Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध

 

यवतमाळ, दि. 22 जून : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 11 जण पॉझेटिव्ह तर 15 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1005 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 11 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 994 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 62 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72656 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70808 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये बाभुळगाव येथील दोन, दिग्रस एक, घाटंजी दोन, नेर दोन, पांढरकवडा एक, राळेगाव एक व वणी येथील दोन रूग्णांचा समावेश आह

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 74 हजार 797 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 02 हजार 105 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.77 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.09 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 48 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2231 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 30 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 547 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 15 रुग्णांसाठी उपयोगात तर 511 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 3 उपयोगात तर 1173 बेड शिल्लक आहेत.

___________________________________

प्राणीक्लेष टाळण्यासाठी व्यापक जनजागृती करा

जिल्हास्तरीय प्राणीक्लेष प्रतिबंध सोसायटीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 22 जून : केंद्र शासनाच्या प्राणी क्लेष प्रतिबंधक अधिनियमान्वये यवतमाळ जिल्ह्यात प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीने प्राण्यांना त्रास होणार नाही याबाबत काळजी घेण्यासाठी ग्रामीण भागात व्यापक स्तरावर जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

जिल्हास्तरीय प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीची आढावा सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आयोजित करण्यात आली होते. सभेला उपवनसंरक्षक केशव वाबळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वाढोकर, समितीचे सदस्य अनिल अटल, विलास कुळकर्णी, सुभाष आचलिचया, प्रविण लुणावत, पुंडलीक देवकते, अमोघ व्होरा आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी येडगे पुढे म्हणाले की जिल्ह्यात अनेक संस्थांमार्फत गोवंश व इतर आजारी प्राण्यांची सेवा करण्यात येते, पशुसंवर्धन विभागाने अशा सेवा केंद्रांची यादी करून त्यातील शासकीय निकषप्रमाणे पात्र ठरणाऱ्या सेवा केंद्रांचा गोवर्धन गोवंश सेवा केंद्रात समावेष करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा व त्यांना शासकीय योजनेचा लाभ द्यावा. अशा संस्थांना गोपालन करतांना चाऱ्याची अडचण जाऊ नये म्हणून वन विभागाच्या ठरावीक जागतून गवत कापूण नेण्यास वन विभागाची परवानगी देखील घेता येईल, असेही त्यांनी सांगितले. पशुसंवर्धन कार्यालयात समितीचा नामफलक लावण्याबाबत तसेच प्राणी क्लेष संदर्भात कार्यालयात येणाऱ्या तक्रारी, इ-मेल व निवेदनावर तात्काळ अनुपालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या.

पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी.ए.नागपुरे यांनी समितीच्या कामकाजाबद्दल माहिती दिली. श्री गोरक्षण, लोखंडी पुल, यवतमाळ व कपीला गोरक्षण, दिग्रस या संस्थांना गोवंश सेवा केंद्र योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येत असल्यामुळे पशु आश्रय स्थळ घोषीत करणे अपेक्षीत असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीला समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते

_____________________________________
प्रतिबंधात्मक उपाययोजनेतून हत्तीरोगाचा समुळ नायनाट करा

– जिल्हाधिकारी अमोल येडगे

हत्तीरोग नियंत्रणासासाठी 1 ते 5 जुलै विशेष मोहिम

यवतमाळ, दि. 22 जून : जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून एकदिवसीय सामुदायीक औषधोपचार व हत्तीरोगासाठी कारणीभूत असणारे क्युलेक्स क्वीलीसीफेसीअस डासांची वाढ रोखण्यासाठी घाण पाणी साठू न देणे, दुषीत पाण्यात गप्पी मासे सोडणे, नाल्या वाहत्या करणे, गटारी बुजविणे, शौचालयाच्या पाईपला जाळी बसविणे आदि प्रतिबंधात्मक उपायोजनांची नियोजनपुर्वक प्रभावी अंमलबजावणी व जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज आरोग्य विभागाला दिल्या.

हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 1 जुलै ते 5 जुलै पर्यंत जिल्ह्यातील आठ तालुक्यात विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा सभा घेण्यात आली. यावेळी आरोग्य सेवेचे अकोला येथील सहाय्यक संचालक डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी पी.एस.चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विजय आकोलकर प्रामुख्याने उपस्थित होते.

हत्तीरोग निर्मूलन मोहिमेचे व्यवस्थीत नियोजन करणे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे व नागरिकांमध्ये या रोगापासून बचावासाठी प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी सांगितले.

हत्तीरोग निर्मुलनासाठी 2014 नंतर प्रथमच जिल्ह्यातील यवतमाळ, कळंब, राळेगाव, घाटंजी, केळापूर, मारेगाव, झरी जामणी व वणी या आठ तालुक्यात ही मोहिम राबविण्यात येत असून 31 प्राथमिक आरोग्य केंद्र, 6 ग्रामीण रुग्णालये व 245 आरोग्य उपकेंद्रामार्फत 1008 गावातील 14 लाख 90 हजार लोकसंख्येचे पर्यवेक्षण करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जनतेमधील हत्तीरोगाचा जंतुभार कमी करण्यासाठी 2 वर्षाखालील मुले, गरोदर माता व गंभीर आजारी रूग्ण वगळता सर्व पात्र जनतेला वयोमानानुसार डिईसी गोळ्यांसोबतच अल्बेंडॅझोलची एक गोळी देण्यात येणार आहे. यामुळे मानवी रक्तामध्ये वाढ होत असलेले मायक्रो फायलेरीय जंतू नष्ट होतात व रूग्ण हत्तीरोगमुक्त होतो अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विजय आकोलकर यांनी दिली.

या मोहिमेंतर्गत अंगनवाडी सेविका, मदतनिस, आशा स्वयंसेवक यांची मदत घेण्यात येत असून गोळ्या वाटपासाठी 7152 मनुष्यबळ व पर्यवेक्षणासाठी 2008 कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. कमलेश भंडारी यांनी सांगितले.

बैठकीला आरोग्य विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

____________________________________

संत्रा-मोसंबी करीता फळपीक विमा योजना

यवतमाळ, दि. 22 जून : प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पुनर्रचीत हवामान आधारीत फळपिक विमा योजना २०२१-२२ मृग बहारामध्ये संत्रा व मोसंबी पिका करीता यवतमाळ जिल्ह्यात लागू करणेबाबत शासनाने दि. १८ जून २०२१ च्या शासन निर्णयाव्दारे मान्यता दिलेली आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा जास्तीत जास्त हप्ता संत्रा व मोसंबी पिकासाठी 4 हजार रुपये प्रति हेक्टर एवढा आहे. सदर योजनेत सहभागाकरीता अंतीम दिनांक ३० जून आहे. यासाठी विमा कंपनी रिलायंस जनरल इन्शुरन्स कं. ली., वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ७ वा मजला, चिंतामणी अव्हेन्यू, विरानी औद्योगिक वसाहत जवळ, गोरेगाव (इ), मुंबई – ४०००६३, ग्राहक सेवा क्र. १८००१०२४०८८ दुरध्वनी क्र. ०२२-६८३२३००७ ई – मेल rgicl.maharashtraagri@relianceada.com या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे. तरी सदर योजनेचा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एन . एम . कोळपकर यांनी केले आहे.

____________________________________

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात योग दिन साजरा

यवतमाळ, दि. 22 जून : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ अंतर्गत अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ यांच्यावतीने दिनांक २१ जुन २०२१ रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला या निमित्य ऑनलाईन सेमीनारचे आयोजन करण्यात आले होते. योग हे माणसाच्या जीवनात आवश्यक आहे. योगाचे महत्व जन माणसाच्या अंगी रुजण्यासाठी व त्यांचा सदोदिन वापर होण्याचे दृष्टीने २१ जून रोजी अंतराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन स्वरूपात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ आर. एन. काटकर होते तर प्रमुख मार्गदर्शक योग ताज डॉ. साहेबराव साखरे, माजी उपप्राचार्य शारिरीक महाविद्यालयाचे,डॉ. बाबासाहेब नंदुरकर होते. योग हा शिक्षाणासोबत अतिआवश्यक असून शरीर व सुदृढ मन राहण्याच्या दृष्टीने योग अत्यंत सोपी पद्धती असुन सातत्य असल्यास शरीर व मन सुदृढ राखण्यास महत्वाचे ठरते. सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. एम. काटकर यांना सेमीनारला सर्व उपस्थितांना योगा बाबतचे महत्व पटवुन दिले.

