमाळ सामाजिक

पोलिसांच्या दुर्लक्षित धोरणाने जरंग येथे अवैध दारू विक्रीला आले उधाण

———————————————–
अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर
———————————————
घाटंजी- तालुक्यातील जरंग येथे पोलिसांच्या दुर्लक्षित धोरणाचा फायदा घेवून अवैध दारू विक्री करण्याच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली असल्याने आजूबाजूच्या गावातील शौकिनांची जत्रा भरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
जरंग परिसरात शेती व्यवसाय करून उदरपोषण करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रथमतःच तो सततच्या नपिकिने मेटाकुटीस आला आहे. अश्यातच या गावात मोहाफुलाची गाळप केलेली गावठी दारू व देशी दारू भरमसाठ प्रमाणात मिळत असल्याने आजूबाजूच्या शौकीन लोकांची गर्दी वाढली आहे. यात अनेकदा हे शौकीन रस्त्याच्या आडोशाला पडून आढळतात यामध्ये त्यांच्या जिवित्वास धोका निर्माण झाला आहे. हा प्रकार रोजचा झाल्याने गावातील महिला व नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावे लागत आहे. यात गावातील अल्पवयीन मुलेही या आधीन जाण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत कोरोनाच्या लॉक डाऊन काळात गावातील युवक वर्गानी पोलीस प्रशासनाला व तहसिलदार यांना मोबाईल मेसेज वरून माहिती देवून हा प्रकार बंद करण्यास विनंती केली. मात्र या विनंतीचा कोणताही फायदा झाला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा प्रकार गावातील सरपंच, पोलीस पाटील यांना माहीत असताना सुध्दा ते याबाबीकडे दुर्लक्ष करतात. याशिवाय या भागाचे बिट जमादार सुध्दा दुर्लक्ष करून निघून जातात. त्यामुळे आता दाद मागायचे कोणाकडे हा विचार गावकऱ्या पुढे आला असून जिल्हा पोलिस अधीक्षक साहेबांनी या गंभीर बाबीला लगाम लावून गावकऱ्याना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.

Copyright ©