Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात 25 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध

 

यवतमाळ, दि. 21 जून : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 9 जण पॉझेटिव्ह तर 25 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 766 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 9 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 757 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 66 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72645 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70793 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये आर्णी येथील एक, पांढरकवडा दोन, पुसद तीन, वणी दोन व यवतमाळ येथील एका रूग्णाचा समावेश आह

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 73 हजार 766 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 01 हजार 99 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.78 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.17 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 48 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2231 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 29 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 548 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 15 रुग्णांसाठी उपयोगात तर 511 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 4 उपयोगात तर 1172 बेड शिल्लक आहेत.

___________________________________

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमित योगा आवश्यक

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे नागरिकांना आवाहन

यवतमाळ, दि. 21 जून : तणावमुक्त जीवन जगण्यासाठी तसेच कोरोना व इतर आजारापासून बचावासाठी सर्वांनी योगाभ्यासाच्या माध्यमातून रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. केवळ योग दिन साजरा करण्यासाठीच नव्हे तर रोज किमान एक तास तरी नियमित योगा करून आपले आरोग्य कायम सुदृढ व निरोगी ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी योगदिनानिमित्त नागरिकांना केले.

आज सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिविंग, श्री जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, नेहरू युवा केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी येडगे बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी उमेश बडवे, उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, तहसिलदार कुणाल झाल्टे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी येडगे पुढे म्हणाले की शासकीय कामकाज करतांना अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अनेकदा कामाचा ताण येतो, या ताण तणावातून मुक्त होण्याकरिता नेहमी योग व प्राणायाम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तर जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ यांनी ‘करो योग, रहो निरोग’ असे सांगून योग ही आपली पुरातन संस्कृती नियमित योगाभ्यासातून जपण्याचे तसेच पोलीस विभागाने तणाव दूर करण्यासाठी योगाचा फायदा करून घेण्याचे सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी उपस्थितांकडून नियमित योग करण्याचा व निरोगी राहण्याचा संकल्प करवून घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा योग संयोजक राजु पडगीलवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार नेहरू युवा केंद्राचे अनिल ढेंगे यांनी व्यक्त केले.

याप्रंसगी भारत स्वाभीमान ट्रस्टचे दिनेश राठोड, आर्ट ऑफ लिव्हींगचे शंतनु शेटे व सुहास पुरी, पातंजली योग समितीचे संजय चाफले, माया चव्हाण, कवीता पवार, जनार्दन योगाभ्यासी मंडळाचे महेश जोशी, मनिष गुबे, तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, योग शिक्षक, शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

__________________________________

कृषी संजिवनी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन

यवतमाळ, दि. 21 जून : कृषी तंत्रज्ञानामधील छोटीशी सुधारणा देखील पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करु शकते ही जाणीव ठेवून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्यासाठी व खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यामध्ये दि. 21 जुन 2021 ते 01 जुलै 2021 या कालावधीत कृषी संजिवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यात कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शास्त्रज्ञ, कृषी मित्र यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत.

सदर सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय गावांमध्ये गावबैठका, शिवार फेरीचे व शेतीशाळेचे आयोजन करून विविध बाबीवर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे आहे. या कालावधीत दिनांक 21 जुन 2021 रोजी बिबिएफ लागवड तंत्रज्ञान(रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान), दि. 22 जुन रोजी बिजप्रक्रीया, 23 जुन ला जमिन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, 24 तारखेला कापुस एक गाव एक वाण, 25 जुन रोजी विकेल ते पिकेल, 28 जुन रोजी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, 29 जुन रोजी तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढीसाठी रिसोर्से बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग. 30 जुन रोजी जिल्ह्यातील महत्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना व दिनांक 01 जुलै 2021 रोजी कृषी दिन आणि मोहिमेचा समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी कळविले आहे.

___________________________________
शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा अपर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

यवतमाळ, दि. 21 जून : नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या कारणास्तव आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासकीय मदत देण्यासाठी जिल्हा समितीच्या सभेत निर्णय घेण्यात येतो. याअंतर्गत आज अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांचे दालनात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील एकूण 8 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. त्यातील दोन प्रकरणे पात्र, तीन अपात्र व तीन प्रकरणे शेतकरी आत्महत्येशी संबंधीत नसल्याने वगळण्यात आली.

जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. यावेळी अपर जिल्हाधिकारी दुबे व निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी जिल्हास्तरीय समितीचा आढावा घेऊन प्रकरणे निकाली काढली.

यापुर्वी माहे जून महिण्यात दि. 14 जून व दि. 18 जून रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे अध्यक्षेतेखाली शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला होता. यात दि.14 जून रोजी एकूण 12 प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यातील 6 पात्र तर 6 अपात्र ठरविण्यात आली. तसेच दि.18 जून रोजी झालेल्या बैठकीत 25 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यात 10 प्रकरणे पात्र, 10 अपात्र व पाच प्रकरणे शेतकरी आत्महत्येशी संबंधीत नसल्याने वगळण्यात आली.

आज झालेल्या बैठकीला पोलीस, आरोग्य, कृषी व समाजकल्याण विभागाचे तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा अग्रणी बँक व कृषी विकास अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Copyright ©