डॉ. साहेबराव साखरे यांनी योग प्रात्यक्षीक यामध्ये प्राणायाम, ताडासन, वृक्षासन, वज्रासन, पदमासन, भृजंगासन या प्रकारातील योगाचे नाव सांगितले. तसेत त्यांचे सहकारी त्यांचीच मुलगी कु. नेहा साखरे हीने प्रात्यक्षीक स्वरूपात सादर केले व त्यांचे मार्गदर्शनात उपस्थित सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचेकडून मार्गदर्शनानुसार योग क्रिया करवून घेण्यात आल्या यामध्ये सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन योग जाणून घेण्यात आला. यावेळी ऑनलाईन सेमीनार मध्ये 90 विद्यार्थी व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन शारिरीक शिक्षा निदेशक आनंद भुसारी यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन कृष्णा सवळे यांनी केले.

_____________________________________

18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु

यवतमाळ दि. 22: जिल्ह्यात 19 जून पासून 30 ते 44 वयोगटातील नागरिका करिता कोविड लसीकरण निवडक 10 ठिकाणी सुरु करण्यात आले होते, आता शासन स्तरावरून प्राप्त सुधारीत सूचनेनुसार यवतमाळ जिल्यात आज पासून सर्व ठिकाणी 18 वर्ष वयोगटावरील सर्व नागरिकांना कोविड ची लस देण्यात येत आहे. लसीकरणासाठी येतानी नागरिकानी आपले ओळख पत्र दाखवून ऑनस्पॉट किवा आधीच कोविन पोर्टलवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे. तसेच 45 वयोगटावरील नागरिकाना करीता पुर्वी प्रमाणेच लसीकेंद्र सुरू राहणार असून सद्या जिल्ह्यात 107 ठिकाणी लसीकरण सुरू आहेत.

जिल्ह्याला काल 5000 कोवाक्सिन तर 32000 कोविशिल्ड लस प्राप्त झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्याला 445090 कोविशिल्ड व 89730 कोवाक्सिन लस प्राप्त झाली आहे. 18 ते45 वयोगटातील जवळपास 35000 नागरिकांना लस देण्यात आली असून एकूण 507867 नागरिकांचे लसीकरण आरोग्य विभागाने पूर्ण केले आहे.

गावा-गावात लसीकरण राबविण्यात येत आहे. गाव स्तरीय समितीने आपले गावात 18 वर्षे वरील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणे करिता प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आह. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी स्वतःहून पुढे यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

___________________________________

यवतमाळ जिल्ह्याकरीता लसीकरण पोर्टल सुरु

गैरसोय टाळण्यासाठी नोंदणी करावी

यवतमाळ दि. 22: जिल्हयात कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन यवतमाळ जिल्ह्यात लसीकरणाकरीता होणा-या गर्दी तसेच गैरसोय होऊ नये व लसीकरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याचे उद्येशाने नागरीकांना लसीकरण सोयीचे होण्याचे दृष्टीकोणातुन यवतमाळ जिल्ह्याकरीता लसीकरण पोर्टल सुरु करण्यात आले आहे. सदर पोर्टलची नागरीकांकरीता नोंदणी लिंक https://yavatmal.govvaccine.in/#/ ही असुन जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की सदर लिंकवर नोंदणी केल्यास आपणास आपल्या लसीकरणाचा दिनांक व वेळ एस.एम.एस. च्या माध्यमातुन कळविण्यात येणार आहे तरी सर्व नागरीकांनी सदर नोंदणी लिंकवर माहीती भरावी. जेणे करुन लसीकरणाकरीता गैरसोय होणार नाही. तसेच लसीकरणाचे योग्य नियोजन करता येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.

Copyright ©